मराठी व्याकरण 2
भरपूर सराव करा
मराठी व्याकरण भाग २
समास
जेव्हा दोन किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे प्रत्येय किंवा शब्द यांचा लोप होऊन त्याचा एक जोडशब्द तयार होतो तेंव्हा शब्दांच्या या एकीकरणाला समास आणि त्या जोडशब्दाला सामासिक शब्द म्हणतात. समासाचे प्रकारः १) अव्ययीभाव समासः – या मध्ये पहिले पद महत्वाचे असते किंवा संपूर्ण शब्द क्रियाविशेषण अव्यय असतो. उदाः – आजन्म – जन्मापासून प्रतिवर्ष – दरवर्षाला आमरण – मरेपर्यंत २) तत्पुरुषः – यात दुसरे पद महत्वाचे असते. अ) विभक्ती तत्पुरुषः – या मध्ये सामासिक शब्दाचा विग्रह करताना गाळलेला विभक्ती प्रत्यय घालून समास सोडवावा लागतो. ह्या समासामध्ये शब्द योगी अव्ययाचा लोप होऊन दोंन्ही पदे जोडली जातात. उदाः कष्ट साध्य – कष्टाचे साध्य क्रिंडागण – क्रिडेसाठी अंगण राजपुत्र – राज्याचा पुत्र ब) कर्मधारय समासः – दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात व त्यातील एक पद दुस-याचे विशेषण असते. उदाः महादेव – महान असा देव सुनयना – चांगले नयन क) द्विगू समासः – या सामासिक शब्दातील पहिले पद हे संख्या विशेषण असते. ह्या समासात समुच्चयाचा अर्थ दर्शविला जातो. उदाः पंच पाळे – पाच पाळ्यांचा समुदाय ड) मध्यम पदलोपी समासः – या मासिक शब्दाचा विग्रह दोन पदांतील सबंध दाखवणारे शब्द घालून करावा लागतो. उदाः बटाटेवडा – बटाटे घालुन केलेला वडा पुरणपोळी – पुरण घालून केलेली पोळी इ) उपपद तत्पुरुषः –या पदातील दुसरे पद हे कृदन्त धातुसाधित असते. उदाः पंकज – चिखलात जन्मणारे मार्गस्थ – रस्त्यावरुन जाणारे फ) नंत्र तत्पुरुषः – यातील पहिले पद नकारार्थी असते. उदाः अयोग्य – योग्य नसलेला नापसंत – पसंत नसलेला निरोगी – रोग नसलेला ग) अलक तत्पुरुषः – या सामासिक शब्दातील पुर्वपदाच्या साधारणतः सप्तमी विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही. उदाः अग्रसेन, सरसिज, सुधाकर इत्यादी. ३) द्वंद्व समासः – यातील दोन्ही पदे अर्थदृष्टया प्रधान समान – दर्जाची असतात. याचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत -
अ) इतरेतर द्वंद्व समासः – या शब्दाचा ‘आणि’, ‘व’ या अव्ययांनी विग्रह केला जातो. उदाः हरिहर – हरि आणि हर कृष्णार्जुन – कृष्ण आणि अर्जुन ब) वैकल्पिक द्वंद्वः – या समासाचा ‘अथवा’ ‘किंवा’ या शब्दांनी विग्रह केला जातो. उदाः खरेखोटे – खरे किंवा खोटे तीनचार – तीन व चार धर्माधर्म – धर्म किंवा अधर्म क) समाहार द्वंद्वः – या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय इतर पदार्थांचाही समावेश – समाहार त्यात केलेला असतो. उदाः चहापाणी – चहा, पाणी आणि इतर पदार्थ पालापाचोळा – पाला, पाचोळा वैगेरे मीठ भाकर – मीठ, भाकर, याबरोबर कांदा चटणी इ
समास
शब्दसिद्धी
आपल्या भाषेतील शब्दसंपत्ती आपल्या मनातील विचार,भावना, कल्पना, व्यक्त करण्यासाठी जे शब्द आपण वाक्यात वापरतो ती आपली मूळ मराठी भाषा. आपण आपल्या भाषेचा व्यवहार शब्दाच्या साहाय्याने करतो. भाषेत प्रथम शब्द थोडेच असतात. तेवढ्या शब्दांनी भागत नाही. म्हणून आपण नवनवीन शब्द बनवितो. इतर भाषांमधूनही आपण शब्द घेऊन आपला व्यवहार साधतो. शेजारच्या प्रातांतील लोकांशी आपले दळवळण वाढले की एकमेकांच्या भाषेतील शब्दांची देवाण – घेवाण होते. काही काळानंतर त्या भाषेतील शब्द आपल्या भाषेतील शब्द म्हणूनच गणले जातात. आपल्या भाषेतील मूळ शब्द कोणते, कोणते शब्द आपण इतर भाषांतून जसेच्या तसे घेतले, काहीत बदल कोणता केला व शब्द कसा बनविला हे पाहणे मोठे मनोरंजक ठरेल. शब्द कसा बनतो. म्हणजेच सिध्द होतो याला ‘शब्दसिध्दी’ असे म्हणतात. आपली भाषा संस्कृत – प्राकृत या भाषांपासून निर्माण झालेली असल्यामुळे त्या भाषांतील शब्दांचा मोठा ठेवा मराठीत असणे साहजिक आहे. १. तत्सम शब्द – ‘कवि, मधु, गुरू, पिता, पुत्र, कन्या, वृक्ष, पुरूष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव’ वगैरेंसारखे शेकडो शब्द संस्कृत भाषेतले असून ते जसेच्या तसे म्हणजे शब्दांच्या रूपात काही फरक न होता मराठी भाषेत आले आहेत.अशा शब्दांना ‘तत्सम’ (= त्यासारखे म्हणजे संस्कृत शब्दांसारखे) असे म्हणतात. आणखी काही तत्सम शब्द पाहा. पुष्प, जल, प्रीति, भीति, कर, ग्रंथ, पृथ्वी, भूगोल, विदवान, भगवान, परंतु, यद्यपि, यथामति, कर्ण, पर्ण, अरण्य, हस्त, मस्तक, कर्म, ओठ, अग्नि, नदी, कमल इ. २. तदभव शब्द – पण कितीतरी संस्कृत शब्द मराठीत येताना त्यांच्या मूळ रूपात बदल होतो. उदा. ‘कर्ण’ पासून कान, ‘चक्र’ पासून चाक, ‘अग्नि’ पासून आग, ‘पर्ण’ पासून पान, ‘विनती’ पासून विनंती वगैरे. अशा ज्या संस्कृत शब्दांच्या मूळ रूपात बदल होऊन ते मराठीत आलेले आहेत, त्या शब्दांना ‘तदभव शब्द’ असे म्हणतात. आणखी काही तदभव शब्द पाहा. (कंसातील शब्द संस्कृत आहेत.) घर (गृह), पाय (पद), भाऊ (भ्रातृ), सासू (स्वसृ), सासरा (श्वशुर), गाव (ग्राम), दूध (दुग्ध), घास (ग्रास), कोवळा (कोमल), ओठ (ओष्ठ), काम (कर्म), घाम (घर्म). विशेष म्हणजे एकाच वेळी वरील दोन्ही प्रकारचे शब्द मराठीत वापरले जातात. तत्सम शब्द व त्याच्यापासून झालेले तदभव शब्द यात अनेकदा अर्थबदलही होतो. उदा. कलश – तांब्या (तत्सम शब्द) कळस – देवळाच्या वरचा भाग (तदभव शब्द) क्लेश - कष्ट ( तत्सम शब्द) किळस – घाण ( तदभव शब्द) ३. देशी किंवा देशज – मराठीत असे काही शब्द आढळतात, की ते तत्सम किंवा तदभव किंवा परभाषीय नाहीत. उदा. झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड वगैरे. आपल्या महाराष्टातील पूर्वी जे रहिवासी होते त्यांच्या बोली भाषेतील ते शब्द असावेत. अशा शब्दांची सरळ व्युत्पत्ती मिळत नाही. अशा शब्दांना ‘देशी’, ‘देश्य’ किंवा ‘देशज’ शब्द असे म्हणतात. असे म्हणतात. असे आणखी काही शब्द पाहा. पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजरी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकूण, कंबर इ. ४. परभाषीय शब्द - असा शब्दसिध्दीचा प्रकार आहे. त्याचे दोन उपप्रकार आहेत. अ] परकीय किंवा विदेशी शब्द ब] स्वदेशी – भारतीय भाषेतील शब्द, परप्रांतीय भारतीय शब्द. अ] परकीय किंवा विदेशी शब्द – परकीय किंवा विदेशी शब्दांना काही ऐतिहासिक संदर्भही आहेत. शेकडो वर्षे आपल्या देशावर मुसलमानांची सत्ता होती. महाराष्ट्रातही ती होती. त्यामुळे उर्दु, फारशी, अरबी या भाषांचा प्रभाव अन्य भारतीय भाषांवर पडला तसा मराठीवरही पडला. त्या भाषांमधील असंख्य शब्द मराठीत आले. जनसामान्यांच्या व्यवहारात ते रूळले. पुढे इंग्रजांची सत्ता आली. ब्रिटिश राजवटीत इंग्लिश भाषेचा प्रभाव मराठी भाषेवर, लेखनावरही पडला. ब्रिटिशांबरोबरच फ्रेंच, पोर्तुगीज, डचही व्यापारासाठी आले. गोव्यात पोर्तुगीजांची तर पाँडेचरीत फ्रेंचांची सत्ता होती. त्यांच्या भाषामधूनही अनेक शब्द मराठीत आले. असे शब्द हेविदेशी किंवा परभाषीय किंवा परदेशी शब्द होत. आपल्या दैनंदिन व्यवहारात असे शब्द कितीतरी मोठ्या प्रमाणात रूळलेले दिसतात. अशा शब्दांची काही उदाहरणे. (१) इंग्रजी – टेबल, पेपर, मार्क, नंबर, टीचर, सर, मॅडम, ऑफिस, त्रेन, रेल्वे, बस, तिकिट, ड्रायव्हर, मोटर, कंडक्टर, स्टेशन, पोस्ट, कार्ड, पार्सल, नर्स, डॉक्टर, पेशंट, इंजेक्शन, हॉस्पिटल, शर्ट, पँट, बटन, बॅट, बॉल, ड्रेस, ग्लास इ. (२) पोर्तुगीज – बटाटा, तंबाखू, पगार, बिजागरे, कोबी, हापूस, फणस इ. (३) फारशी – खाना, सामान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, सौदागर, कामगार, गुन्हेगार, फडनवीस इ. (४) अरबी – अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, जाहिर, मंजूर, शाहिर, साहेब, मालक इ. ( विशेष – परभाषेतून मराठीत आलेले जे शब्द आहेत ते जसेच्या तसे आलेले नाहीत. त्यांच्याही रूपात काही बदल होऊन आलेले आहेत. त्याच्या रूपांमधील्ल बदल हा अभ्यासाचा एक स्वतंत्र असा विषय आहे.) ब] स्वदेशी शब्द (परप्रांतीय भारतीय शब्द) – महाराष्ट्राची जशी मराठी भाषा आहे, तशी गुजरातची गुजराती, मध्यप्रांताची हिंदी, कर्नाटकची कानडी, आंध्रची तेलगू, तमीळनाडूची तामिळी अशा त्या त्या प्रांतांच्या भाषा आहेत. मराठीच्या सीमांवर असलेल्या भाषांची व भाषकांची देवाणघेवाण, दळणवळण वर्षानुवर्षे चालू आहे. स्वाभाविकपणे या अन्य प्रांतीय भारतीय (म्हणजे स्वदेशी) भाषांमधील अनेक शब्द मराठीत रूढ झालेले आहेत. त्यांना स्वदेशी शब्द किंवा परप्रांतीय भारतीय शब्द असे म्हणता येईल. अशा काही शब्दांची उदाहरणे. १. कानडी – अण्णा, अक्का, ताई, अडकित्ता, भाकरी, तूप, कुंची, कांबळे, खलबत्ता, विळी, गुढी, किल्ली, गुंडी इ. २. गुजराती – घी, दादर, शेट, दलाल, डबा, रिकामटेकडा ३. तामिळी – चिल्ली पिल्ली, सार, मठ्ठा ४. तेलगू – ताळा, अनरसा, किडूकमिडूक, शिकेकाई ५. हिंदी – भाई, बेटा, बच्चा, मिलाप, तपास, दिल, और, बात, दाम, करोड, इ. मराठी भाषेच्या शब्दसंपत्तीत, भर पडली आहे असे आपल्याला दिसते. त्याचे हे तत्सम, तदभव, देशी व परभाषीय चार प्रकार आहेत. सिध्द, साधित, उपसर्ग, प्रत्यय आपल्या भाषेचा व्यवहार नीट चालण्यासाठी आपण इतर भाषांमधून शब्द घेतले, हे आपण पाहिले. आपल्या भाषेच्या माध्यमातून विविध अर्थ व त्यांच्या छटा व्यक्त करणारे शब्द आपल्याला तयार करावे लागतात. भाषेतील शब्दांचे दोन प्रकार असतात. ‘जा, ये, कर, बस, बोल, पी’ यांसारखे मूळ धातू किंवा शब्द भाषेत असतात. त्यांना ‘सिध्द शब्द’ असे म्हणतात. ‘कर’ यांसारख्या सिध्द शब्दापासून ‘करू, करून, कर्ता, करणारा, होकार, प्रतिकार, यांसारखे शब्द बनवितात. त्यांना’ साधित शब्द’ असे म्हणतात. मूळ शब्दाच्या किंवा धातूच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही ‘साधित शब्द’ बनवितात. या अक्षरांना ‘उपसर्ग’ असे म्हणतात. ही अक्षरे अव्ययरूप असतात व ती केव्हा केव्हा त्या मूळ धातूचा अर्थ फिरवितात. उदा. ह्र (हर) या धातूचा मूळ अर्थ ‘हरण करणे’ किंवा ‘नेणे’ असा आहे. पण मागे उपसर्ग लागल्यामुळे त्याच्या मूळ अर्थात कसा फरक पडला आहे ते पाहा. आ + हार = आहार = भोजन, परि + हार = परिहार = निवारण वि + हार = विहार = क्रीडा , अप + हार = अपहार = चोरी सं + हार = संहार = कत्तल, उप + हार = उपहार = नजराणा, भेट प्र + हार = प्रहार = घाव , उप + आ + हार = उपाहार = फराळ हीच गोष्ट इतर धांतूच्या बाबतीतही हेते. वरील शब्दांत ‘आ, वि, सं, प्र, परि, अप, उप’ हे उपसर्ग आहेत. उपसर्ग हे स्वतंत्रपणे येत नाहीत. शब्दांच्या पूर्वी उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्गघटीत शब्द असे म्हणतात. शब्दाच्या किंवा धांतूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून जे शब्द तयार होतात अशा अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात. जन् (=जन्मणे) या धातूला प्रत्यय लागून ‘जनन, जनक, जननी, जन्य,’ वगैरे शब्द बनतात. या शब्दांत ‘न, क, ता, नी, य’ हे प्रत्यय होत. अशा त-हेने प्रत्यय लागून बनलेल्या शब्दांना ‘प्रत्ययघटीत’ शब्द असे म्हणतात. अशा प्रकारे भाषेत दोन प्रकारचे शब्द असतातः (१) सिध्द (२) साधित सिध्द शब्दांचे तीन प्रकार आहेतः (१) तत्सम (२) तद्भव (३) देशी साधित शब्दांचे दोन प्रकारः (१) उपसर्गघटीत व (२) प्रत्यघटीत मराठीतील उपसर्ग व प्रत्यय तीन प्रकारचे आहेतः (१) संस्कृतमधील (२) मराठीतील (३)फारसी-अरबी भाषेतील आपण क्रमाने विचार करु. उपसर्गघटीत शब्द (१) संस्कृतमधील उपसर्ग व त्यांनी युक्त असे काही शब्द खाली दिले आहेतः (उपसर्गाचा स्थूल अर्थ कंसात दिला आहे.) अति - (फार, पलिकडे) अतिशय, अतिक्रम, अतिरेक, अतिप्रसंग अधि - (मुख्य, श्रेष्ट) अधिपती, अध्यक्ष, अधिकार, अधिकरण, अध्ययन, अधिदैवत. अनु - (मागून, सारखे)अनुकरण, अनुक्रम, अनुभव, अनुवाद, अनुमती, अनुस्वार, अप-(विरुध्द, हीन) अपयश, अपमान, अपकार, अपशब्द, अपकुशन, अपराध अभि - (पूर्वी, जवळ) अभिनंदन, अभिमुख, अभिनय, अभ्युदय, अभिरुची, अभ्यास अव - (खाली, विरुध्द) अवरण, अवमान, अवकृपा, अवगुण, अवनत. आ - (पासून, पर्यत, पलीकडे) आजन्म, आमरण, आक्रमण, आकर्ण,आक्रोश. उत्त् - (श्रेष्ट, उंच)उत्कर्ष, उत्पत्त,उन्नती, उत्तीर्ण, उद्योग, उत्तम उत्प्रेक्षा. उप - (जवळ, गौण) उपवास,उपनेत्र, उपाध्यक्ष, उपकार, उपवाद. दुस् - (वाईट, दुष्ट) दुर्गुण, दुर्दशा, दुष्कृत्य,दुर्जन, दुर्लभ. निर्, नि – (बाहेर, नसलेला) निर्गत, निर्धन, निर्लज्ज, निरंतर, निकामी, निरोगी. परा - (उलट, परत) पराजय, पराक्रम, पराकाष्टा, पराभव. प्र - (अधिक,पुढे) प्रबल, प्रगती, प्रवाह, प्रदोष, प्रकोप, प्रसिध्द, प्रस्थान. प्रति - (उलट फिरुन) प्रतिकार, प्रतिबिंब, प्रतिदिन, प्रतिध्वनी, प्रत्येक, प्रतिकूल. वि - (विशेष, शिवाय) विख्यात, विज्ञान,विधवा, विसंगती, विपत्ती,विशेष. सम् - (चांगले, बरोबर) संस्कार, संस्कृ, संयोग, संगम, संगीत, संतोष, संकल्प. सु - (चांगले, सोपे) सुग्रास, सुभाषित, सुकर, सुगम, सुशिक्षित, सुगंध. (२) मराठी उपसर्ग अ-अन् - (अभाव) अजाण, अडाणी, अबोल, अनोळखी. आड - (लहान, गौण) आडनाव, आडवाट, आडकाठी, आडवळण. अद - (अर्धा, निम्मा) अदपाव, अदशेर(अच्छेर), अदकोस. अव - (हीन, कमी) अवजड, अवघड, अवदसा, अवकळा, अवलक्षण. नि - (नसलेला) निरोगी, निनावी, निकोप, निलाजरा, निकामी. पड - (दुसरा, गौण) पडजीभ, पडसाद, पडछाया, पडताळा. फट - (फार, उघड) फटफजिती, फटकाळ. भर - (मुख्य, पूर्ण ) भरजरी, भरधाव, भरदिवसा, भरचौकात. (३) फारसी व अरबी उपसर्ग ऐन - (मुख्य, पूर्ण ) ऐनहंगाम, ऐनखर्च, ऐनदौलत. कम - (अपुरा, कमी) कमनशीब, कमजोर, कमकुवत. गैर - (वाचून, विना) गैरहजर, गैरशिस्त, गैरसमज, गैरसावध, गैरसोय, गैरहिशेबी. दर - (प्रत्येक) दररोज, दरसाल, दरशेकडा, दरमहा, दरमजल. ना - (अभाव) नाउमेद, नाराज, नापंसत, नालायक, नाकबूल. बद - (वाईट) बदनाम, बदसूर, बदलौकिक, बदफैल, बदअंमल. बिन - (शिवाय, वाचून) बिनचूक , बिनतक्रार, बिनधोक, बिनहरकत. बे - (वाचून, शिवाय, रहित) बेडर. बेइनाम. बेअब्रू, बेदम, बेअदबी, बेदाणा, बेफिकीर,बेपर्वा, बेगुमान, बेकायदा, बेकार. सर - (मुख्य) सरकार, सरदार, सरहद्द, सरचिटणीस. हर - (प्रत्येक) हररोज, हरघडी, हरवख्त, हरसाल, हरकामी. प्रत्ययघटीत शब्द प्रत्यय दोन प्रकारचे असतात. (१) कृत् किंवा धातुसाधित – धांतूना जोडले जातात ते ‘कृत्’ प्रत्यय. कृत्-प्रत्यय जोडल्याने जे शब्द तयार होतात त्यांना ‘कृदन्त’ असे म्हणतात. (२) तध्दित किंवा नामसाधित – नामे, सर्वनामे, विशेषणे आणि अव्यये यांना काही लागून त्यांच्यापासून बनलेल्या शब्दांना ‘तध्दिते’ म्हणतात. (१) संस्कृत प्रत्यय व त्याच्यापासून बनलेली धातुसाधिते (कृदन्ते) अ - (कर्तृवाचक) चोर, देव, सर्प, भाव, लाभ. अक - (कर्तृवाचक) लेखक, रक्षक, पाचक, तारक, मारक, गायक, जनक. अन - (साधनार्थक) नयन, चरण, वदन, नंदन, पालन. अना - (स्रीलिंगी नामे) प्रार्थना, वेदना, कल्पना, तुलना, वंदना. अनीय – (योग्यर्थक) श्रवणीय, मननीय, रमणीय, पूजनीय, वंदनीय. आ - (क्रियावाचक नामे) इच्छा, कथा, गुहा, चिंता. इ-ई - (कर्तृवाचक) हरि (हरण घेणारा), त्यागी, भाषी. इक - (विशेषणे) रसिक (रस घेणारा), पथिक. त - (भूतकालवाचक) कृत, मृत, त्यक्त, हत, नत, रत, भूत, (झालेले) तृ (ता) – (कर्तृवाचक) त्राता, भर्ता, श्रोता, वक्ता, दाता, नेता, शास्ता. तव्य - (स्रीलींगी नामे) कृति, स्तुति, नीति, युक्ति, शक्ति. य - (योग्यार्थक) कार्य (करण्यास योग्य) देय, पेय, त्याज्य, भोग्य. (२) मराठी प्रत्यय व त्यांच्यापासून बनलेली धातुसाधिते अ - (क्रियावाचक नामे) कर, डर, लूट, फूट, खोट, तूट, मेळ, फोड. आ - (क्रियावाचक नामे) ओढा, ठेवा, झगडा, ठेचा, वेढा, पुकारा. आई - (क्रियेची मजुरी) खोदाई, चराई, घडाई, उजळाई, शिलाई. आऊ - (योग्यतादर्शक) टाकाऊ, जळाऊ, लढाऊ, विकाऊ, शिकाऊ. आरी - (कर्तृवाचक) पुजारी, पिंजारी, रंगारी. आळू - (विशेषणे) झोपाळू, विसराळू, लाजाळू, सोसाळू. ई - (क्रियावाचक नामे) कढी, मोडी, उडी, बुडी, रडी, थुंकी, बोली. ईक - (विशेषणे) सडीक, पडीक, पढीक. ईत - (विशेषणे) लखलखीत, चकचकीत. ईव - (विशेषणे) रेखीव, जाणीव, कोरीव, घोटीव, पाळीव, आटीव. ऊ - (विशेषणे, नामे) चालू,लागू, झाडू, उतारु. ऊन - (अव्यये) करुन, देऊन, बसून, उडून, रडून, हसून. खोर - (विशेषणे) भांडखोर, चिडखोर. णावळ – (क्रियेचेमोल) धुणावळ,लिहिणावळ, दळणावळ. प - (क्रियावाचक) दळप, कांडप, वाढप. पी - (कर्तृवाचक) वाढपी, दळपी, कांडपी. णारा - (कर्तृवाचक विशेषण) लिहिणारा, बोलणारा. रा - (युक्तार्थक) हसरा, नाचरा, बुजरा, दुखरा, कापरा, धावरा. शब्दसाधिते किंवा तध्दिते वर दिलेले प्रत्यय हे धातूंना लागून त्यापासून नवीन सब्द तयार होतात. धातूखेरीज इतर शब्दांना प्रत्यय लागून जे नवीन शब्द तयार होतात त्यांना शब्दसाधिते किंवा तध्दिते असे म्हणतात. असे काही शब्द पुढे दिले आहेत. (१) संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेले तध्दित शब्द अ - (अपत्यार्थक) (यदु+अ) यादव, राघव, पांडव भार्गव, सौभद्र. इक - (संबंधार्थक) कायिक, वाचिक, मानसिक, मासिक, लौकिक, धार्मिक. इत - (युक्तार्थक) आनंदित, दुःखित, मूर्च्छित, उत्कंठित. ईन - (युक्तार्थक) कुलीन, शालीन, नवीन. कीय – (भावार्थक) महत्त्व, विव्दत्त्व, जडत्त्व, मूर्खत्त्व,गुरुत्त्व. मान-वान - (युक्तार्थक) बुध्दिमान, धनवान, विद्वान, श्रीमान. (२) मराठी प्रत्यय लागून झालेली शब्दसाधिते (तध्दिते) अ - (नामे) वेडा, ठेवा, ठेचा, भरडा, गारठा, ओढा. आई - (भाववाचक) शिलाई, लढाई, विटाई, दांडगाई, शिष्टाई, खोदाई ई - (नामे) उडी, बुडी, बोली, चोरी, सावकारी. ई - (विशेषणे) मापी, वजनी, लाकडी, पितळी. कर - (विशेषणे) सुखकर, खेळकर,खोडकर, दिनकर, प्रभाकर करी - (नामे) शेतकरी, देणेकरी, भाडेकरी, वारकरी, पहारेकरी. कट - (युक्तार्थक) तेलकट, मातकट, धुरकट, मळकट, पोरकट. की - (भाववाचक) माणुसकी, उनाडकी, पाटीलकी, शेतकी, गावकी. खोर - (युक्तार्थक) भांडखोर, चिडखोर, चहाडकर, चेष्टेखोर. वाईक – (नामे) नातेवाईक, आस्थेवाईक, त-हेवाईक, मासलेवाईक. सर - (सारखा) गोडसर, वेडसर, काळसर, ओलसर, भोळसर (३) फारसी प्रत्यय लागून झालेले काही तध्दित शब्द गर, गार – (कर्तृवाचक) सौदागर, जादूगार, जिनगर, गुन्हेगार, माहितगार, कामगार. वान - बागवान. ई - (भाववाचक) खुशी, मजुरी, नेकी, हमाली, फकिरी. स्तान - (स्थानवाचक) अरबस्तान, तुर्कस्तान, कबरस्तान गिरी - (भाववाचक) गुलामगिरी, मुलुखगिरी, कारागिरी. दार - (राखणारा) दुकानदार, फौजदार, जमीनदार, पोतदार. (असलेला) इमानदार,अब्रूदार, धारदार, घाटदार, डौलदार. दान - (स्थानदर्शक) कलमदान, शामदान दाणी - पिकदाणी, अत्तरदाणी, चहादाणी. बाज - (खेळणारा, रमणारा) दारुबाज, नखरेबाज, कुर्रेबाज, नफेबाज, दगलबाज. बंद - (बांधणारा) नालबंद, पगडबंद, हत्यारबंद, चिरेबंद. खाना - (ठिकाण, गृह) कारखाना, तोपखाना, दवाखाना, हत्तीखाना, दारुखाना. नवीस - (लिहिणारा) चिटनवीस, फडनवीस, कारखानवीस नीस - चिटणीस, फडणीस. आबाद - (स्थानदर्शक) औरंगाबाद, हैदराबाद, अहमदाबाद. नामा - (पत्र, ग्रंथ) हुकुमनामा, करारनामा, पंचनामा, जाहीरनामा. आतापर्यत आपण साधित शब्दांचे दोन प्रकार पाहिलेः (१) उपसर्गघटीत व (२) प्रत्ययघटीत. साधित शब्दांचा तिसरा प्रकार म्हणजे सामासिक शब्दांचा. देवघर, पोळपाट, घरजावई, नीळकंठ, दारोदार यांसारखे जोडशब्द दोन किंवा अधिक शब्द एकत्र येऊनच बनलेले असतात. समासाचा विचार आपण स्वतंत्र पाठात केलाच आहे. अभ्यस्त शब्द - साधित शब्दांचा चौथा प्रकार म्हणजे अभ्यस्त शब्दांचा. घरघर, हळूहळू, शेजारी बाजारी, दगडबिगड यांसारख्या शब्दांत एकाच शब्दाचा किंवा काही अक्षरांचा अभ्यास (=पुनरावृत्ती किंवा द्वित्व) होऊन हे शब्द बनलेले असतात. अभ्यस्त म्हणजे द्वित्व किंवा दुप्पट करणे. अभ्यस्त शब्दाचे तीन प्रकार मानतात. (१) पूर्णाभ्यस्त (२) अंशाभ्यस्त (३) अनुकरणवाचक (१) पूर्णाभ्यस्त शब्द पुढील वाक्ये पाहा. (१) मदत मिळविण्यासाठीतो घर घर फिरला. (नामे) (२) जे जे चकाकते ते ते सोने नसते. (सर्वनामे) (३) बाजारातून मी लाललाल टोमॅटो आणले. विशेषण (४) घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. (क्रियापद) (५) मधून मधून असेच घराकडे येत जा. (क्रियाविशेषणे) (६) शत्रूंची सैन्ये समोरासमोर तळ ठोकून हेती. (शब्दयोगी) (७) वा ! वा ! केव्हा आलात तुम्ही ! (केवलप्रयोगी) वरील वाक्यांत शब्दांच्या निरनिराळ्या जातींचा एकच शब्द व्दिरुक्त झालेला दिसून येतो. अशा प्रकारे एक पूर्ण शब्द जेव्हा पुनः पुन्हा येऊन एक जोडशब्द बनतो, त्याला पूर्णाभ्यस्त शब्द म्हणतात. आणाखी काही उदाहरणे – तिळतिळ, हालचाल, तुकडेतुकडे,कोणीकोणी, एकेक, हळूहळू, पुढेपुढे, मागोमाग, हायहाय. पुनरुक्त व अभ्यस्त यांमधील अंतर यांच्या उच्चारण पध्दतीत दिसून येते जसे – (पुनरुक्त) तो हळू हळू चालतो. (येथे कर्त्याची भावना व्यक्त होते.) (अभ्यस्त) तो हळू हळू चालतो. ( येथे क्रियेचा विशेष दर्शविला जातो.) कित्येक वेळा या द्विरुक्त शब्दांच्या मागे च, चे, च्या, ल्या, अंशासारखे प्रत्यय येऊन अतिशयत्व, साकल्य सूचित केलेले असते. उदा. पैसाचपैसा, लांबचलांब, वरचेवर, वरल्यावर, मधल्यामध्ये, खालच्याखाली, आतल्याआत. (२) अंशाभ्यस्त केव्हा-केव्हा हा शब्द तसाच पुन्हा न येता त्यातील एखादे अक्षर बदलून येते. या अक्षर बदलून आलेल्या शब्दाला वेगळा अर्थ नसतो. स्वतंत्रपणे तो वापरला जात नाही. केवळ निरर्थक अक्षरे वापरुन यमक साधण्याचा प्रयत्न असतो. उदा. – शेजारीपाजारी, झाडबीड, बारीकसारीक, उरलासुरला, आडवातिडवा, अर्धामुर्धा, अघळपघळ, दगडबिगड, गोडधोड, किडकमिडूक, घरबीर, उद्याबिद्या. केव्हा केव्हा पहिल्या नामाच्या अर्थाचेच नाम जोडून द्विरुक्तीहोते.उदा.- कागदपत्र, कामकाज, कपडालत्ता, बाजारहाट, साजशृंगार, बाडबिस्तरा अशा शब्दांत समानार्थक शब्दांचा समास साधलेला असतो. जसे- (१) (फार्शी + फार्शी) अक्कलहुशारी, डावपेच, जुलुमीजबरी. (२) (फार्शी + मराठी) अंमलबजावणी, कागदपत्र, खर्चवेच, मेवामिठाई, बाजारहाट (३) (मराठी + फार्शी) दंगामस्ती, थट्टामस्करी, धनदौलत, मानमरातब, रीतरिवाज (३) अनुकरणवाचक शब्द काही शब्दांत एखाद्या ध्वनिवाचक शब्दाची पुनरुक्ती साधलेली असते. उदा. बडबड, किरकिर, गुटगुटीत, कडकडात, गडगडा, फडफड, खदखदून, तुरुतुरु, लुटूलुटू, चुटचुट, गडगड, वटवट अशा शब्दांना अनुकरवाचक शब्द म्हणतात.
शब्दसिद्धी
वाक्यासंश्लेषण
वाक्यांचे विभाग आपल्या बोलण्यातून अनेक वाक्ये एकामागून एक येत असतात. त्यांतील प्रत्येक वाक्य हे एक संपूर्ण विधान असते. प्रत्येक वाक्यात आपण कोणाबद्दल काहीतरी बोलतो; म्हणजे विधान करतो. बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो त्याला ‘उद्देश्य’ असे म्हणतात. व उद्देश्याविषयी तो जे बोलतो त्याला ‘विधेय’ असे म्हणतात. प्रत्येक वाक्यात उद्देश्य व विधेय या गोष्टी असतात. पुढील वाक्य पहा. त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. हे एक वाक्य आहे. यात कोणते विधान केले आहे? ‘खेळला’ हे. हे विधान कोणाला उद्देशून केले आहे? ‘मुलगा’ याच्याबद्दल. म्हणजे या वाक्यात ‘मुलगा’ उद्देश्य व खेळला हे विधेय. पण या वाक्यात एवढे दोनच शब्द नाहीत. ‘त्याचा धाकटा’ या दोन शब्दांनी ‘उद्देश्यविस्तार’ केला आहे. ‘आज, क्रिकेटच्या सामन्यात चांगला’ या शब्दांनी तो केव्हा, कोठे व कसा खेळला हे सांगितले आहे. विधेयाचा विस्तार या चार शब्दांनी केलेला आहे. याचा अर्थ असा की, वाक्यात उद्देश्य व विधेय एवढेच शब्द न येता त्यांचा विस्तार करणारे शब्दही येतात. म्हणून वाक्याचे द्दोन भाग पडतात. (१) उद्देश्य विभाग व (२) विधेय विभाग. यांना (१) उद्देश्यांग व (२) विधेयांग असेही म्हणतात. वरील वाक्य उद्देश्य विभाग व विधेय विभाग या कोष्टकात असे मांडता येईल.
उद्देश्य विभाग विधेय विभाग
उद्देश्य विस्तार उद्देश्य विधेय विस्तार क्रियापद
त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला
वाक्यांचे प्रकार
वाक्यांचे त्यांच्या अर्थानुरोधाने विविध प्रकार होतात, ते पुढीलप्रमाणे-
(१) ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, त्यास ‘विधानार्थी’ वाक्य म्हणतात. उदा माझे वडील आज
परगावी गेले.
(२) ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो, त्यास ‘प्रश्नार्थी’ वाक्य म्हणतात. उदा. तू मुंबईस केव्हा जाणार
आहेस?
(३) ज्या वाक्यात भावनेचा उदगार काढलेला असतो, त्यास ‘उदगार्थी’ वाक्य म्हणतात. उदा. अबब ! केवढी
प्रचंड आग ही !
(४) वाक्यातील विधाने ही केव्हाकेव्हा ‘होकारार्थी’ असतात. जसे – गोविंदा अभ्यास करतो. पण केव्हाकेव्हा
विधानात नकार असतो. जसे – त्याचा मुलगा मुळीच अभ्यास करत नाही. अशा वाक्यांना ‘नकारार्थी’ वाक्य
म्हणतात. या होकारार्थी व नकारार्थी वाक्यानांच अनुक्रमे ‘करणरुपी’ व ‘अकरणरुपी’ वाक्ये म्हणतात.
आणखी एका प्रकारे वाक्याचे प्रकार पडतात.
(१) वाक्यातील क्रियापदाच्या रुपावरुन नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्यास ‘स्वार्थी’ वाक्य म्हणतात.
उदा. मुले घरी गेली. जातात. – गेली – जातील.
(२) वाक्यातील क्रियापदाच्या रुपावरुन आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश या गोष्टींचा बोध होत
असेल तर त्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात. उदा- मुलांनो, चांगला अभ्यास करा. परमेश्वरा, मला चांगली बुध्दी दे
(३) वाक्यातील क्रियापदाच्या रुपावरुन विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इ्च्छा या गोष्टींचा बोध होत
असेल तर त्यास विध्यर्थी वाक्य म्हणतात. उदा. मुलांनी वडीलांची आज्ञा पाळावी.
मला परिक्षेत पहिला वर्ग मिळावा.
(४) वाक्यातील क्रियापदाच्या रुपावरुन अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत याचा
अर्थ निघत असेल तर त्यास संकेतार्थी वाक्य म्हणतात. उदा. पाऊस पडता तर हवेत गारवा आला असता.
याशिवाय एका वाक्यांत किती विधाने असतात त्यावरुन वाक्यांचे आणखी तीन प्रकार मानले जातात.
(१) केवल, (२) मिश्र, (३) संयुक्त
(१) केवलवाक्य – पुढील वाक्ये वाचा.
(१) आम्ही जातो आमुच्या गावा. (२) तानाजी लढत्ता लढता मेला.
वरील प्रत्येक वाक्यात एककेच विधान आहे. म्हणजे प्रत्येकात एकच उद्देश्य व एकच विधेय आहे.
पहिल्या वाक्यांत ‘आम्ही’ व दुस-या वाक्यात ‘तानाजी’ ही उद्देश्ये आहेत. तसेच पहिल्या वाक्यांत ‘जातो’
व दुस-या वाक्यांत ‘जातो’ व दुस-या वाक्यात ‘मेला’ ही विधेय आहेत.
ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते त्यास ‘केवल’ किंवा ‘शुध्द’ व ‘शुध्द’ वाक्य म्हणतात.
हे केवलवाक्य साधे, विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकार्थी वा नकारार्थी कोणत्याही प्रकारचे असू
शकेल.
(२) मिश्र वाक्य – पुढील वाक्ये वाचा
(१) जे चकाकते, ते सोने नसते.
(२) गुरुजी म्हणाले, की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे.
(३) आकाशात जेव्हा ढग जमतात, तेव्हा मोर नाचू लागतो.
यातील पहिल्या वाक्यांत ‘जे चकाकते’ हे एक केवलवाक्य आहे व ‘ते सोने नसते’ हे दुसरे केवलवाक्य
आहे. त्यातील ‘जे चकाकते’ हे अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असते त्यास ‘मुख्य’ किंवा ‘प्रधानवाक्य’ म्हणतात व
अवलंबून राहणा-या वाक्याला ‘गौण वाक्य’ किंवा ‘पोटवाक्य’ असे म्हणतात. दुस-या वाक्यांत ‘गुरुजी म्हणाले’
हे मुख्य वाक्य असून ‘प्रत्येकाने नियमितपणे शाळेत यावे’ हे गौणवाक्य ‘की’ या गौणत्वसूचक उभयान्वयी
अव्ययाने जोडले आहे. तिस-या वाक्यात ‘आकाशात जेव्हा ढग जमतात’ हे गौण वाक्य आहे. ते ‘तेव्हा मोर
नाचू लागतो’ या प्रधानवाक्यास ‘जेव्हा’ गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहे. अशा रीतीने एक
प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौणवाक्ये गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून जे एक संमिश्र वाक्य
तयार होते त्यास ‘मिश्र वाक्य’ असे म्हणतात.
(३) संयुक्तवाक्य – पुढील वाक्ये पाहा.
(१) मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो.
(२) सायंकाळी मी क्रिडांगणावर खेळतो किंवा मित्रांबरोबर फिरावयास जातो.
वर दोन वाक्ये दिली आहे. यातील प्रत्येक वाक्यात एकच विधान नसून प्रत्येकात दोन विधाने आहेत.
प्रत्येक विधान आहेत. यातील प्रत्येक वाक्यात एकच विधान हे स्वतंत्र केवलवाक्य आहे. पहिल्या वाक्यात दोन
स्वतंत्र केवलवाक्ये ‘व’ या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडली आहेत. ‘व’, ‘किंवा’ ही प्रधान्त्वबोधक
उभयान्वयी अव्यये आहेत. अशी अव्यये दोन वाक्यांना जोडतात व ही जोडलेली वाक्ये अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र
म्हणजे एकमेकांवर अवलंबून नसतात. अशा रीतीने दोन किंवा अधिक केवलवाक्ये प्रधानत्वबोधक उभयान्वयी
अव्ययांनी जोडली असता जे एक जोडवाक्य तयार होते त्यास ‘संयुक्तवाक्य’ म्हणतात.
संयुक्तवाक्यात दोन किंवा अधिक केवलवाक्याचेच असतात असे नाही. दोन किंवा अधिक मिश्रवाक्ये
प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडले गेले असेल तर त्यासही संयुक्तवाक्य म्हणतात. संयुक्तवाक्याचे
प्रकार तीनः (१) केवलसंयुक्त (=केवल+केवल), (२)मिश्रसंयुक्त(=मिश्र+मिश्र) व (३)केवलमिश्र संयुक्त (=केवल+
मिश्र). मिश्र वाक्य व संयुक्तवाक्य यांत फरक असाः मिश्रवाक्यात एकच वाक्य प्रधान असते, बाकीची सर्व गौण
असतात. संयुक्तवाक्यात दोन किंवा अधिक प्रधानवाक्ये असतात.
वाक्यसंक्ष्लेषण किंवा वाक्यसंकलन
‘वाक्यसंक्ष्लेषण’ यालाच ‘वाक्यसंकलन’ असेही म्हणतात. एकमेकांशी संबंध असलेली दोन किंवा अधिक
केवलवाक्ये दिली असता ती एकत्र करुन त्यांचे एक वाक्य बनविणे यालाच वाक्यसंक्ष्लेषण असे म्हणतात.
वाक्यरचनेवर प्रभुत्व संपादन करणे, निर्दोष वाक्यरचना करणे यासाठी व्याकरणाचा अभ्यास उपयोगी
पडतो. त्याप्रमाणे आपल्या मनातील आशय नेमकेपणाने व्यक्त करण्यासाठी विविध प्रकारची वाक्ये तयार
करण्याचे कौशल्य या अभ्यसानेच प्राप्त होते. म्हणून केवलवाक्य, मिश्रवाक्य व संयुक्त्वाक्य या वाक्यांचे प्रकार
ओळखणेही आवश्यक आहे. अशी वाक्ये ओळखणे हा अभ्यासाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.
पुढील वाक्ये पाहा.
‘सकाळी आठ वाजण्याचा सुमार असावा. मी बाहेर जाण्याच्या तयारीत होतो. इतक्यात मला तार
मिळाली. तारेत लिहिले होते. मुंबईस ताबडतोब निघून या.’
वरील पाच वाक्ये एकत्रित करुन हेच वृत्त पुढीलप्रमाणे लिहिता येईल.
‘सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मी बाहेर जाण्याच्या तयारीत असताना मला ताबडतोब मुंबईस
निघून येण्याबद्दल एक तार आली.’
सुटी – सुटी वाक्ये विस्कळीतपणे मांडण्याऐवजी ती एकत्रित करुन मांडल्याने विचारात सुसूत्रता येते व वाक्य आटोपशीर वाटते; म्हणून आपले विचार व्यक्त करताना ते एकत्रित करुन मांडल्याने त्यात व्यवस्थिपणे येत असेल तर वाक्य संकलनाची कला प्रत्येकाला अवगत असणे आवश्यक होय.
वाक्यसंकलानाच्या वेळी दोन किंवा अधिक वाक्ये एकत्र केल्यानंतर जे एक जोडवाक्य तयार होते ते केवल, मित्र किंवा संयुक्त यांपैकी एखादे असते; म्हणजेच वाक्यसंकलन तीन प्रकारचे असते.
(१) दोन किंवा अनेक केवलवाक्यांचे एक केवलवाक्य बनविणे.
(२) दोन किंवा अनेक केवलवाक्यांचे एक मिश्र वाक्य बनविणे.
(३) दोन किंवा अनेक केवलवाक्यांचे एक संयुक्त वाक्य बनविणे.
(१) दोन किंवा अनेक केवलवाक्यांचे एक केवलवाक्य बनविणे.
केवलवाक्यात एकच मुख्य क्रियापद असावे लागते. म्हणजे दिलेल्या वाक्यांपैकी एका वाक्यातील क्रियापद मुख्य ठेवून वाक्यांतील क्रियापदांची धातुसाधिते, नामे, विशेषणे किंवा क्रियाविशेषणे आपणास बनवावी लागतात.
पुढील वाक्ये पाहा.
(१) तो फरशीवरुन चालत होता. त्याचा पाय घसरला. तो पडला.
(२) फरशीवरुन चालत असताना पाय घसरुन तो पडला.
वरील वाक्य क्र . १ मध्ये तीन छोटी वाक्ये आहेत. वाक्य क्र. २ मध्ये त्या तीन केवलवाक्यांचे आपण एक केवलवाक्य बनविले आहे. हे करताना आपण काय केले? तिस-या वाक्यातील ‘पडला’ ही मुख्य क्रिया असल्यामुळे ते क्रियापद आहे तसे ठेवले व उरलेल्या दोन वाक्यांचे शब्दसमूह बनवावे लागले. हे करताना पहिल्या वाक्यातील ‘होता’ या क्रियापदाचे ‘असताना’ हे ‘ ताना’ प्रत्ययान्त धातुसाधित किंवा कृदन्त ठेवले व दुस-या वाक्यातील ‘घसरला’ या क्रियापदाचे ‘घसरुन’ असे ‘ऊन’ प्रत्ययान्त धातुसाधित ठवले. ‘असताना’ व ‘घसरुन’ ही दोन्ही कृदन्ते क्रियाविशेषणाचे कार्य करतात. पडण्याची क्रिया केव्हा घडली व कशी घडली अशी क्रियेचा काळ व रीत ती दाखवितात. म्हणजे वरील तीन वाक्यांचे एक वाक्य बनविताना आपण तिसरे वाक्य आहे तसेच ठेवले व पहिल्या दोन वाक्यांतील क्रियापदांची धातुसाधिते बनवून त्यांचे क्रियाविशेषणदर्शक शब्दसमूह बनविले. शेवटी तयार झालेल्या वाक्यात ‘पडला’ हे एकच मुख्य क्रियापद असल्यामुळे ते एक केवलवाक्य बनले.
पुढील वाक्ये पाहा.
(१) माझ्या आजीने मला एक डबा पाठविला. त्यात खाण्याचे गोड पदार्थ होते.
(२) माझ्या आजीने मला गोड खाऊचा एक डबा पाठविला
प्रारंभी दिलेल्या दोन वाक्यांचे एक केवलवाक्य बनविताना पहिले वाक्य आहे तसेच ठेवले व दुस-या वाक्यातील ‘त्यात खाण्याचे गोड पदार्थ होते’ या वाक्याऐवजी ‘गोड खाऊचा’ असा शब्दसमूह बनविला. हे बनविताना ‘खा’ ला धातूला ‘ऊ’ हा प्रत्यय लावून ‘खाऊ’ हे कृदन्त नाम बनविले व नंतर ‘खाऊचा’ असे त्याचे विशेषण तयार केले. त्यामुळे वाक्य क्र. २ हे केवलवाक्य तयार झाले. या वाक्यात ‘धातुसाधित विशेषणाचा’ वापर केला आहे.
पुढील वाक्ये पाहा.
(१) मी चहा पितो. माझ्या वडिलांना ते आवडत नाही.
(२) माझे चहा पिणे माझ्या वडिलांना आवडत नाही.
वाक्य क्र.१ मधील दोन वाक्यांचे संकलन करताना दुसरे वाक्य आहे तसेच ठेवून पहिल्या वाक्यातील ‘पितो’ या क्रियापदाचे ‘पिणे’ हे ‘णे’ प्रत्ययान्त कृदन्त नाम बनविले व ‘मी चहा पितो.’ या वाक्याऐवजी ‘माझे चहा पिणे’ हा धातुसाधित नामदर्शक शब्दसमूह तयार केला. (‘चहा पिणे’ या ऐवजी ‘चहापान’ असा शब्दही ठेवता येतो.)
वरील तीन वाक्यांत आपण केवलवाक्ये बदलून त्याऐवजी कृदन्त नामे, कृदन्त विशेषणे किंवा क्रियाविशेषणे वापरुन शब्दसमूह तयार केले व त्यांचा वापर करुन वाक्यसंकलनाने केवलवाक्येच तयार केली.
केवलवाक्य बनविण्याचा आणखी एक प्रकार पाहा.
(१) रवींद्रनाथ टागोर हे थोर कवी होते. रवींद्रनाथांनी ‘गीतांजली’ हे काव्य लिहिले.
(२) गीतांजलीचे लेखक, रवींद्रनाथ टागोर, हे थोर कवी होते.
वाक्य क्र. १ मधील ‘रवींद्रनाथांनी गीतांजली हे काव्य लिहिले’ या वाक्याऐवजी वाक्य क्र. २ मध्ये ‘गीतांजलीचे लेखक’ हा शब्दसमूह घातला आहे. ‘गीतांजलीचे लेखक’ म्हणजेच रवींद्रनाथ टागोर. एखाद्या नामाचे स्पष्टीकरण करणा-या त्याच अर्थाच्या शब्दास समानाधिकार (Noun in apposition)म्हणतात. या दोन्ही शब्दांची विभक्ती एकच असते.
अशा रीतीने, दोन किंवा अधिक वाक्यांचे संकलन एका केवलवाक्यात करताना वाक्यांच्याऐवजी धातुसाधित नामे, विशेषणे किंवा समानाधिकरणात्मक शब्द किंवा शब्दसमूह वापरावे व नवीन वाक्यात एकच क्रियापद असल्याची खात्री करुन घ्यावी.
अनेक केवलवाक्यांचे एक केवलवाक्य कसे करावे याची काही उदाहरणे खाली दिली आहेत. वरीलपैकी कोणत्या प्रकाराने ती बनविली आहेत ते सूक्ष्मपणाने पाहा.
(१) पुष्कळ वर्षे झाली. मी कॅशियाचे रोप आणाले. बागेत एका कोप-यात ते लावले. याची मला मोठी आवड होती.
(पुष्कळ वर्षांपूर्वी मोठ्या आवडीने कॅशियाचे रोप आणून मी ते बागेत एका कोप-यात लावले.
(२) हिवाळ्याचे दिवस असावेत. पहाटेची वेळ असावी. अगस्त्याचा तारा नजरेस येतो. तो मोठा ठळक तारा आहे. तो आकाशात दक्षिणेकडे राहणारा तारा आहे.
(हिवाळ्यात पहाटे आकाशात दक्षिणेकडे एक मोठा चमकणारा अगस्त्याचा ठळक तारा नजरेस येतो.
(३) मी नोकरीतून निवृत्त झालो. मला थोडी फुरसत मिळाली. सुताराकडून एक छानदार झोपाळा तयार करवला. त्याची बागेत स्थापना केली.
(नोकरीतून निवृत्त झाल्यावर फुरसत मिळताच सुताराकडून एक छानदार झोपाळा तयार करवून घेऊन त्याची मी बागेत स्थापना केली.
(४) बाबांनी मला तेथल्या एका माणसाची ओळख करुन दिली. त्याने हे कोहळे पिकवले. एकेक कोहळा किती किलोचा म्हणता ? – चाळीस. (चाळीस किलोचा एकेक कोहळा पिकविणा-या तेथल्या एका माणसाची बाबांनी मला ओळख करुन दिली.)
(२) संयुक्त वाक्य बनविणे
दोन किंवा अधिक केवलवाक्यांचे एक संयुक्त वाक्य बनविताना त्यांना जोडणारी योग्य अशीच उभयान्वयी अव्यये वापरावयास हवीत. उभयान्वयी अव्यये ही दोन प्रकारची आहेत. (१) प्रधानत्वबोधक व (२) गौणत्वबोधक. ¹ केवळ प्रधानत्वबोधक उभयान्वयी अवये योजल्याने बनणारे वाक्य केवळ – ‘संयुक्तवाक्य’ होते. प्रधानत्वबोधक व गौणत्वबोधक अशी दोन्ही प्रकारची उभयान्वयी अव्यये वापरल्यास ते ‘मिश्र संयुक्त’ वाक्य होते. या दोन्ही प्रकारांना ‘संयुक्त वाक्य’च म्हणतात.² मात्र दोन वाक्ये जोडताना
(१) याबद्दलच्या विस्तृत विवेचनासाठी ‘उभायान्वयी अव्यये’ पृष्ठ ११७पाहा.
(२) याबाबतचे विस्तृत विवेचन ‘वाक्यपृथक्करण’ पृष्ठ १६९ पाहा.
त्या दोन वाक्यांतील संबंध सूचित करणारी योग्य अशी अभयान्वयी अव्यये योजिली पाहिजेत. प्रधानत्वबोधकात चार प्रकार आपण पाहिलेः
(१) समुच्चयबोधक – ‘आणि, व’ यांसारखे.
(१) विजा चमकू लागल्या. पावसाला सुरुवात झाली.
(२) विजा चमकू लागल्या. आणि पावसाला सुरुवात झाली.
(२) विकल्पबोधक – ‘अथवा, किंवा’ यांसारखे.
(१) लोक आपली स्तुती करोत. लोक आपली निंदा करोत.
(२) लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा करोत.
(३) न्यूनत्व (विरोध) बोधक – ‘पण, परंतु, परी’ यांसारखे
(१) आपण मरावयास हरकत नाही. आपण कीर्तिरुपाने उरावे.
(२) मरावे परी कीर्तिरुपे उरावे.
(४) परिणामबोधक – ‘म्हणून, सबब’ यांसारखे.
(१) वाटेत मोटार नादुरुस्त झाली. मला यावयास उशीर झाला.
(२) वाटेत मोटार नादुरुस्त झाली.म्हणून मला यावयास उशीर झाला.
(३) मिश्र वाक्य बनविणे
जर दोन वाक्ये गौणत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असतील तर मिश्रवाक्य तयार होते. गौणत्वबोधक उभयान्वयी अव्यये चार प्रकारची आहेत. ¹
(१) स्वरुपबोधक – ‘कि, म्हणून, म्हणजे’ यांसारखे.
(१) गुरुजी म्हणाले, पृथ्वी सूर्याभोवती फिरते.
(२) गुरुजी म्हणाले की, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. (मिश्रवाक्य)
(२) कारणबोधक – ‘कारण, का, की, कारण की’ यांसारखे.
(१) विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला. त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला.
(२) विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला कारण त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला होता. (मिश्रवाक्य)
(३) उद्देशबोधक – ‘म्हणून, सबब , यास्तव’ यांसारखे.
(१) आमचे शरीर सुदृढ व्हावे. आम्ही योगासने करतो.
(२) आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. (मिश्रवाक्य)
(१) याबाबतचे विस्तृत विवेचन ‘उभयान्वयी अव्यये’ पृष्ठ ११७ पाहा.
(४) संकेतबोधक – ‘जर – तर, जरी – तरी’ यांसारखे.
(१) उद्या सुटी मिळेल. मी तुझ्या घरी येईन.
(२) उद्या सुटी मिळाली तर मी तुझ्या घरी येईन. (मिश्रवाक्य)
केवळ मिश्रवाक्य बनवायचे असल्यास उपयोजिले जाणारे उभयान्वयी अव्यय हे गौणत्वबोधकच असावयास हवे; पण प्रधानबोधक व गौणत्वबोधक अशी दोन्ही प्रकारची उभयान्वयी अव्यये वापरुन बनविलेल्या वाक्यास मराठीत ‘संयुक्त – वाक्य’ असेच म्हणतात. इंग्रजीत अशांना mixed असेही म्हणतात.
अशा प्रकारची काही वाक्ये व त्यांचे संकलन खाली दिले आहे. त्यांचा सूक्ष्मपणे अभ्यास करा.
(१) एकंदर किती भाजी मिळाली? म्हणून माझ्या मित्रांनी विचारले. चळवळीच्या चार शेंगा आल्या. मी हे वृत्त उत्साहाने सांगितले.
संकलन – ‘एकंदर किती भाजी मिळाली?’ म्हणून माझ्या मित्रांनी विचारले, तेव्हा चळ्वळीच्या चार शेंगा आल्याचे वृत्त मी उत्साहाने सांगितले. (मिश्र)
(२) अडीच रुपयांचे मी बी पेरले. दोन पैशांचीही भाजी मिळाली नाही. हे त्यांनी ऐकले. त्यांना हसू आवरेना. माझी मुळी निराशा झालेली नव्हती.
संकलन - अडीच रुपयाचे बी पेरुन दोन पैशांचीही भाजी मिळाली नाही हे ऐकून त्यांना हसू आवरेना, पण माझी मुळी निराशा झालेली नव्हती. (मिश्र + केवल)
(३) आपण बी पेरतो. नंतर कोंब फुटतो. हिरवीगार वेल डोळ्यांसमोर गरगरा वाढत जाते. हे आपण पाहतो. आपल्याला आनंद होतो. हा आनंद अलौकिक असतो.
संकलन – बी पेरल्यानंतर कोंब फुटतो नि हिरवीगार वेल डोळ्यांसमोर गरगरा वाढत जाते, हे पाहताना होणरा आनंद अलौकिक असतो. (केवल + मिश्र)
(४) हे तत्त्व साधं आहे. त्याचा अर्थ समजला पाहिजे. ते दुधारी तलवारीसारखं आहे . ते कापत जातं
संकलन – हे तत्त्व साधं आहे, पण त्याचा अर्थ समजला तर ते दुधारी तलवारीसारखं कापत जातं (केवल + मिश्र)
(५) तू अशक्त आहेस का? भरपूर खेळ, व्यायाम घे.
संकलन - तू अशक्त असशील तर भरपूर खेळ आणि व्यायाम घे. (मिश्र+ केवल)
(६) मी बोलत होतो. त्यांना ते आवडते का? माझी ते थट्टा करतात का? मला हे प्रथम कळेना.
संकलन - मी बोलतो आहे हे त्यांना आवडते आहे की ते माझी थट्टा करताहेत हेच प्रथम मला कळेना. (मिश्र + मिश्र)
अभ्यासासाठी काही वाक्ये पाहूया
(१) (१) अर्जुनाने फिरत्या मत्स्याच्या डोळ्याचा नेम धरला.
(२) अर्जुनाने बाण मारला.
वरील दोन वाक्यांचे एक केवलवाक्य पुढीलप्रमाणे होईल.
अर्जुनाने फिरत्या मत्स्याच्या डोळ्याचा नेम धरुन बाण सोडला.
(२) (१) हे आधुनिक लोकशाहीचे युग आहे.
(२) या युगात समाजाने वेळीच जागृत व्हावे.
(३) समाजाने आपला योग्य मार्ग सुधारावा.
वरील वाक्यांचे एका केवलवाक्यात पुढीलप्रमाणे रुपांतर करता येईल.
या आधुनिक लोकशाहीच्या युगात समाजाने जागृत होऊन आपला योग्य मार्ग सुधारावा.
(३) (१) हा श्रीमंताचा पोर आहे. (२) तो आहे खुळा.
(३) आमची स्थिती तशीच आहे.
या वाक्यांचे एक केवलवाक्यात पुढीलप्रमाणे रुपांतर करता येईल.
आमची स्थिती ह्या श्रीमंताच्या खुळ्या पोरासारखी आहे.
(४) (१) एकाने माणसे मोजून पाहिली. (२) ती नऊच भरली.
वरील वाक्यांचे एका संयुक्त वाक्यात पुढीलप्रमाणे रुपांतर करता येईल.
एकाने माणसे मोजून पाहिली पण ती नऊच भरली.
(५) (१) आम्हांला नेण्यासाठी जहाज आले.
(२) आम्ही बचावलो.
वरील वाक्यांचे एका संयुक्त वाक्यात पुढीलप्रमाणे रुपांतर करता येईल.आम्हांला नेण्यासाठी जहाल आहे म्हणून आम्ही बचावलो.
वाक्यासंश्लेषण
वाक्य रूपांतरण
‘वाक्यरुपान्तर’ या प्रक्रियेला ‘वाक्यपरिवर्तन’ असेही नाव आहे. वाक्यरुपान्तर म्हणजे दिलेल्या वाक्याच्या रुपात किंवा रचनेत केलेला बदल. आपण बोलतो किंवा लिहितो म्हणजे आपण आपले विचार क्रमाने व्यक्त करतो. अपला संपूर्ण विचार म्हणजे एकेक वाक्य . ही वाक्ये जर एकाच स्वरुपाची असतील तर एक संपूर्ण विचार म्हणजे एकेक वाक्य. ही वाक्य जर एकाच स्वरुपाची असतील ऐकणा-याला किंवा वाचणा-याला ती कंटाळवाणी वाटतील. आपले बोलणे किंवा लिहिणे एकसुरी होऊ नये म्हणून वाक्यरचनेत बदल करणे आवश्यक ठरते. आपली सर्वच वाक्ये केवळ विधानार्थी न ठेवता अधूनमधून ती प्रश्नार्थक किंवा उद् गारार्थी असावीत. होकारार्थी वाक्याबरोबरच मधूनच एखादे नकारार्थी विधान असावे. छोटी छोटी वाक्ये केव्हा एकत्र करुन आटोपशीरपणे मांडावीत तर एका मोठ्या वाक्यातून क्लिष्ट विचार मांडण्याऐवजी तो सुगम करुन सांगण्यासाठी केव्हा छोटी छोटी वाक्ये योजावी. वाक्यांतील अशा विविधतेमुळे आपली भाषा डौलदार आणि परिणामकारक होते. आपल्या बोलण्यातून, लिहिण्यातून भाषेचा डौल, भाषेचे सौंदर्य व्यक्त व्हावे. भाषा अशा रीतीने वापरण्याची, भाषा सुदंर असावी अशा जाणिवेतून तिचा वापर करण्याची इच्छा माणसात जन्मजात असते.तिचा विकास घडवून आणण्यासाठी, परिणामकारकपणे भाषेचा वापर करण्यासाठी व्याकरणाच्या अभ्यासाचा खूपच उपयोग होतो. आपल्या अशा प्रयत्नांना त्यामुळे डोळसपणा येतो. भाषा सुंदर रीतीने वापरणे ही माणसाची गरजही आहे, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. त्या दृष्टीने व्याकरणाचा अभ्यास आपल्याला उपयुक्त , मार्गदर्शक ठरु शकतो. निसर्गाने एखाद्याला प्रतिभेचे वरदान दिलेले असते. त्यामुळे त्याला नवनव्या कल्पना सुचतात; स्फुरतात. त्यांचा आविष्कार करण्यासाठीही भाषा हेच माध्यम आवश्यक असते. अशा प्रतिभावंतांनाही व्याकरणाच्या अभ्यासाने आपल्या अभिव्यक्तीमध्ये डोळसपणा आणता येईल. वाक्यारुपान्तर म्हणजे वाक्यरचनेत करावा लागणारा बदल. हा बदल करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी. ती म्हणजे, वाक्याचे रुपान्तर करताना रचनेत बदल होत असला, तरी वाक्याच्या अर्थात मोळी बदल होता कामा नये. वाक्यार्थाला बाध न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्यरुपान्तर होय. उदा. ‘तो घरी खात्रीने येईल.’ असे आपणांस म्हणावयाचे आहे. हे वाक्य होकारार्थी आहे.ते नकारार्थी करावयाचे झाल्यास ‘तो घरी खात्रीने येणार नाही.असे करुन चलणार नाही. हे वाक्य नकारार्थी होईल, पण त्यामुळे मूळ वाक्याचा अर्थ पूर्णपणे बदलेल. इतकेच नव्हे तर ते विरुध्दार्थी होईल; म्हणून वाक्याच्या रुपात बदल तर करावयाचा मात्र अर्थ तोच कायम ठेवायचा . या पध्दतीने वरील वाक्याचे रुपान्तर ‘तो घरी आल्याशिवाय रहायचा नाही.’ असे होईल. वाक्यरुपान्तरामुळे मूळ अर्थ कायम तर ठेवायचा शिवाय वाक्य डौलदार व परिणामकारक झाले पाहिजे . जसे – ‘माझा आळस तुला माहीत आहे. या विधानार्थी वाक्याचे रुपांतर ‘माझा आळस तुला नव्याने का सांगायला हवा? असे प्रश्नार्थक केल्याने मूळ वाक्य अधिक खुलून दिसते. आपले विचार अधिक आकर्षक रीतीने जर मांडायचे तर वाक्याचे रुपांतर विविध त-हेने करता येणे आवश्यक आहे.त्यांतील काही प्रकार पुढीलप्रमाणे : (१) प्रश्नार्थ व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रुपांतर (२) उद् गारार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रुपांतर (३) होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे परस्पर रुपांतर (४) कर्तरी व कर्मणी प्रयोगांचे परस्पर रुपांतर (५) मुख्य व गौण वाक्यांचे परस्पर रुपांतर (६) केवल, संयुक्त व मिश्र वाक्यांचे परस्पर रुपांतर (७) शब्दांचा प्रकार बदलून वाक्यरचना योजणे. (८) अनेक शब्दांऐवजी एक शब्द योजणे . असे कितीतरी प्रकार संभवतात. त्याचे क्रमाने विवेचन पुढे दिले आहे. (१) प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रुपान्तर जगी सर्वसूखी असा कोण आहे ? (प्रश्नार्थी) जगात सर्वसुखी असा कोण नाही? (विधानार्थी) नेहमीच्या व्यवहारात आपण अनेक प्र्श्न विचारतो : तू कोठे चाललास ? तुला किती गुण मिळाले प्रकृती आता कशी आहे?......वगैरे. प्रश्न विचारल्यानंतर आपणांला त्यांची काही उत्तरे हवी असतात म्हणजे उत्तराच्या अपेक्षेने असे प्रश्न विचारले जातात. ‘जगी सर्वसूखी असा कोण आहे ? या प्रश्नाचे उत्तर ‘मी आहे’ असे द्यायचे नसते. हा प्रश्न उत्तराच्या अपेक्षेने विचारण्यात आला नसून त्या प्रश्नातच त्याचे उत्तर दडलेले असते. ‘जगात कोणीच सुखी नाही’ असे लेखकाला स्पष्ट म्हणायचे आहे पण प्रश्न विचारल्यामुळे मूळचे साधे विधान किती जोरदार झाले आहे पाहा! वरील वाक्यात होकारार्थी प्रश्न विचारला आहे; मात्र त्याने सूचित केलेले उत्तर नकारार्थी आहे. दुसरे उदाहरण पाहाः अपमान केल्यास कुणाला राग येत नाही ? (नकारार्थी प्रश्न ) अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच ? (होकारार्थी विधान ) अशा त-हेचा प्रश्न नकारार्थी असला तर त्याचे विधानार्थी उत्तर होकारार्थी असते. हा ‘प्रश्न’ अलंकार म्हणून भाषेत सोळखला जातो. पुढील वाक्ये पाहाः (१) फुकट दिले तर कोण नको म्हणेल? (…. कोणी नको म्हणणार नाही.) (२) आम्ही तुमचे उपकार कसे विसरु? (…. मुळी विसरणार नाही. ) (३) कुणी कोडे माझे उकलिल का? ( …. कुणी उकलणार नाकी.) (४) आपण त्यांच्याकडे जायला नको का . (…. अवश्य जायला हवे.) (५) मुलांच्या अभ्यासाची काळजी नको का ? (… जरुर काळजी घ्यायला हवी.) प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रुपान्तर करायचे असल्यास, प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी ठेवावे व प्रश्न नकारार्थी असल्यास त्याचे उत्तर म्ह्णून विधानार्थी वाक्य होकारार्थी ठेवावे. (२)उद् गारार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रुपान्तर पुढील वाक्ये पाहाः (१) केवढी उंच इमारत ही! (ही इमारत खूप उंच आहे.) (२) काय उकडले हो काल रात्री (काल रात्री मनस्वी उकडले .) (३) आज गाडीत कोण गर्दी! (आज गाडीत अतोनात गर्दी होती.) (४) काय अक्षर आहे त्याचे ! (त्याचे अक्षर अतिशय सुदंर आहे.) वरील वाक्यांतील विधाने उद् गारार्थी आहेत. तीच कंसात विधानार्थी ठेवलेली आहेत. कंसातील विधानार्थी ठेवलेली आहेत. कंसातील विधानार्थी वाक्ये उद् गारार्थी ठेवल्यामुळे कशी परिणामकारक वाटतात. पाहा. ‘अरेरे !फार वाईट गोष्ट झाली !’ अशासारख्या उद् गारार्थी वाक्यात केवळ भावना व्यक्त केलेल्या असतात पण वर दिलेल्या वाक्यांत भावनेपेक्षा वैपुल्य, अतिशयता, मोठी संख्या, परिमाण किंवा आधिक्य परिणामकारक रीतीने व्यक्त झालेले असते. केव्हा – केव्हा मनातील तीव्र इच्छा व्यक्त करण्यासाठी उद् गारार्थी वाक्य वापरलेले असते. उदा. मला लॉटरीत लाख रुपये मिळाले तर! (…. मिळावेत अशी तीव्र इच्छा आहे.) मी राज्याचा मुख्यमंत्री असतो तर! ( …. होण्याची फार फार इच्छा आहे.) एखाद्या गोष्टीतील अतिशयता किंवा ‘खूप, अतोनात, मनस्वी, फार’ अशा अर्थांच्या भावना किंवा तीव्र इच्छा व्यक्त करण्यासाठी उद् गारार्थी वाक्य वापरतात. अशा उद् गारार्थी वाक्याचे साधे विधानार्थी वाक्य ठेवताना कोणत्या गोष्टीची विपुलता व्यक्त करायची आहे ते स्पष्ट करावे. (३)होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे परस्पर रुपान्तर पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. (होकारार्थी) पाचशे रुपये ही काही लहान रक्कम नव्हे.(नकारार्थी) दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे पण दुसरे वाक्य अधिक परिणामकारक वाटते .हे करताना आपण पहिल्या वाक्यातील ‘मोठी’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ‘लहान’ हा वापरला व वाक्याचा अर्थ बदलू नये म्हणून ‘नव्हे’ हा नकारार्थी बदल शब्द घातला. दुसरे उदाहरण पाहा. ही काही वाईट कल्पना नाही .(नकारार्थी) ही कल्पना ब-यापैकी आहे. (होकारार्थी ) येथे नकारार्थी वाक्याचे होकारार्थी करताना ‘वाईट’ चा विरुध्दार्थी शब्द ‘बरा’ वापरुन पहिल्या वाक्यातील नकार काढून टाकून दुस-या वाक्यातील विधान होकारार्थी केले आहे. म्हणजे विरुध्दार्थी शब्दाच्या मागे नकारार्थी शब्द ठेवला तर मूळचा होकारार्थी विधानाचा अर्थ कायम राहतो. विरुध्दार्थी शब्द बनविण्याचे प्रकार दोन आहेत. (१) शब्दाच्या मागे ‘अ, अन्, न, ना, बे, गैर, विना’ यांसारखे उपसर्ग जोडूनः (१) मंगल – अमंगल (२) आदर – अनादर (३) कळत –नकळत (४) लायक – नालायक (५) जबाबदार – बेजबाबदार (६) वापर- गैरवापर (७) सायास – विनासायास (८) तक्रार – बिनतक्रार (२) विरुध्द अर्थाचा दुसरा शब्द वापरुनः (१) श्रीमंत - दरिद्री (२) जलद - सावकाश (३) सुरुवात - शेवट (४) स्वीकारणे - नाकारणे (५) ज्येष्ठ - कनिष्ठ (६) नफा – तोटा पुढील वाक्ये पहाः (१) हे आम्हाला सोयीचे नाही .(…गैरसोयीचे आहे.) (२) तो कोठे न थाबंता बोलला. ( ..तो अस्खलित बोलला.) (३) त्याला येथे थांबवा . (पुढे जाऊ देऊ नका.) (४) त्याचा अर्ज फेटाळण्यात आला. (….. स्वीकारण्यात आला नाही) (४)प्रयोगांचे परस्पर रुपान्तर मराठीत मुख्य प्रयोग तीनः (१) कर्तरी , (२) कर्मणी व (३) भावे. या प्रयोगाचे परस्पर रुपान्तर करता येईल. उदा. ‘रामा पुस्तक वाचतो’ या कर्तरिप्रयोगातील वाक्याचे रुपान्तर कर्मणिप्रयोगात करावयाचे तर ‘रामाने पुस्तक वाचले’असे होईल. म्हणजे काळात बदल हा करावाच लागतो. त्यामुळे तोच मूळ अर्थ कायम राहात नाही.मात्र ज्याला आपण कर्मकर्तरी प्रयोग म्हणतो तो करताना काळ बदलावा लागत नसला तरी मराठीला अपरिचित अशी वाक्यरचना करावी लागते . उदा. (१) मांजर उंदीर पकडते. (कर्तरी) उंदीर मांजराकडून पकडला जातो. (कर्मकर्तरी) (२) मी चहा घेतला. (कर्मणी) माझ्याकडून चहा घेतला गेला. (कर्मकर्तरी) (३) रामाने रावणास मारले. (भावे) रावण रामाकडून मारला गेला. (कर्मकर्तरी) (५) मुख्य व गौण वाक्यांचे परस्पर रुपान्तर मुख्य वाक्य व गौणवाक्य कशास म्हणतात हे वाक्यपृथक्करणाच्या पाठात आपण शिकलो. वाक्याचा अर्थ न बदलता त्याचे परस्पर रुपान्तर करता येणे शक्य आहे. उदा. (१) जेव्हा शाळेची घंटा झाली तेव्हा मी वर्गात जाऊन पोहलो होतो. जेव्हा मी वर्गात जाऊन पोचलो तेव्हा शाळेची घंटा अद्याप व्हायची होती. ( पहिल्या वाक्यातील गौणवाक्य दुस-या वाक्यात मुख्य वाक्य व्हायची होती. (२) घड्याळात नऊ वाजतात तोच नळाचे पाणी गेले. जेव्हा नळाचे पाणी गेले तेव्हा घड्याळात बरोबर नऊ वाजले होते. (३) जे जे चकाकते ते ते सोने नव्हे . जे जे सोने नसते ते देखील केव्हा केव्हा चमकते. (६) केवल, संयुक्त व मिश्र वाक्यांचे परस्पर रुपान्तर केवल वाक्ये दिली म्हणजे त्यांचे एक संयुक्त किंवा मिश्र वाक्य कसे करावे हे आपण ‘ वाक्यसंश्लेषण’ या मागील पाठात शिकलो. त्याचे पुन्हा विवेचन करण्याची जरुरी नाही . वाक्यसंश्लेषण किंवा वाक्यसंकलन हा वाक्यरुपान्तराचाच एक भाग होय. जसे, सुटी वाक्ये : - (१) मला ताप आला आहे. (२) मी शाळेस येणार नाही. केवल वाक्य : - मला ताप आल्यामुळे मी शाळेस येणार नाही. संयुक्त वाक्य : - मला ताप आला आहे म्हणून मी शाळेस येणार नाही. मिश्र वाक्य : - मी शाळेस येणार नाही, कारण मला ताप आला आहे (७) शब्दांची जात बदलून वाक्यरचना करणे. शब्दांच्या जाती आठ म्हणजे त्यांची कार्ये आठ. एकच शब्द निरनिराळ्या वाक्यांत निरनिराळी कार्ये करताना आढळतो. म्हणजे त्या – त्यावेळी त्या शब्दाची जात बदलते पण अर्थामध्ये बदल होत असतो. शब्दाच्या बदल न करता शब्दाची जात बदलता येणे शक्य आहे. उदा. (१) श्रीमंत माणसांना गर्व असतो. (विशेषण) श्रीमंतांना गर्व असतो. (नाम) (२) त्याच्या डोळ्यांत पाणी आले. (नाम) त्याचे डोळे पाणावले. (क्रियापद) (३) मी कागद टरकावून फेकून दिला. (क्रियाविशेषण) मी कागद टरकावला व फेकून दिला. (क्रियापद) (४) हा मुलगा हुशार आहे. (विशेषण) हा हुशार मुलगा आहे. (सर्वनाम) (८)अनेक शब्दांऐवजी एक शब्द योजणे अनेक शब्दांऐवजी एक शब्द किंवा सामाजिक शब्द वापरुन शब्दांच्या काटकसरीने भाषा डौलदार किंवा अर्थवाही बनविता येते. उगाच शब्दांचा पाल्हाळ न करता एका शब्दात सारा अर्थ सामावता आल्यास भाषेत सुटसुटीपणाबरोबरच एक प्रकारची ऐट येते. खालील उदाहरणे पाहा- (१) पंधरा दिवसांतून एकदा भरणारी अशी आमची बैठक असते. ( = आमची पाक्षिक बैठक असते.) (२) त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही असा तो योध्दा होता ( = तो अद्वितीय योध्दा होता.) (३) निराश्रित मुलांना आश्रय देणारी अशी एक संस्था त्यांनी काढली ( = त्यांनी एक अनाथालय काढले.) (४) जिचा नवरा वारला आहे अशी ती स्त्री आहे (= ती विधवा आहे.) अशा त-हेची वाक्यरचना करावयास सांगून विद्यार्थ्यांची शब्दसंपती अजमावता येते. शब्दसमूहाऐवजी एक शब्द वापरल्याने वाक्याच्या रचनेत केव्हा फरक पडतो. उदाहरणार्थ, त्या बाईला आता कोणती इच्छा राहिली नाही. (ती बाई निरिच्छ आहे.) या वाक्यात मूळचे नकारार्थी वाक्य होकारार्थी बनले आहे. दुसरे उदाहरण पाहाः या पुस्तकाच्या छपाईत कोणत्याच प्रकारचे दोष नाहीत ( = या पुस्तकाची छपाई निर्दोष आहे.) खाली आणखी काही शब्द व ते ज्यांच्याबद्दल वापरले आहेत असे शब्दसमूह दिले आहेत. निउत्रिक – ज्याला मुलेबाळे नाहीत असा. कृतघ्न - केलेले उपकार जो जाणत नाही असा. हुतात्मा - देशासाठी प्राणार्पण करणारा मनुष्य. सहोदर - एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे असे. अवर्णनीय – ज्याचे वर्णन करता येणे शक्य नाही असे. सनातनी - जुन्या रुढी व चालीरीती यांना अनुसरुन वागणारा. समकालीन - एकाच काळात ह्यात असलेले. निरक्षर - ज्याला लिहिता व वाचता मुळी येत नाही असा. बहुश्रुत - ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा. शेजारधर्म - शेजा-यांशी चांगल्या त-हेने वागण्याची पध्दत. (वाक्यरुपान्तर, वाक्यसंश्लेषण व वाक्यपृथक्करण ही सदरे अस्सल मराठी भाषेतील नव्हेत. इंग्रजी व्याकरणावरुन मराठीत ही सदरे घेण्यात आली आहे. मराठीच्या मोडणी व धाटणी ही काहीशी वेगळी असल्यामुळे इंग्रजी भाषेशी मिळतेजुळते घेऊन या प्रकरणातील विवेचन मराठीत करावे लागले आहे.तरीपण वाक्यरचनेच्या अभ्यासाच्या दृष्टीने ही सदरे महत्त्वाची असून विद्यार्थ्यांना लेखनप्रसंगी ही तीनही प्रकरणे निःसंशय उपयुक्त ठरतील .) सरावासाठी काही उदाहरणे ‘वाक्यरुपान्तर’ या प्रकारची काही अधिक उदाहरणे पाहूया. (१) (अ) ताहमहल खूप सुंदर आहे .(विधानार्थी) (आ) किती सुंदर आहे ताजमहल! (उद् गारार्थी) (२) (अ) तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. (विधानार्थी) (आ) तुझ्या भेटीने किती आनंद झाला! (३) (अ) पांढरा रंग सर्वांना आवडतो. (विधानार्थी) (आ) पांढरा रंग कोणाला आवडत नाही ? (प्रश्नार्थक) (४) (अ) शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी सारे काही केले. (विधानार्थी) (आ) शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काय केले नाही. (प्रश्नार्थक) (इ) शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काही करायचे बाकी ठेवले नाही. (नकारार्थी) (५) (अ) तुझे असे खराब अक्षर पाहून डोळे मिटावेसे वाटतात.(होकारार्थी) (आ) तुझे असे खराब अक्षर अगदी बघवत नाही .(नकारार्थी) (६) (अ) सहलीत खूप मजा आली.(होकारार्थी) (आ) काय मजा आली सहलीत.(उद् गारार्थी) (७) (अ) किती सुंदर मूर्ती आहे ही! .(उद् गारार्थी) (आ) ही मूर्ती खूप सुंदर आहे. (होकारार्थी) (८) (अ) गुणेशचे हे चित्र खराब आहे. (होकारार्थी) (आ) गुणेशचे हे चित्र चांगले नाही.(नकारार्थी) (९) (अ) फक्त भारतीय संघच अजिक्यं आहे.(होकारार्थी) (आ) भारतीय संघाशिवाय दुसरा कोणता संघ अजिंक्य आहे?(प्रश्नार्थक) (१०)(अ) लोकांचे अज्ञान पाहून महात्म्याला दुःख होते.(होकारार्थी) (आ) लोकांचे दुःख पाहून महात्म्याला सुखे होत नाही .(नकारार्थी)
वाक्य रूपांतरण
वृत्ते
गद्य व पद्य यांतील फरक आपल्या मनात येणारे विचार आपण भाषेद्वारे व्यक्त करतो. ही विचार व्यक्त करण्याची पध्दती दोन प्रकारची आहे : (१) आपल्या मनात जसे विचार येत जातात ते जसेच्या तसे बोलून दाखविणे. आपल्या या स्वाभाविक बोलण्याला गद्य असे म्हणतात. ( गद् = बोलणे) उदा. ‘पंढरीला दिंडी चालली पाहा’ हे वाक्य गद्य आहे. (२) हे विचार किंवा याच वाक्यातील शब्द काही ठरावीक क्रमाने लिहून ते सुरावर म्हणता येतील. अशा पध्दतीने त्याची रचना केली तर त्याला पद्य असे म्हणतात. वरील गद्यातील वाक्याची रचना पद्यात करावयाची झाल्यास ती अशी होईल. ‘पहा दिंडी चालली पंढरीला’ गद्यामध्ये एकामागून वाक्ये येतात. तर पद्यात ओळी किंवा चरण येतात.(पाद = चरण) . जे पादयुक्त चरण असतात त्याला ‘पद्य’ असे म्हणतात पद्याचा चरण म्हणताना सारख्या अंतराने टाळी वाजवत राहावे, असे वाटते. यालाच ‘लय’ असे म्हणतात.पद्य लयबध्द असते किंवा लयबध्द शब्दरचनेला पद्य असे म्हणतात. पद्यात ही जी विशिष्ट शब्दरचना आपण करतो तिला ‘वृत्त’ किंवा ‘छंद’ असे म्हणतात. खालील पद्यरचना पाहा. सदा सर्वदा योग तूझा घडावा । तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गूणवंता अनंता । रघूनायका मागणे हेचि आता ॥ ﬞ ¯ ¯। ﬞ ¯ ¯।ﬞ ¯ ¯।ﬞ ¯ ¯। या पद्यरचनेकडे सूक्ष्मपणे पाहा. कवितेचे चार चरण (ओळी) आहेत. प्रत्येक चरणात सारखीच म्हणजे प्रत्येकात बारा – बारा अक्षरे आहेत. शिवाय प्रत्येक चरणातील अक्षरांचा –हस्व स्वर व दिर्घ यांचा क्रम सारखा आहे. (= लघुगुरुंचा क्रम सारखा आहे.)म्हणजे पहिले अक्षर –हस्व व पुढील दोन अक्षरे दीर्घ अशा क्रमाने त्यांची रचना केली आहे.या वृत्तातील प्रत्येक चरणातील अक्षरे सारखी व त्यांचा लघुगुरुक्रम (= गण) सारखा आहे. या रचनेला ‘अक्षरगणवृत्त’ असे म्हणतात. पुढील पद्यरचना पाहा. पोर खाटेवर मृत्युच्याच दारा कुणा गरिबाचा तळमळे बिचारा दूर आई राहिली कोकणात सेविकेचा आधार एक हात या पद्याचेही चार चरण आहेत; पण यातील प्रत्येक चरणातील अक्षरांची संख्या सारखी नाही. पहिल्या चरणातील अक्षरांची संख्या १२ आहे, तर दुस-या चरणातील अक्षरांची संख्या १३ आहे.तिस-या व चौथ्या चरणांत प्रत्येकी ११ अक्षरे आहेत. प्रत्येक चरणातील लघुगुरुक्रम सारखी नाही. म्हणजे हे अक्षरगणवृत्त नाही. मात्र याच्या प्रत्येक चरणातील अक्षरांच्या एकूण मात्रा मोजल्या तर त्या सारख्याच म्हणजे १९ भरतील . (‘मात्रा’ कशा म्हणतात, ते पुढे पाहू या,) या पद्यरचनेत अक्षरांपेक्षा मात्रांचे बंधन आहे. अशा पद्यरचनेला ‘ मात्रावृत्त’ किंवा ‘जाती’ असे म्हणतात. आता, तिस-या प्रकारची पद्यरचना पाहू या. पुढील पद्यरचना पाहाः चंद्राच्या गालावरी । देव लावी गालबोट। मिरविते आई । माझ्या गाली तुझे ओठ । या पद्यरचनेत छोटे चार चार चरण आहेत.यातील चरणांची अक्षरे ७, ८, ६ व ८ अशी आहेत. त्यांतील अक्षरे –हस्व असली तरी ती दीर्घ उच्चारली जातात.अशा प्रकारची जी सैल रचना आहे, तिला ‘छंद’ असे म्हणतात. पद्यरचनेचे असे तीन प्रकार आपण पाहिले. पद्यरचनेत मात्रा, गुण, लघू, गुरु, यती या ज्या संज्ञा वारंवार येतात; त्यांची आपण ओळख करुन घेऊ. मात्रा – एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी किंवा वेळ लागतो त्यास ‘मात्रा’ असे म्हणतात अक्षरांत –हस्व व दीर्घ असे दोन प्रकारचे उच्चार आहेत. सामान्य भाषेत ज्यांना –हस्व व दीर्घ असे म्हणतात त्यांना पद्याच्या भाषेत ‘लघु – गुरु’ असे म्हणतात. अ, इ उ, ॠ या –हस्व उच्चारल्या जाणा-या स्वरांस किंवा क, कि, कु, कृ यांसारख्या स्वरयुक्त अक्षरांस ‘गुरु अक्षरे’ असे म्हणतात. आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ या दीर्घ उच्चारल्या जाणा-या स्वरांस किंवा का, की कू, के, कै, को, कौ, यांसारख्या स्वरयुक्त अक्षरांस ‘गुरु अक्षरे असे म्हणतात. लघू अक्षरांची एक मात्रा व गुरु अक्षराच्या दोन मात्रा मोजतात. लघू अक्षर (ﬞ ) अशा अर्धचंद्राकृतीने व गुरु अक्षर (-) अशा छोट्या आडव्या रेषेने दाखवितात. पुढील शब्दांतील लघुगुरुक्रम व त्यांची मात्रासंख्या खाली दाखविली आहे.
शब्द लघुगुरुक्रम
मात्रा संख्या
यशोदा
ﬞ ¯ ¯
१,२,२
५
राधिका
¯ ﬞ ¯
२,१,२
५
सुमन
ﬞ ﬞﬞ ﬞ
१,१,१
३
मालन
¯ ﬞﬞ ﬞ
२,१,१
४
सरला
ﬞﬞ ﬞ ¯
१,१,२
४
मीनाक्षी
¯ ¯ ¯
२,२,२
६
‘पुस्तक’ या शब्दातील लघुगुरुक्रम ( ¯ ﬞ ﬞ ) असा आहे. कारण प्रारंभीचे ‘पु’ अक्षर लघू असले तरी पुढे ‘रस्त’ हे जोडाक्षर येत असून त्याचा किंवा जोर त्यामागील लघू स्वरावर (म्हणजे ‘उ’ वर )येत आहे. म्हणून ‘पु’ च्या दोन मात्रा मोजावयाच्या आहेत. ‘ज्ञानप्रकाश’ या शब्दातील लघुगुरुक्रम ( ¯ ﬞ ﬞ ¯ ﬞ ) असा आहे.
यातील ‘न’ ची मात्रा एकच आहे. त्याच्या पुढे ‘प्र’ हे जोडाक्षर आले असले तरी त्याचा आघात मागील अक्षरावर (म्हणजे ‘न’ वर) येत नाही . जोडाक्षरातील शेवटचा वर्ण –हस्व असेल तर ते जोडाक्षर –हस्व मानावे . भास्कर ( ¯ ﬞ ﬞ ) व दीर्घ असेल तर दीर्घ मानावे.
उदा. इच्छा ( - - ) तसेच लघू अक्षरावर अनुस्वार येत असेल किंवा विसर्ग येत असेल तर ते गुरु मानावे . कवितेतील चरणाच्या शेवटी येणारे लघू अक्षर दीर्घ उच्चरले जाते म्हणून ते दीर्घ मानावे व त्यास गुरु ( - )अशी खूण करावी
खालील शब्दांचे लघुगुरुक्रम व मात्रा कशा मांडतात ते पाहा.
शब्द लघुगुरुक्रम
मात्रा संख्या
पुस्तक
ﬞ ¯ ¯
२,१,१
४
अंगण
¯ ﬞ ¯
२,१,१
४
स्वतःचा
ﬞ ﬞﬞ ﬞ
१,२,२
५
दुःखाने
¯ ﬞﬞ ﬞ
२,२,२
६
उन्हात
ﬞﬞ ﬞ ¯
१,२,२
५
वरील सर्व माहिती लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने परशुराम पंत तात्या गोडबोले यांच्या ‘वृत्तदर्पण’ या ग्रंथातील पुढील श्लोक उपयुक्त ठरेल.
-हस्व स्वराते लघु बोलताती।
दीर्घ स्वराते गुरु नाम देती ॥
पुढे अनुस्वार विसर्ग येतो।
संयोग –हस्वास गुरुत्व देतो॥
गण – पद्याच्या चरणातील अक्षरांचा लघुगुरुक्रम मांडून वृत्ताची लक्षणे ठेरविताना त्यातील तीन अक्षरांचा एकेक गट करुन तो मांडण्याची पध्दत आहे. यांनाच गण असे म्हणतात. गण म्हणजे कवितेतील अक्षरे मोजण्याचे माप . या अक्षरांच्या गटात काही अक्षरे लघू तर काही अक्षरे गुरु असणार . म्हणून तीन अक्षरी लघुगुरुक्रमाने एकंदर आठ गण पडतात. ते
‘यमाताराजभानसलगं’
या एका सूत्रात सर्व गणांची लक्षणे एकत्र गोविलेली आहेत. यातील प्रत्येकी तीन अक्षरांचे पुढील प्रमाणे आठ गण पडतात.
यमाता
ﬞ ¯ ¯
मातारा
¯ ¯ ¯
ताराज
¯ ¯ ﬞ
राजभा
¯ ﬞ ¯
जभान
ﬞ ¯ ﬞ
भानस
¯ ﬞ ﬞ
नसल
ﬞ ﬞ ﬞ
सलगं
ﬞ ﬞ ¯
या प्रत्येक गणाच्या प्रारंभीचे अक्षर त्या गणाचे नाव आहे. याप्रमाणे या आठ गणांना य गण, म गण, याप्रमाणे य, म, त, र, ज, भ, न, स, अशी आठ नावे दिलेली आहेत.पण लघू किंवा गुरु अक्षर गणाच्या आरंभी किंवा शेवटी येण्याचा क्रम लक्षात ठेवल्यास गण ओळखणे सोपे जाते.त्या दृष्टीने पुढील मांडणी पहा.
(१) आरंभीचे अक्षर लघू यमाचा य गण (आद्य लघू) ﬞ ¯ ¯
(२) मधले अक्षर लघू राधिका र गण (मध्य लघू) ¯ ﬞ ¯
(३) शेवटचे अक्षर लघू ताराप त गण ( अंत्य लघू) ¯ ¯ ﬞ
(४) प्रत्येक अक्षर लघु नमन न गण ( सर्व लघू) ﬞ ﬞ ﬞ
(५) आरंभीचे अक्षर गुरु भास्कर भ गण (आद्य गुरु) ¯ ﬞ ﬞ
(६) मधले अक्षर गुरु जनास ज गण (मध्य गुरु) ﬞ ¯ ﬞ
(७) शेवटचे अक्षर गुरु समरा स गण ( अंत्य गुरु) ﬞ ﬞ ¯
(८) प्रत्येक अक्षर गुरु मानावा म गण ( सर्व गुरु) ¯ ¯ ¯
य, र, त, न, भ, ज, स, म, ही गणांची नावे अशी आहेत की त्यांच्या लघोगुरुच्या चिन्हांची त्यांची ओळख लक्षात राहाते; ती पुढीलप्रमाणेः-
(१) य यमाचा
ﬞ ¯ ¯
(२) र राधिका
¯ ﬞ ¯
(३) त ताराप
¯ ¯ ﬞ
(४) न नमन
ﬞ ﬞ ﬞ
(५) भ भास्कर
¯ ﬞ ﬞ
(६) ज जनास
ﬞ ¯ ﬞ
(७) स समरा
ﬞ ﬞ ¯
(८) म मानावा
¯ ¯ ¯
पहिल्या गटातील क्रमाने चार गणांची रचना आद्यलघू , मध्यलघू अत्यंगुरु व सर्वलघू अशी असून दुस-या गटातील क्रमाने चार गणांची रचना ( अनुक्रमे ५, ६, ७,८ ) आद्यलघू , मध्यलघू अत्यंगुरु व सर्वलघू अशी आहे. हेच सांगणारा पुढील श्लोक व त्यातील जाड ठशातील शब्द लक्षात ठेवण्यासारखे आहेत. हा श्लोक असा-
आदिमध्यावसानी ये / यरता लघु अक्षर ॥
भजसा तेवि गुरु ये / मन सर्व गुरु लघू ॥
गणात आदि ( = आरंभी ) , मध्ये व अवसानी (= शेवटी) लघू अक्षर येत असेल तर त्या वेळी य – र – त हे गण असतात. त्याचप्रमाणे गुरु अक्षर प्रारंभी , मध्ये व शेवटी आल्यास भ – ज – सा हे गण असतात.. सर्व गुरु असले तर ‘म’ गण व सर्व लघू अक्षरे असल्यास ‘न’ गण असतो. यरत , भजस, मन काव्यपंक्तीमध्ये एखादे अक्षर ‘लघू’ असूनही गुरु मानावे लागते.त्यासंबंधीचे नियम एकत्रितपणे पुढीलप्रमाणे सांगता येतीलः
(१) जर लघू अक्षराच्या पुढे जोडाक्षर आले व त्याचा आघात जर त्या लघू स्वरावर होत असेल तर तो लघू स्वर दीर्घ (गुरु) मानावा
उदा. : पुस्तक पण जर लघू स्वराच्यापुढे जोडाक्षर आले आणि त्याचा आघात लघू स्वरावर होत नसेल तर तो लघू स्वर कायम ठेवावा.
(२) जर अनुस्वारयुक्त स्वर आला तर त्या ज्या स्वरावर अनुस्वार असेल तो स्वर गुरु
मानावा उदा : नंतर.
(३) जर विसर्गयुक्त स्वर आला तर ज्या स्वरानंतर विसर्ग आला असेल तो स्वर
दीर्घ मानावा . उदा : दुखी
(४) जर काव्यपंक्तीच्या अखेरीस लघु स्वरयुक्त अक्षर आले व जर ते दीर्घ उच्चारले जात असेल तर ते गुरु मानावे.
उदा : ‘पखरण बघ घाली भूवरी पारिजात’
या काव्यपंक्तीमध्ये ‘पारिजात’ या शब्दातील शेवटचे अक्षर ‘त’ हे ‘त + अ’ म्हणजे लघू स्वर असलेले आहे. परंतु, येथे ते दीर्घ उच्चारले जाते म्हणून ‘त’ हे लघू न मानता ‘गुरु’ मानावे लागेल. व पारिजात याचे गण पाडताना – पारिजात असे पाडावे लागतील.
गणलेखनाची पध्दत
(१) कवितेच्या ओळीतील शब्दांचे तीन अक्षरांचे गट पाडून त्यांना लघू व गुरुच्या घुणा करुन त्याप्रमाणे गणांची नावे देतात . उदा.
काव्याची ओळ ‘मना सज्जना भक्तिपंथेचि जावे’ अशी आहे. त्याच गणलेखन पुढीलप्रमाणे होईल.
( ‘ल, ग क्रम’ म्हणजे लघू व गुरु अशा क्गुणा होत.)
लगक्रम ﬞ ¯ ¯ ﬞ ¯ ¯ ﬞ ¯ ¯ ﬞ ¯ ¯
काव्यपंक्ती मनास ज्जनाभ क्तिपंथे चिजावे
गण य, य, य, य
स्पष्टीकरण
(अ) वरील काव्यपंक्तीमध्ये ‘स’ हे अक्षर (स् + अ) लघू असूनही आपण त्याला गुरु मानून ( - ) अशी खूण केली आहे. कारण, पुढे ‘ज्ज’ हे जोडाक्षर येत असून त्याचा आघात ‘स’ वर होत आहे तसेच ‘भक्ती’ च्या बाबतीतही आहे.
(आ) ‘पंथेचि’ मध्ये ‘प’ हे अक्षर (प + अ) लघू असूनही आपण गुरु मानोन गुरु ( - ) अशी खूण केलेली आहे. कारण, ‘पंथेचि’
या शब्दातील ‘प’ या अक्षरात अ अशी खूण केलेली आहे. , ‘पंथेचि’ या शब्दातील ‘प’ या अक्षरात अ या लघू स्वरानंतर अनुस्वार आला आहे. (प् + अ +अनुस्वार)
(२) काव्यपंक्यीमध्ये तीनचे गट करुन शेवटी एक किंवा दोन अक्षरे शिल्लक राहिली तर , त्याच्या उच्चाराप्रमाणे ‘ल’ ‘ग’ असे गण मानून लघू (ﬞ ) व गुरु ( - ) अशा खुणा कराव्यात.
उदा : ‘महाराष्ट्री सृष्टी स्वविभव चतुर्मास मिरवी’ या काव्यपंक्तीचे तीन अक्षरांचे गट पाडून अखेरीस दोन अक्षरे शिल्लक राहतात.
लगक्रम ﬞ ¯ ¯ ¯ ¯ ¯ ﬞ ﬞ ¯ ¯ ﬞ ﬞ ﬞ ¯ ¯ ﬞ ¯ ¯
काव्यपंक्ती महारा ष्ट्रीसृष्टी स्वविभ वचतु र्मासमि रवी
गण य, म, न, स, भ, ल, ग
स्पष्टीकरण
वरील काव्यपंक्तीमध्ये १७ अक्षरे आहेत. त्यामुळे तीन अक्षरांचे पाच गट पाडले व दोन अक्षरे शिल्लक राहिली त्यांना उच्चाराप्रमाणे लघू व गुरु (ﬞ ¯ ) अशा खुणा करुन ‘ल’ ‘ग’ अशी गणांची नावे दिली आहेत.
यती : कवितेचा चरण म्हणत असताना आपण मध्येच काही अक्षरांनंतर थांबतो (खरे तर नैसर्गिक रीतीने थींबतो. या थांबण्याच्या जागेला किंवा विरामाला यती असे म्हणतात. ज्या क्रमांकाच्या अक्षरांनंतर आपण थांबतो.त्या क्रमांकाच्या अक्षरावर ‘यती’ आहे, असे वर्णन करतात. उदा. ‘मना सज्जना तू कडेनेच जावे’ ही काव्यपंक्ती म्हणताना आपण ‘तू’ या अक्षरानंतर थांबतो ते अक्षर सहावे आहे. म्हणून ‘सहाव्या अक्षरावर यती’ असे वर्णन केले जाते.
यतिभंग – यतीच्या जागी शब्द पूर्ण व्हावा. तो शक्यतो तोडला जाऊ नये.
यतीमुळे शब्द तोडला जात असेल तर त्या ठिकाणी ‘यतिभंग हा दोष झाला असे मानले जाते.
उदा. : बहु असोत सुदंर सं – पन्न की महा
प्रिय अमुचा एक महा – राष्ट्र देश हा
वरील काव्यपंक्तीमध्ये ‘सं- पन्न’ व ‘महा – राष्ट्र’ असे शब्द तोडावे लागले आहेत.
उदाहरण व लक्षण – आपल्याला अक्षरगण वृत्त, मात्रावृत्त व छंद यांचा अभ्यास करावयाच आहे.त्या प्रत्येकात उदाहरण व लक्षण असे भाग आहेत. त्या वृत्ताचे ‘उदाहरण’ म्हणजे त्या वृत्तातील कवितेचे कडवे होय. सामान्यतः चार चरणांचे एक कडवे होते. ते बिनचूक लिहावे . ‘चरण’ म्हणजे कवितेची ओळ. कवितेचा चरण लिहून ल – ग क्रम (लघूगुरु) द्यावेत.गण पाडून दाखवावेत. लक्षणामध्ये पुढील मुद्दे असावेत
(१) वृत्ताचा प्रकार : उदा अक्षरगणवृत्त , मात्रावृत्त , छंद
(२) गण किंवा मात्रासंख्या , मात्रारचना, छंद असल्यास अक्षर संख्या
(३) चरणातील अक्षरांची संख्या (अक्षरगणवृत्ताचे बाबतीत)
(४) कोणत्या अक्षरांवर यती येतात, त्याची माहिती
(५) लक्षणाची ओळ (सामान्यपणे अक्षरगणवृत्ताचे बाबतीत) पुढील वृत्तांची माहिती देताना पुष्कळशी कै.मा.त्रि पटवर्धन रचित उदाहरणे आहेत.
वृत्ते
(१) इंद्रवज्रा : दुखी जगा देखुनिया द्रवे ते
सच्चित माते नवनीत वाटे
अन्याय कोठे दिसता परी ते
त्या इंद्रवज्रासहि लाजवीते
लगक्रम : ¯ ¯ ﬞ । ¯ ¯ ﬞ । ﬞ ¯ ﬞ । ¯ ¯
गण : त त ज ग ग
लक्षण : हे अक्षरगणवृत्त आहे. याच्या प्रत्येक चरणात ११ अक्षरे असतात.
गण : त – त – ज - ग – ग. यती ५ व्या अक्षरावर
ता – ता – ज – गा – गा –गणि इंद्रवज्रा ।
(२) उपेंद्रवज्रा : करी कसूनी नित भूमिसेवा
तयास खायास असे नसे वा
परी तया जो अळशी विलासी
उपेंद्रवज्रासद दे मिराशी
लगक्रम : ﬞ ¯ ﬞ । ¯ ¯ ﬞ । ﬞ ¯ ﬞ । ¯ ¯
गण : ज त ज ग ग
लक्षण : हे अक्षरगणवृत्त आहे. याच्या प्रत्येक चरणात ११ अक्षरे असतात.
गण : ज – त – ज - ग – ग. यती ५ व्या अक्षरावर
ज – ता – ज – गा – गीच उपेंद्रवज्रा ।
(३) उपजाती : हे नाव दोन वृत्तांच्या मिश्रणास देतात. पुढील उदाहरणात एक चरण इंद्रवज्रेचा व दुसरा चरण उपेंद्रवज्रेचा असल्याचे आढळून येईल. केव्हा – केव्हा पहिले दोन चरण इंद्रवज्रेचे व त्याच्यापुढील दोन चरण उपेंद्रवज्रेचेही असतात.
उदा : हा जातिविध्वंसन काल आला
समानतेच्या उभवा ध्वजाला
राष्ट्रीय जो सर्व जनाभिमानी
लगक्रम : ¯ ¯ ﬞ । ¯ ¯ ﬞ । ﬞ ¯ ﬞ । ¯ ¯ (इंद्रवज्रा)
गण : त त ज ग ग
न जाति तो वा उपजाति मानी
लगक्रम : ﬞ ¯ ﬞ । ¯ ¯ ﬞ । ﬞ ¯ ﬞ । ¯ ¯
गण : ज त ज ग ग
(उपेंद्रवज्रा)
(४) भुजंगप्रयात : मना सज्जना तू कडेनेच जावे
न होऊन कोणासही दूखवावे
कुणी दृष्ट अंगास लावीत हात
तरी दाखवावा भुजंगप्रयात
लगक्रम : ﬞ ¯ ¯ । ﬞ ¯ ¯ ﬞ । ¯ ¯ ﬞ । ¯ ¯
गण : य, य, य, य
लक्षण : हे अक्षरगणवृत्त आहे. याच्या प्रत्येक चरणात १२ अक्षरे असतात.
गण : य – य – य – य. यती ६ व्या अक्षरावर.
भुजंगप्रयात ‘य’ ये चार वेळा ।
(५) द्रुतविलंबित : सवड सापडता न करी मजा,
नित हळुहळु कष्ट करीत जा.
गहन कर्मगती तुज बोलते,
द्रुतविलंबति जे श्रम फोल ते.
लगक्रम : ﬞ ﬞ ﬞ । ¯ ﬞ ﬞ । ¯ ﬞ ﬞ । ¯ ﬞ ¯
गण : न भ भ र
लक्षण : हे अक्षरगणवृत्त आहे. याच्या प्रत्येक चरणात १२ अक्षरे असतात.
गण : न - भ - भ - र यती चरणाच्या शेवटी
द्रुतविलंबित वृत्त न – भा – भ – री ।
(६) वसंततिलका : आरक्त होय फुलुनी प्रणयी पलाश
फेकी रसाल तरुही मधुगंधपाश
ऐकू न ये तुज पिकस्वर मंजुळे का?
वृत्ती वसंततिलका न तुझी खुले का?
लगक्रम : ¯ ¯ ﬞ । ¯ ﬞ ﬞ ।ﬞ ¯ ﬞ ।ﬞ ¯ ﬞ ।¯ ¯
गण : त भ ज ज ग ग
लक्षण : हे अक्षरगणवृत्त आहे. प्रत्येक चरणात १४ अक्षरे असतात.
गण : त - भ - ज - ज - ग - ग ; यती ८ व्या अक्षरावर.
येती वसंततिलका त – भ – जा – ज - गा – गा ।
(७) मालिनी : पखरण बघ घाली भूवरी पारिजात,
परिमल उधळी हा सोनचाफा दिशात;
गवतहि सुमभूषा दाखवी आज देही,
धरणि हरितवस्त्रा मालिनी साजते ही.
लगक्रम : ﬞ ﬞ ﬞ । ﬞ ﬞ ﬞ । ¯ ¯ ¯ । ﬞ ¯ ¯ । ﬞ ¯ ¯
गण : न न म य य
लक्षण : हे अक्षरगणवृत्त आहे. प्रत्येक चरणात १५ अक्षरे
गण : न - न - म - य – य ; यती ८ व्या अक्षरावर.
न - न - म - य – य गणांनी मालिनी वृत्त होते।
(८) शिखरिणी : महाराष्ट्री सृष्टी स्वविभव चतुर्मास मिरवी,
अहा ती मैदाने चिररुचिर येथे न हिरवी,
वहाती येथे न स्थिर गहन विस्तीर्ण तटिनी,
पहा सह्याचीच प्रखर गिरिराजी शिखरिणी.
लगक्रम : ﬞ ¯ ¯ । ¯ ¯ ¯ । ﬞ ﬞ ﬞ । ﬞ ﬞ ¯।¯ﬞ ﬞ । ﬞ ¯
गण : य म न स भ ल ग
लक्षण : हे अक्षणगणवृत्त आहे. प्रत्येक चरणात १७ अक्षरे असतात.
गण : य - म - न - स - भ - ल –ग ; यती ६ व १२ व्या अक्षरांवर.
जयामध्ये येती , य - म - न - स - भ – ला – गा शिखरिणी ।
(९) मंदाक्रांता : मेघांनी हे गगन भरता गाढ आषाढमासी
होई पर्युत्सुक विकल तो कांत एकांतवासी
तन्निःश्वास श्रवुन रिझवी कोण त्याच्या जिवासी ?
मंदाक्रांता सरस कविता कालिदासी विलासी
लगक्रम : ¯ ¯ ¯ । ¯ ﬞ ﬞ । ﬞ ﬞ ﬞ । ¯ ¯ ﬞ । ¯ ¯ ﬞ । ¯ ¯
गण : म भ न त त ग ग
लक्षण : हे अक्षरगणवृत्त आहे. प्रत्येक चरणात १७ अक्षरे असतात.
गण : म - भ - न - त - त - ग –ग ; यती ४ व ६ व्या अक्षरांवर.
मंदाक्रांता म - भ - न - त - त – गा – गा गणी मंद चाले ।
(१०) पृथ्वी : कुठे भटकशी घना? वळुनि ऐक केकावली
न हाक ह्रदयी तुझ्या जननिची कशी पावली?
सुकूनि विरहानले मलिन दीन साध्वी पडे,
विलंबित गति त्यजी , द्रवुनि धाव पृथ्वीकडे
लगक्रम : ¯ ¯ ¯ । ¯ ﬞ ﬞ । ﬞ ﬞ ﬞ । ¯ ¯ ﬞ । ¯ ¯ ﬞ । ¯ ¯
गण : ज स ज स य ल ग
लक्षण : हे अक्षरगणवृत्त आहे. प्रत्येक चरणात १७ अक्षरे असतात.
गण : ज - स - ज - स - य- ल –ग ; यती ८ व्या अक्षरावर.
सदैव धरिते ज – सा – ज – स – य – ल – ग पृथ्वी पदी।
(११)हरिणी : दचकुनि बघे व्याधाला जो सवत्स कुणी मृगी
चपल चरणी घे उड्डाणे, स्थिरेल कशी उगी?
जव चिमुकल्या वत्साला तो धरी, उचलूनि घे
परतुनि तया मागे पहा हरिणी निघे.
लगक्रम : ﬞ ﬞ ﬞ । ﬞ ﬞ ¯। ¯ ¯ ¯ । ¯ ﬞ ¯ । ﬞ ﬞ ¯ । ﬞ ¯ ¯
गण : न स म र स ल ग
लक्षण : हे अक्षणगणवृत्त आहे. प्रत्येक चरणात १७ अक्षरे असतात.
गण : न - स - म - र– स- ल - ग ; यती ६ व १० व्या अक्षरावर.
न – स – म – र – स त्या पुढीत येती, ल –गा , हरिणीच ती ।
(१२) शार्दुलविक्रीडित :
भाषा संस्कृति थोर एकच महाराष्ट्रा, तुझी देख रे
नाना धर्म असंख्य जाति असती अद्यापि सारे खरे
भेदांनी परि या किती दिन तुवा व्हावे त्रिधा पीडित
ताणूनी अपुले स्वरुप कर तू शार्दुलविक्रीडित
लगक्रम : ¯ ¯ ¯ । ﬞ ﬞ ¯ । ﬞ ¯ ﬞ । ﬞ ﬞ ¯ । ¯ ¯ ﬞ । ¯ ¯ ﬞ । ¯
गण : म स ज स त त ग
लक्षण : हे अक्षरगणवृत्त आहे. याच्या प्रत्येक चरणात १९ अक्षरे असतात.
गण : म - स - ज - स - त- त –ग ; यती १२ व्या अक्षरावर.
मा – सा – जा - स – त – ता –ग येति गण ते शार्दुलविक्रीडित ।
(१३) स्रग्धरा :
ही का आकाशगंगा ? अवतरण न का? दीसती का न वीची?
का घे शामा नभःश्री स्रज विमल शिरी दिव्य ही माधवीची?
स्वर्गीचे हे बघूनी विभव मन कसे होऊन मुग्ध राही!
तेजोराशी प्रभूची चिररुचिर वधू प्रकृति स्रधरा ही
लगक्रम : ¯ ¯ ¯ । ¯ ﬞ ¯ । ¯ ﬞ ﬞ । ﬞ ﬞ ﬞ । ﬞ ¯ ¯ । ﬞ ¯ ¯ । ﬞ ¯ ¯
गण : म र भ न य य य
लक्षण : हे अक्षरगणवृत्त आहे. प्रत्येक चरणात अक्षरे २१.
गण : म - र - भ - न - य- य –य ; यती ७ व १४ व्या अक्षरांवर.
डौलाने चालते जी म - र - भ - न - य- य –यी, स्रग्धरा सुंदरा ती ।
(१४) मंदारमाला :
शोभे सभोवार मंदारमाला मुदे वाहते मंद मंदाकिनी
वीणा करी मंजु झंकार हाती, असे शारदा ही जगन्मोहिनी
लगक्रम : ¯ ¯ ﬞ । ¯ ¯ ﬞ । ¯ ¯ ﬞ । ¯ ¯ ﬞ । ¯ ¯ ﬞ । ¯ ¯ ﬞ । ¯ ¯ ﬞ । ﬞ ¯
गण : त त त त त त त ग
लक्षण : हे अक्षरगणवृत्त आहे. याच्या प्रत्येक चरणात ११ अक्षरे असतात.
गण : त – त – त - त –त – त – त – ग; यती ४, १०, १६ व्या अक्षरांवर.
साता ‘त’ कारीच मंदारमाला गुरु एक त्याच्याही अंती वसे ।
(१५) सुमंदारमाला :
(मंदारमालेच्या आरंभी एक लघू अक्षर आले की हे वृत्त होते.)
मराठी असे आमची मायबोली, जरी भिन्न धर्मानुयायी असू
पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटात आम्ही बसू
लगक्रम : ﬞ ¯ ¯ । ﬞ ¯ ¯ । ﬞ ¯ ¯ । ﬞ ¯ ¯ । ﬞ ¯ ¯ । ﬞ ¯ ¯ । ﬞ ¯ ¯ । ﬞ ¯
गण : य य य य य य य लग
लक्षण : हे अक्षरगणवृत्त आहे. प्रत्येक चरणात अक्षरे २३.
गण : य - य - य - य - य- य –य –ल -ग; यती ५, ११, १७ व्या अक्षरांवर.
सुमंदारमालेत मंदारमालेहुनी एक ये आदि लघ्वक्षर ।
मात्रावृत्ते (जाती)
अक्षरगणवृत्तांतील काही महत्वाची वृत्ते आपण पाहिली, आता काही महत्त्वाच्या
मात्रावृत्तांचा परिचय करुन घेऊ. ‘मात्रा’ कशास म्हणतात व त्या कशा मोजतात हे या पाठाच्या प्रारंभी आपण पाहिले. ज्या कवितेच्या चरणात अक्षराचे व गणांचे बंधन नसून केवळ मात्रांचे बंधन असते त्यास त्यास ‘मात्रावृत्त’ किंवा ‘जाती’ असे म्हणतात. मराठीत ज्यांना आपण ‘पदे’ म्हणतो त्यांचा समावेश मात्रावृत्तांत होतो. मात्रावृत्तांत पदांशिवाय अनेक प्रकारच्या पद्यरचना आढळतात. सलग वर्णन करताना म्हटले जाणारेकटाव, उपदेशाचा डोस पाजणारे फटके, परमेश्वराला आळविण्यासाठी म्हटल्या जाणा-या भूपाळ्या व आरत्या, तान्ह्या मुलांसाठी रचलेलीअंगाई - गीते व पाळणे , शूरवीरांच्या कीर्तीचे गाइले जाणारे पोवाडे व समरगीते, तरुणांच्या प्रेमांची चित्रणे करणा-या लावण्या अशांचा समावेश मात्रावृत्तांतच होतो.
मात्रावृत्तांत ठरावीक मात्रांचे सर्व चरण असतात असे नाही. निरनिराळ्या मात्रावलींचे भाग एकत्र केलेले असतात. प्रारंभी ध्रुवपद, मग कडवे व केव्हा केव्हा कडव्यात चाल बदलून येणारा अंतरा व कडव्याच्या शेवटी पुनःपुन्हा म्हणावयाच्या प्रारंभीच्या ओळी म्हणजे ध्रवपद अशी ही रचना असते. पदे म्हणताना आपण ताल धरतो, म्हणाजे ठरावीक अंतरावर आपण थांबतो व टाळी वाजवितो.
चरणातील मात्रा मोजताना केव्हा केव्हा आठ मात्रांचा किंवा सका मात्रांचा असे गट किंवा गण पडतात.आठ मात्रांच्या गटाला ‘प्द्म असे म्हणतात (पद्म = कमळ . कमळाला आठ पाकळ्या असतात ) व ते ‘प’ या अक्षराने दाखविले जाते. सहा मात्रांच्या गटाला ‘भृंग’ म्हणतात .(भृंग = भुंगा. भुंग्याला सहा पाय असतात.) हा गट ‘भृ’ या अक्षराने दाखवितात. चार किंवा पाच मात्रांच्या गटांना ‘क’ (= कवळलिंब) म्हणतात. मात्रावृत्ताच्या चरणात पद्माचा किंवा भृंगाचा एकच गट न येता अनेक गट येतात. त्यांना ‘आवर्तन’ म्हणतात. मात्रावृत्ताच्या चरणातील मात्रा कशा मोजतात व त्यांतील गटांचे लेखन कसे करतात ते पाहाः
प ती त पा व न । ना म ऐ कु नी । आ लो मी दा । रा
१ २ १ २ १ १ २ १ २ १ २ २ २ २ २ २
८ ८ ८ २
प प प +
चरणाच्या शेवटी दोन मात्रांचे एक अक्षर असेल तर ते + चिन्हाने दाखवतात.
जसे दोन मात्रा ( + ), तीन मात्रा ( ﬞ + ), चार मात्रा ( - + ), सहा मात्रा ( - - + ).
वरील ‘पतितपावन’ मात्रावृत्तात पद्माची तीन आवर्तने व शेवटी एक गुरु येतो. त्याच्या लक्षणाचे लेखन
( प । प । प । + ) असे केले जाते.
मात्रावृत्तात चार मात्रांचा एक गण मानतात. असे मात्रागण पाच आहेत.
म ¯ ¯ , स ﬞ ﬞ ¯ , ज ﬞ ¯ ﬞ , भ ¯ ﬞ ﬞ , न ﬞ ﬞ ﬞ ﬞ ,
मात्रावृत्तात सगळ्याच चरणांतील मात्रा सारख्या असल्या तर त्यास ‘समजाती’ म्हणतात. दोन भिन्न मात्रावलींचे चरण असल्यास ‘विषमजाती’ म्हणतात.
पुढील मात्रावृत्तांची लक्षणे पाहाः
(१) दिंडी घोष होता ‘ग्यानबा तुकाराम’
(मात्रा १९) राउळाची ही वाट सुखाराम
९ + १० करी भक्ती चित्तात नृत्यलीला
पहा दिंडी चालली पंढरीला
१२ २२ २ । १२ २१ २२
= ९ = १०
यातील चारही चरणांतील मात्रासंख्या मोजली तर प्रत्येकात १९ भरते. म्हणून हे मात्रावृत्त आहे. प्रत्येक चरणात दोन स्पष्ट भाग पडतात. पहिल्यात ९ मात्रा व दुस-या १० मात्रा असतात व यांचेदेखील पूर्वार्धात ३ – २ – २ – २ व उत्तरार्धात ३ – ३ – २ – २ असे मात्रागणांचे भाग पडतात. गण संपला की अक्षर संपावयास हवे. ही कविता चालीवर म्हणून पाहा. म्हणाजे याची स्पष्ट कल्पना येईल.
(२) आर्या
मात्रा ३० } संस्कृतात ज्याला गीती म्हणतात त्या पद्य प्रकाराला
१२ + १८} मराठीत आर्या म्हणतात. मोरोपंतांच्या आर्या प्रसिध्द
१२ + १८} आहेत. आर्येचे एक उदाहरण पाहाः
सुश्लोक वामनाचा, अभंगवाणी प्रसिध्द तुकयाची ।
ओवी ज्ञानेशाची किवा आर्या मयूरपंताची।
मात्रा - २ २ २ २ २ २ २ २ २ २ १२ १२ २ २
= १२ = १८
लक्षणः आर्या हे अर्धसम मात्रावृत्त आहे. त्याचे दोन मोठे चरण दिसत असले तरी प्रत्येक चरणाचे पूर्वार्ध (१२ मात्रांचा) व उत्तरार्ध (१८ मात्रांचा) असे दोन भाग पडतात; पण सामान्यतः आर्येचे चार चरण मानतात. त्यांतील पहिल्या व तिस-या चरणांत प्रत्येकी १२ मात्रा असून दुस-या व चौथ्या चरंणात १८ मात्रा असतात.
मात्रावृत्ते (जाती) उदाहरणे व लक्षणे
पद्मावर्तनी समजाती
(३) पादाकुलक : हिरवे हिरवे गार गालिचे
मात्रा १६ } हरित तृणाच्या मखमालीचे
८ + ८ } त्या सुंदर मखमालीवरती
प । प } फु ल रा णी ही खे ळ त हो ती
ﬞ ﬞ ¯ ¯ ¯ ¯ । ﬞ ﬞ ¯ ¯
१ १ २ २ २ २ १ १ २ २
प प
लक्षणः हे मात्रावृत्त आहे. ह्याच्या प्रत्येक चरणात १६ मात्रा असून ८ व ८ मात्रांची अशी पद्माची दोन आवर्तने येतात. ही पद्मावर्तनी समजाती आहे.
(४) उद्धव : मध्वमुनीश्वरांच्या प्रसिध्द पद्यावरुन हे नाव देण्यात
मात्रा १४ } आले आहे.त्यांचे प्रारंभीचे दोन चरण पुढीलप्रमाणेः
- । प । - + } उद्धव शांतवन कर जा । त्या गोकुलवासि जनांचे ॥ ध्रु.॥
२ + ८ + ४} ¯ । ﬞ ¯ ¯ ﬞ ﬞ ﬞ । ﬞ ﬞ ¯
२ १२ २ १ १ १ ११ २
- प - +
उद्धवाच्या प्रत्येक चरणातील मात्रा १४ असल्या तरी त्याचे २ + ८ + ४ असे गट पडतात. दोन चरण मिळून ध्रुवपद होते. याला अंतरादेखील १४ मात्रांचा असतो.
(५) बालानंद : आनंदी आनंद गडे । इकडे तिकडे चोहिकडे
(अचलगती) वरती खाली मोद भरे । वायुसंगे मोद फिरे
मात्रा १४ } आ नं दी आ नं द ग डे
८ + ६ } ¯ ¯ ¯ ¯ ¯ । ﬞ ﬞ ¯
प । - - +} २ २ २ २ २ १ १ २
८ ६
प - - +
प्रत्येक चरणात ८ व ६ असी मात्रांचे दोन गट असतात. अंतरा पद्माचा म्हणजे ८ मात्रांचा केव्हा असतो, केव्हा नसतो. बालकवींच्या ‘आनंदी आनंद गडे’ या कवितेवरुन याला ‘बालानंद’ असे नाव देण्यात आले आहे. या वृत्ताला ‘अचलगती’ असे नाव डॉ. माधवराव पटवर्धन यांनी दिले आहे.
(६) भूपतिवैभव : नाटककार गो. ब. देवल यांच्या एका पदावरुन या वृत्ताला हे नाव देण्यात आले. त्याचा प्रारंभीचा चरण पुढीलप्रमाणे :
मात्रा २२ } भू पती खरे ते वैभवसुख सेवीती
२ + ८ + ८ + ४ } २ । १२ १२ २ । २ ११११ २। २२
- । प । प । - + } २ ८ ८ ४
- प प - +
याच्या प्रत्येक चरणात ( २ + ८ + ८ + ४) असे २२ मात्रांचे गट असतात व याला ( १४ + ५ ) = १९ मात्रांचा अंतरा असतो.
(७) चंद्रकांत (पतितपावन) : देवलांच्या ‘झुंझारराव’ नाटकातील सुप्रसिध्द अशा पद्यावरुन या मात्रावृत्ताला ‘चंद्रकांत’ हे नाव पडले. त्याचे प्रारंभीचे चरण पुढीलप्रमाणे
मात्रा २६ } चंद्रकांत राजाची कन्या तरुन रुपखाणी
८+८+८+२} पतिव्रता सद्गुनी शहाणी, पतिही वाखाणी
प ।प ।प ।+} ﬞ ¯ ﬞ ¯ ¯ । ﬞ ¯ ﬞ ¯ ¯ । ﬞ ﬞ ¯ ¯ ¯ । ¯
१ २ १ २ २ १ २ १ २ २ १ १ २ २ २ २
८ ८ ८ २
प प प +
लक्षणः हे मात्रा वृत्त आहे. याच्या प्रत्येक चरणात २६ मात्रा असून त्यात प्रारंभी ८ + ८+ ८ अशी पद्माची तीन आवर्तने असतात.या वृत्ताला डॉ. माधवरराव पटवर्धनांनी ‘पतितपावन’ असे नाव दिले आहे.
(८) सूर्यकांत : बालकवींची ‘औदुंबर’ ही कविता ‘सूर्यकांत’ वृत्तांत
(समुदितमदना) आहे. या कवितेचे शेवटचे दोन चरण पाहाः
मात्रा २७ } झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
८+८+८+३} पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर
प ।प ।प ﬞ +} ¯ ﬞ ¯ ﬞ ¯ । ﬞ ¯ ﬞ ﬞ ﬞ ¯ । ﬞ ﬞ ¯ ¯ ¯ । ﬞ ¯
२ १ २ १ २ १ २ १ १ १ २ १ १ २ २ २ १ २
८ ८ ८ ३
प प प ﬞ +
(९) साकी : (लवंगलता) नव्या मनूतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहे
मात्रा २८ } कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे
८+८+८+४} ¯ ﬞ ﬞ ¯ ﬞ ﬞ ।¯ ¯ ¯ ¯ । ﬞ ﬞ ¯ ¯ ¯ । ¯ ¯
प ।प ।प - +} २ १ १२ ११ २ २ २ २ १ १ २ २ २ २ २
८ ८ ८ ४
प प प -+
या वृत्ताला पटवर्धनांनी ‘लवंगलता’ हे नाव दिले आहे. जुन्या साकी वृत्तात तिसरा एक चरण आहे.
(१०) फटका : लोकांनी जगात कसे वागावे हे सांगण्यासाठी
(हरिभगिनी) अनंतफंदी या कवीने जे उपदेशाचे फटके
मात्रा ३० } मारले त्यावरुन या वृत्ताला ‘फटका’ हे नाव
८+८+८+६} मिळाले. याला माधवराव पटवर्धनांनी
प ।प ।प - - +} ‘हरिभगिनी’ हे नाव दिले.
अनंतफंदीच्या कवितेचे पहिले दोन चरण पुढीलप्रमाणेः
बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडु नको
संसारामधि ऐस आपुला उगाच भटकत फिरु नको.
¯ ¯ ¯ ﬞ ﬞ । ¯ ﬞ ¯ ﬞ ¯ ।¯ ¯ ﬞ ﬞ ﬞ ﬞ । ﬞ ¯ ﬞ ¯
२ २ २ १ १ २१२ १२ १ २ १ १११ १ २ १ २
८ ८ ८ ६
प प प - -+
या वृत्ताला बालानंद जातीचा १४ मात्रांचा केव्हा केव्हा अंतरा असतो.
पद्मावर्तनी अर्ध समजाती
(११) अक्रूर : ‘अजि अक्रुर हा नेतो श्रीकृष्णाला’ या जुन्या पद्यावरुन
(मात्रा २० हे नाव पडले. या वृत्ताच्या पुढील उदाहरणातील पहिले
व १४) दोन चरण पाहाः
बा नीज गडे नीज गडे लडिवाळा नीज नीज माझ्या बाळा
¯ ¯ ﬞ ﬞ ¯ । ¯ ﬞ ﬞ ¯ ﬞ ﬞ ।¯ ¯ । ¯ ¯ ﬞ ﬞ ¯ ¯ । ¯ ¯
२ २ १ १ २ २ १ १ २ १ १ २ २ २ १ २ १ २ २ २ २
८ ८ ४ १० ४
पहिल्या चरणात २० मात्रा व दुस-या चरणात १४ मात्रा असतात. अंतरा ‘खडबड हे उंदिर करिती’ अशा प्रत्येकी १५ मात्रांच्या तीन चरणांचा असतो.
(१२) केशवकरणी : रामजोश्यांच्या प्रसिध्द पद्यावरुन या वृत्ताला
मात्रा २७ व १६ } हे नाव पडले. त्याचे पहिले दोन चरण
प ।प ।प । ﬞ + = २७} पुढीलप्रमाणे आहेतः
क ।प ।ﬞ + = १६} केशवकरणी अद्भुतलीला नारायण तो कसा
¯ ﬞ ﬞ ﬞ ﬞ ¯ । ¯ ﬞ ﬞ ¯ ¯ ।¯ ¯ ﬞ ﬞ ﬞ ¯। ﬞ ¯
८ ८ ८ ३
तयाचा सकल जनांवर ठसा
ﬞ ¯ ¯ । ﬞ ﬞ ﬞ ﬞ ¯ ﬞ ﬞ । ﬞ ¯
५ ८ ३
याच्या पहिल्या चरणात ८ + ८ + ८+ ३ = २७ मात्रा असतात. व दुस-या चरणात ५ + ८ + ३ = १६ मात्रा असतात. केव्हा केव्हा १४ + ७ = २१ मात्रांचा अंतरा असतो.
(१३) मुद्रिका : ‘मुद्रिकेराम टाकुनी आलिस तू कशी’ या जुन्या
(मात्रा २१ व २७) पद्यावरुन या वृत्ताला हे नाव पडले. माधव जूलियन
- ।प ।प । ﬞ + = २१} यांची ‘वृध्द कवी’ ही कविता या वृत्तातली आहे.
- ।प ।प । - -।- ।प। ﬞ +} त्याचे पहिले दोन चरण पुढीलप्रमाणेः
= २७ का उठता खाली बसा तरुन मंडळी
२ ।१ १ २ २ २। १ २ १ ११ २ ।१ २
१० ११
उप चार ठेविता का हा ?समताच योग्य या स्थळी
११ । २१ २१२२ ।२।११। २ १ २ १ २ ।१२
१४ १३
यातील पहिल्या चरण २१ मात्रांचा असतो. त्यांचे १० व ११ मात्रांचे दोन भाग पडतात. दुसरा चरण मोठा २७ मात्रांचा असून त्याचे १४ व १३ मात्रांचे दोन भाग पडतात.
पद्मावर्तनी विषमजाती
(१४) नववधू : कविवर्य तांबे यांच्या ‘नववधू प्रिया मी बावरते’ या पद्यावरुन हे नाव पडले. त्याच्या पहिल्या कडव्यातील ओळी पुढीलप्रमाणेः
नववधू प्रिया, मी बावरते २+८+६=१६ मात्रा
लाजते, पुढे सरते, फिरते ॥ ध्रु ॥ २+८+६=१६ मात्रा
कळे मला तू प्राणसखा जरि ८+८+= १६ मात्रा
कळे तूच आधार सुखा जरि ८+८+ = १६ मात्रा
तुजवाचुनि संसार फुका जरि ८+८+ = १६ मात्रा
मन जवळ यावया गांगरते २+८+ ६+ = १६ मात्रा
यातील प्रत्येक चरणात १६ मात्रा असल्या तरी ध्रुवपदाच्या पहिल्या दोन ओळीत २+८+६ असे मात्रांचे गट पडतात. अंत-यामधील तीन ओळीत ८+८ अशी पद्माची दोन आवर्तने येतात व चौथा मेळाचा चरण. त्यात ध्रुवपदासारखेच २+८+६ असे मात्रागट येतात. प्रत्येक चरणात मात्रा सारख्या असल्या तरी मोडणी भिन्न असल्यामुळेही विषमजाती होय.
(१५) प्रणयप्रभा : नववधू व प्रणयप्रभा ही दोन वृत्ते जवळजवळ सारखीच आहेत. प्रणयप्रभेतील कडव्याच्या शेवटच्या चरणात १६ ऐवजी १४ मात्रा असतात. उदा.
किती मौज दिसे ही पहा तरी २+८+६ = १६ मात्रा
हे विमान फिरते अधांतरी ॥ ध्रु. ॥ २+८+६ = १६ मात्रा
खोल नदीतून कापित पाणी ८+८ = १६ मात्रा
मत्स्य धावतो चहु बाजूंनी ८+८ = १६ मात्रा
घारच अथवा फिरते गगनी ८+८= १६ मात्रा
हुबेहुब हे त्याचपरी । ८+६= १४ मात्रा
प्रणयप्रभेत ध्रुवपद व अंतरा यांतील मात्रा अनुक्रमे (२+८+६) = १६ मात्रा व (८+८) = १६ मात्रा, अशा सारख्याच आहेत; पण चौथा मेळाचा जो चरण आहे त्याच ८+६ अशा १४ च मात्रा येतात. एवढाच काय तो फरक
भृंगावर्तनी समजाती
(१६) जीवनलहरी : आतापर्यंत आपण जी मात्रावृत्ते पाहिली तीत ८ मात्रांचा एक गट येई. पण काही मात्रावृत्ते अशी आहेत की त्यांच्या चरणांत ६ ।६ मात्रांचे गट पडतात . सहा मात्रांच्या एका गटाला ‘भृंग’ असे नाव आहे. कवी कुसमाग्रजांनी या प्रकारची विशिष्ट पद्यरचना केली व तिला ‘जीवनलहरी’ असे नाव दिले. त्यावरुनच या पद्यप्रकाराला ‘जीनवलहरी’ हे नाव मिळाले. याचे उदाहरण पाहाः
नगरातिल सदनांतुनि
लखलखती लाख दिवे
क्षणभर की स्थिर झाले
उल्कांचे दिव्य थवे
२ २ २ । २ १ १२
= ६ = ६
या कवितेच्या प्रत्येक चरणात १२ मात्रा असून त्यात ६+६ मात्रांचे (भृंगाचे) दोन मात्रागट असतात . ही भृंगावर्तनी समजाती आहे.
छंद
ओवी व अभंग हे मराठीतील सर्वात जुने व परंपरेने चालत आलेले असे लोकप्रिय छंद आहेत. ज्ञानेश्वर, एकनाथ, मुक्तेश्वर, रामदास इत्यादी संतांनी आपली कविता मुख्यतः ओवी छंदातच लिहिली आहे. सर्वच संतांनी अभंग लिहिले असले तरी मानदेवास अभंगाचा प्रणेता मानतात, मात्र तुकारामाने ते लोकप्रिय केले. तुकारामाच्या वह्या इंद्रायणीत बुडविल्या तरी त्या अ- भंग राहिल्या म्हणून तुकारामाच्या रचनेला अभंग मानतात. या दोन्ही छंदात पुष्कळसे साम्य आहे. रचनेच्या बाबतीत अभंग हा अधिक काटेकोर असून ओवीची रचना अतिशय शिथिल आहे.
(१) अभंग
अभंगाचे मुख्य प्र्कार दोन (१) मोठा अभंग व (२) लहान अभंग
मोठा अभंग – मोठ्या अभंगात चार चरण असून पहिल्या तीन चरणांत प्रत्येकी सहा अक्षरे व चौथ्या चरणात चार अक्षरे असतात. दुस-या व तिस-या चरणांच्या शेवटी यमक असते. उदा.-
लक्ष्मण भावोजी ।मागे, पुढे स्वामी । मज आहे धामी ।ऐसे वाटे॥
केव्हा केव्हा मोठ्या अभंगाच्या चार चरणांतील पहिल्या तीन चरणात यमक असते.
उदा.- रामदासांचा अभंग पाहाः-
जाणावा तो ज्ञानी । पूर्ण समाधानी । निःसंदेह मनी । सर्वकाळ ॥
लहान अभंग – लहान अभंगाला दोन चरण असतात व प्रत्येक चरणात सामान्यतःआठ अक्षरे असतात. क्वचित पहिल्या चरणात सहा किंवा सात अक्षरे असतात. दुस-या चरणात केव्हा केव्हा नऊ किंवा दहा अक्षरेही येतात. दोन्ही चरणांत यमक असते. एकनाथ व तुकाराम यांचे अभंग या प्रकारचे आहेत.
जे जे बोले तैसा चाले । तो चि वहिले निवांत ।
अंगी असोनि जाणपण । सदा सर्वदा तो लीन ॥
- एकनाथ (८।८।९।८)
अर्भकाचे साठी । पंते हाती धरिली पाटी ।
तुका म्हणे नाव । जनासाठी उदकी ठाव ॥
- तुकाराम (६।९।६।९)
(२) ओवी
ओवीला चार चरण असतात. पहिल्या तीन चरणांच्या शेवटी यमक असते. आधुनिक ओवीला तीनच चरण असतात. चौथा चरण लहान असला की त्याला साडेतीन चरणी ओवी म्हणतात. चरणांतील अक्षरांचे बंधन फारच शिथिल असते. ओवीच्या पहिल्या तीन चरणांतील प्रत्येकात पाचपासून पंधरापर्यंत अक्षरे असतात व चौथ्या चरणात पहिल्या तीन चरणांतील अक्षरांपेक्षा अधिक अक्षरे असत नाहीत. अलीकडच्या ओव्यांत प्रत्येकी आठ अक्षरांचे चार चरण असून दुस-या व चौथ्या चरणांचे यमक जुळविलेले असते. बहिणाबाई चौधरी यांच्या ‘मन’ या कवितेतील ओव्या या प्रकारच्या आहेतः
(१) मन वढाय वढाय । यभ्या पिकातलं ढोर ॥
किती हाकला हाकला । फिरी येतं पिकांवर ॥
- बहिणाबाई चौधरी (८।८।८।८)
ओव्यांचे प्रकार पाहाः
(२) आता विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें ।
तोषिनि मज द्यावें । पसायदान हें ॥ - ज्ञानेश्वर (८।८।७।६)
(३) भक्तीस विकला भगवंत । भक्तांचें उच्छिष्ट काढित ।
रणांगणीं घोडे धूत ।शेखी होत द्वारपाळ ॥-एकनाथ (१०।९।८।८)
(४) ग्रंथा नाम दासबोध । गुरुशिष्यांचा संवाद ।
येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ॥- रामदास (८।८।८।४)
स्त्रीगीत ओवी –
(५) पहिली माझी ओवी । पहिला माझा नेम
तुळशीखाली राम । पोथी वाची ॥ (८।७।७।४)
आधुनिक ओव्या –
(६) बाळ जातो दूर देशा । मन गेले वेडावून ।
आज सकाळपासून ॥ - गोपीनाथ (८।८।८)
(७) भ्रताराच्या राज्यी । उणे ठेवीना रे देव ।
बहिणीच्या मनी । चोळीची आशा ठेव ॥ तांबे (६।८।६।७)
ओवी आणि अभंग हे दोन्ही छंद बहुतेक सारखेच आहेत. अभंगाच्या तीनही चरणांत बहुतेक सारखी अक्षरे असतात. ओवीच्या तीनही चरणांत कमीअधिक अक्षरे चालतात. अभंगाच्या चार चरणांत एक खंड किंवा चौक होतो. अशा चार ते सहा खंडांचा एक संपूर्ण अभंग होतो व त्यात एखादे तत्त्व सांगितलेले असते. शेवटच्या पंक्तीत कवीचे नाव आढळते उदा. नामा म्हणे , तुका म्हणे , दास म्हणे. अभंगात उपान्त्य अक्षर तर ओवीत अंत्य अक्षर हेल काढून म्हटले जाते. अभंग व ओवी यांच्या म्हणण्याच्या चालीत फरक आहे. अभंग हे बहुशः पुरुषांच्या तोंडी भजनाच्या वेळी म्हटले जातात तर ओव्या विशेषतः बायकांच्या तोंडी झोपाळ्यावर बसून म्हटल्या जातात.
(३) अनुष्टुभ्
गीताई माउली माझी ।तिचा मी बाळ नेणता ।
पडता पडता घेई । उचलूनि कडेवरी ॥
ﬞ ﬞ ¯ ﬞ ﬞ ¯ ¯ ¯ ﬞ ﬞ ¯ ﬞ ﬞ ¯ ﬞ ¯
याच्या प्रत्येक चरणात आठ अक्षरे असतात व प्रत्येक चरणातील पाचवे अक्षर लघू असते. याच्या चरणांतील संख्या निश्चित ठरली असल्यामुळे हे मात्रावृत्त नव्हे. चरणातील लघुगुरुक्रम निश्चित नसल्यामुळे हे अक्षरगणवृत्त नव्हे.यातील प्रत्येक अक्षर दीर्घ उच्चारले जात नसल्यामुळे याला पूर्णपणे छंदही म्हणता येत नाही. अशी याची स्थिती आहे. हा छंद प्रथम वाल्मीकिॠषींच्या मुखातून क्रौंचवधाच्या प्रसंगी बाहेर पडला असे म्हणतात.
मुक्तछंद
आपण आत्तापर्यंत असे पाहिले, की अक्षरगणवृत्तात रचना करताना कवीला अक्षरे , गण व यती यांचे बंधन पाळावे लागते. मात्रावृत्तांत किंवा जातींत रचना करताना मात्रांचे बंधन पाळावे लागते. छंदामध्ये थोड्या सैलपणाने का होईना, अक्षरांचे व यमकाचे बंधन तो पाळतो. पण वरील प्रकारचे कोणतेच बंधन न स्वीकारता कवी आपल्या भावना किंवा विचार वेगळ्या पध्दतीने मांडू शकतो . अशा प्रकारची रचना छंदोरचनेच्या अनेक बंधनातून मुक्त असते. म्हणून या रचनाप्रकाराला ‘मुक्तछंद’ (किंवा मुक्तछंद) असे नाव देण्यात आले आहे
मुक्तछंदात छोटे छोटे चरण असतात. त्यांना ‘उपचरण’ किंवा ‘चरणक’ असेही म्हणतात. हा चरणक सामान्यतः पाच किंवा सहा अक्षरांचा असतो. क्वचित तो चार किंवा सात अक्षरांचाही असतो. एका चरणक किती असावे याचे बंधन नाही केव्हा दोन तर केव्हा दोन तर केव्हा एका ओळीत चार चरणकही असू शकतात अशा किती ओळींचे कडवे असावे याचेही बंधन नसते. कल्पना, विचार आणि भावना पुरी झाली की कडवे संपते. मुक्तछंद हा लयबध्द रीतीने व संथपणाने वाचावयाचा असतो . याचे वाचन आघातप्रधान असते. छंदातल्याप्रमाणे प्रत्येक अक्षराचा उच्चार दीर्घ करावयाचा असतो. अनेक आधुनिक कवी, विशेषतः नवकवी , आपली पद्यरचना या वृत्तात करतात. प्रौढ किंवा गंभीर भावना व विचार व्यक्त करण्यास हा छंद उपयुक्त वाटतो.
कवी नारायण सुर्वे यांची मुक्तछंदातील ‘दोन दिवस’ ही कविता पाहा.
दोन दिवस वाट पहाण्यास गेले, दोन दुःखात गेले ८
हिशोब करतो आहे किती राहिले आहेत डोईवर उन्हाळे ७
शेकडो वेळा चंद्र आला. तारे फुलले, रात्र धुंद झाली ९
भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली ६
मुक्तछंदः आणखी काही उदाहरणेः
(१) “ वेगानं निघून जाताना निदान वळून तरी बघायचे होते
वस्ती जळत होती आणि आमचे हात वर होते.”
- लोकनाथ यशवंत
(२) “ आपणच आपल्याला लिहिलेली
पत्रे वाचता वाचता
ओले होणारे डोळे पुसून
फडफडू द्यावीत वा-यावर पाने”
वृत्ते
भाषेचे अलंकार
आपण बोलताना किंवा लिहिताना आपले म्हणणे इतरांना प्रभावी रीतीने सांगतो. तसेच ते सुंदर रीतीनेही सांगावे असा आपला प्रयत्न असतो. आपले म्हणणे सुंदर रीतीने सांगताना अलंकारांची सहज रचना होते तेव्हा भाषा सुंदर होते. कवी आपली अभिव्यक्ती सुंदर व्हावी म्हणून असे अनेक अलंकार वापरतात. ‘अलंकार’ या शब्दाचा अर्थ ‘दागिना’ असा आहे. दागिने घातल्यावर माणसाच्या शरीराला शोभा येते. त्याच्या सौंदर्यात भर पडते. दागिन्याप्रमाणे तलम, रंगीबेरंगी कपड्यांनी कोणाच्या शरीराला शोभा येते तर कोणाचा चेहरा चष्म्यामुळे शोभून दिसतो. सुंदर कपडे, चष्मा हेदेखील एक अर्थाने अलंकारच आहेत. अलंकारात शरीराला शोभा आणण्याचा धर्म असतो. जी गोष्ट व्यक्तीची तीच भाषेची. आपली भाषा अधिक परिणामकारक किंवा चांगली दिसावी म्हणून आपली नेहमीची साधी भाषा न वापरता आपण वेगळ्याच पधतीने सांगून ती अधिक आकर्षक करण्याच्या प्र्यत्न करतो. ‘तुझे चालणे मोहक आहे’ असे न म्हणता, ‘चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले’ अशी शब्दरचना कवीने केल्यामुळे तीच कल्पना अधिक उठावदार वाटते व या चरणातील ‘च’ हे अक्षर वारंवार आल्यामुळे हे वाक्यही कानाला गोड वाटते. बाळाला निजविताना आईला म्हणावयाचे असतेः ‘डोळे मिटून घे व झोप’ ; पण ही साधी अल्पना कवी कशा शब्दांत मांडतो पाहाः ‘ पापणिच्या पंखात झोपु दे डोळ्यांची पाखरे’ डोळ्यांना पाखरे मानल्यामुळे साधा विचार कसा शोभून दिसतो, नाही? माणसांच्या आयुष्यात सुखापेक्षा दुःखच अधिक असते ही साधी कल्पना कवीने कशा चमत्कृतिपूर्ण रीतीने मांडली आहे पाहाः एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे । जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे ॥ आयुष्याला वस्त्र कल्पिल्यामुळे एक साधी कल्पना किती मोहक व अर्थपूर्ण वाटते, नाही? अशा चमत्कृतिपूर्ण रचनेमुळे मनाला आल्हाद वाटतो. भाषेला ज्याच्या – ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना ‘भाषेचे अलंकार’ असे म्हणतात. केव्हा दोन वस्तूंतील साम्य दाखवून, तर केव्हा विरोध दाखवून , केव्हा नाद निर्माण करणारे शब्द वापरुन, तर केव्हा एखादी कल्पना वाजवीपेक्षा अधिक फुगवून सांगून आपण आपली भाषा अधिक सुंदर किंवा पारिणामकारक करण्याचा प्रयत्न करतो. केव्हा शब्दांतील अक्षररचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते तर केव्हा योजिलेल्या शब्दांमुळे अर्थांचे सौदर्य खूलून दिसते. यामुळे भाषेच्या अलंकारांचे दोन प्रकार होतातः (१) शब्दालंकार (२) अर्थालंकार. यातील काही अलंकारांची ओळख क्रमाने करुन घेऊ. शब्दालंकार (१) अनुप्रास – पुढील कवितेच्या ओळी वाचाः गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले, शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले. रजतनील, ताम्रनील स्थिर पल जल पल सलील हिरव्या तटि नावांचा कृष्ण मेळ खेळे. वरील ओळी वाचताना ‘ल’ हे अक्षर पुनः पुन्हा आल्यामुळे जो नाद निर्माण होतो. त्यामुळे या काव्यपंक्तीला शोभा आली आहे. अशा रीतीने,एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा ‘अनुप्रास’ हा अलंकार होतो. आणखी काही उदाहरणेः (१) पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी । गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी । (२) संत म्हणति, ‘सप्त पदें सहवासें सख्य साधुशीं घडतें’ । (२) यमक खालील चरण वाचाः जाणावा तो ज्ञानी । पूर्ण समाधानी । निःसंदेह मनी । सर्वकाळ ॥ यांतील पहिल्या तीन चरणांच्या शेवटी ‘नी’ हे अक्षर आलेले आहे. तसेच, राज्य गादीवरी । काढी तुझ्या आठवणी फळा आली माय । मायेची पाठवणी. यांतील दुस-या व चवथ्या चरणांच्या शेवटी ‘आठवणी’ ही चार अक्षरे क्रमाने आल्यामुळे ऐकताना गंमत वाटते . अशा प्रकारे, कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठरावीक एक किंवा अनेम अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास ‘यमक’ हा अलंकार येतो. यमकाची आणखी काही उदाहरणे- पुष्पयमक – (१) सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो । कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो । दामयमक – (२) आला वसंत कविकोकिल हाही आला । आलापितो सुचवितो अरुणोदयाला । अनुप्रासात जशी अक्षरांची पुजरावृत्ती असते तशी यमकातही असते. अनुप्रासात वर्णाची आवृत्ती कोठेही असू शकते ; पण यमकात ही आवृत्ती ठरावीक ठिकाणीच होत असते. यातील चरणाच्या शेवटी, मध्ये, किंवा ठरावीक ठिकाणी. (३) श्र्लेष पुढील वाक्ये वाचाः गोंविदराव – काय वसंतराव , तुम्हांला सुपारी लागते का? वसंतराव – हो, हो लागते ना ! गोंविदराव – जर लागते, तर का खाता ? या संवादात ‘लागते’ या शब्दाच्या दोन अर्थांनी दोघेही बोलत असल्यामुळे थोडी गंमत घडते . ‘लागणे’ या शब्दाचे दोन अर्थ होतात. (१) हवी असणे.(२) खाल्ल्याने भोवळ किंवा चक्कर येणे. अशा रीतीने एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा ‘श्र्लेष’ हा अलंकार होतो. ‘श्र्लिष्’ या शब्दाचा अर्थ आलिंगणे, एकमेंकात मिसळणे, असा आहे. (श्र्लेष – आलिंगन – मिठी )एकाच शब्दाला दोन अर्थांनी मिठी बसलेली असते म्हणजे दोन अर्थ चिकटलेले असतात. त्यामुळे एका शब्दाचे दोन अर्थ निघतात .श्लेष हा शब्दालंकार आहे व अर्थालंकारही आहे. पुढील वाक्ये पाहाः (१) मित्राच्या उद्यांन कोणाला आनंद होत नाही? (२) हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस. या उदाहरणांत ‘मित्र’ व जीअन’ या शब्दांना दोनदोन अर्थ आहेतः (मित्र = सूर्य, स्नेही. जीवन = पाणी, जगण्याची शक्ती ) यांतील कोणताही अर्थ घेतला तरी चालतो. जर ‘मित्र’ ऐवजी त्याच अर्थाचे ‘दोस्त’ , ‘सखा’ हे शब्द ठेवले किंवा ‘जीवन’ ऐवजी ‘पाणी’,’जल’ हे शब्द ठेवले शब्द त्यातील श्लेष नाहीसा होतो. म्हणून वाक्यात ज्या शब्दाला दोन अर्थ असतात तो शब्द काढून त्या ठिकाणी त्याच अर्थाचा दुसरा शब्द ठेवल्यामुळे श्लेष नाहीसा झाला, तर तो शब्दश्लेष व समानार्थक शब्दाने श्लेष कायम राहिला तर तो अर्थश्लेष . ‘तू मलिन , कुटिल, नीरस जडहि पुनर्भवपणेहि कच साच’ या मोरोपंताच्या आर्येतील ‘मलिन, कुटिल, नीरस, जड’ हे शब्द बदलून त्याच अर्थांने दुसरे शब्द वापरले तरी श्लिष्ट अर्थ नाहीसा होत नाही. पुढील उदाहरणे पाहाः (१) श्रीकृष्ण नवरा मी नवरी । शिशुपाल नवरा मी न- वरी । (२) कुस्करु नका ही सुमने । जरी वास नसे तिळ यांस, तरी तुम्हांस अर्पिली सु – मने ॥ (३) ते शीतलोपचारे जागी झाली हळूच मग बोले। औषध नलगे मजला, परिसुनि माता ‘बरे’ म्हणुनि डोले ॥ वरील पद्यपंक्तीतील (१) नवरी, न – वरी (२) सुमने, सु – मने (३) नलगे, न-लगे, अशा रीतीने त्या त्या शब्दांची फोड केल्यानंतर दोन अर्थ कळून येतात. या प्रकारच्या श्लेषाला ‘सभंग श्लेष’ व एकच शब्द जसाच्या तसा ठेवून त्याचे जेव्हा दोन अर्थ संभवतात त्यास ‘अभंग श्लेष’ म्हणतात. अर्थालंकार आता आपण ‘अर्थालंकारांचा’ अभ्यास करुया. अनेकदा शब्दांच्या अर्थामुळे काव्यात किंवा गद्यरचनेत सौंदर्य निर्माण होत असते अर्थालंकाराच्या संदर्भात आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की आपल्याला जे सांगावयाचे आहे ते प्रभावी रीतीने सांगण्यासाठी त्यासारख्याच दुस-या गोष्टीची आपण मदत घेतो. त्याची तुलना करतो. उदा. ‘सुरेशचे अक्षर चांगले आहे’ हे आपल्याला सांगावयाचे आहे. म्हणून आपण ‘अक्षरांची तुलना मोत्याशी’ करतो. आणि वाक्य तयार करतो.‘सुरेशचे अक्षर मोत्यासारखे सुंदर आहे’. येथे ‘अक्षर’ व ‘मोती’ यांच्यातील साम्य आपल्यासमोर येते. आणखी काही उदाहरणेः (१) शाळा मातेप्रमाणे आहे. (२) आमच्या गावातील पाटील हे कर्णासारखे दानशूर आहेत. (३) आमच्या वर्गातील समीर प्रा. शिवाजीराव भोसले यांच्यासारखा चांगला वक्ता आहे. वरील वाक्यांसारखी वाक्ये तयार करताना त्यात सहजपणा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जे सांगावयाचे आहे. ते परिणामकारकपणे, सुंदर रीतीने सांगावे अशी भावना आहे. अलंकाराच्या संदर्भातील महत्त्वाचे शब्द , किंवा अलंकारात येणारे घटक पुढीलप्रमाणे असतात (अर्थात ते सर्वच अलंकारात असतात असे नव्हे). (१) उपमेय – ज्याची तुलना करावयाची आहे, ते किंवा ज्याचे वर्णन करावयाचे आहे , तो घटक - (२) उपमान - ज्याच्याशी तुलना करावयाची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक (३) साधारणधर्म – दोन वस्तूंत असणारा सारखेपणा किंवा दोन वस्तूंत असणारा समान गुनधर्म. (४) साम्यवाचक शब्द – वरील सारखेपणा दाखविण्यासाठी वापरला जाणारा शब्द. उपमेय आणि उपमान या शब्दांसाठी ‘प्रकृत अप्रकृत’ किंवा ‘प्रस्तुत – अप्रस्तुत अशा शब्दांचाही उपयोग केला जातो. वरील घटकांचा अर्थ समजून घेण्यासाठी वरीलपैकी एक वाक्य उदाहरण म्हणून घेऊ. ‘सुरेशचे अक्षर मोत्यांसारखे सुंदर आहे’ वरील वाक्यात – सुरेशचे अक्षर हे उपमेय आहे. सुरेशच्या अक्षरांची तुलना ‘मोत्यांशी केली आहे. ‘मोती’ हे उपमान आहे. अक्षर व मोती यांतील सारखेपणा ‘सुंदर’ या शब्दाने दाखविला आहे. ‘सुंदर’ हे साम्य आहे. किंवा सुंदरता’ हा साधारणधर्म आहे. ‘सारखा’ हा शब्द साम्यवाचक शब्द आहे. गद्य किंवा काव्यातील सौंदर्य समजून घेण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी व तो व्यक्त करण्यासाठी अलंकारांचा अभ्यास आवश्यक आहे. तसेच आपणही आपल्या लेखनात परिणामकारकता व सौंदर्य निर्माण करण्यासाठी अलंकारांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. विद्यार्थिदशेत आपले निबंधलेखन प्रभावी होण्यासाठी अशा अलंकाराच्या अभ्यासाचा उपयोग होतोच . पण काही विद्यार्थ्यांमध्ये प्रतिभेची दैवदत्त देणगी असते.त्यांना डोळसपणाने अलंकारांचा अभ्यास करुन एक चांगली दिशा मिळू शकते. याचा अर्थ वृत्ते आणि अलंकार यांचा अभ्यास करुन कवी निर्माण होतात असा नाही . मात्र रसिकतेला डोळसपणाची जोड देण्यासाठी अलंकारांच्या अभ्यासाची मदत अवश्य होते. वृत्तांप्रमाणेच अलंकारांचा अभ्यास करतानाही लक्षण व उदाहरण (किंवा उदाहरणे) अशा दोन मुद्दांचा समावेश होतो. (५) उपमा – पुढील वाक्ये वाचाः (१) मुंबईची ‘घरे’ मात्र लहान ! कबुतराच्या खुराड्यांसारखी ! (२) सावळाच रंग तुझा पावसाळि नभापरी ! (३) आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे! वरील वाक्यांतून दोन वस्तूतील सारखेपणा कसा सुंदर रीतीने वर्णिलेला आहे पाहा.अशा प्रकारे, दोन वस्तूंतील साम्य चमत्कृतिपूर्ण रीतीने जेथे वर्णन केलेले असते तेथे ‘उपमा’ हा अलंकार होतो. उपमेत एक वस्तू दुस-या वस्तूसारखी आहे असे वर्णन असते. उपमेचे चार घटक असतातः (१) उपमेय (ज्याची तुलना करावयाची ते) (२) उपमान (ज्याच्याशी तुलना करावयाची ते), (३) साधारणधर्म (दोन वस्तूंत असलेला सारखेपणा), (४) साम्यवाचक शब्द (सारखेपणा दाखविणारे शब्द). सारखेपणा दाखविल्याखेरीज उपमा होत नाही म्हणून उपमा अलंकारात ‘सारखा , जसा, जेवि, सम सदृश, गत परी, समान’ यांसारखे साम्यवाचक शब्द येतात. उपमेय व उपमान या जोडीलाच ‘प्रस्तुत – अप्रस्तुत’ , ‘प्रकृत – अप्रकृत’ अशी नावे आहेत. (६) उत्प्रेक्षा - उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. ज्या दोन वस्तूंची आपण तुलना करतो त्यांतील एक (उपमेय) ही जणू काही दुसरी वस्तू (उपमान) च आहे अशी कल्पना करणे याला उत्प्रेक्षा म्हणतात. पुढील वाक्ये वाचाः (१) ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. (२) अत्रीच्या आश्रमीं । नेलें मज वाटें । माहेरची वाटें ।खरेखुरें। (३) किती माझा कोंबडा मजेदार । मान त्याची कितीतरी बाकदार । शिरोभागी ताबंडा तुरा हाले । जणू जास्वंदी फूल उमललेले ॥ अर्धपायी पांढरीशी विजार । गमे विहगांतिल बडा फौजदार॥ कोंबड्याचा तुरा हे कवीला जणू उमललेले जास्वंदीचे फूल वाटले किंवा पांढ-या अर्ध्या विजारीमुळे तो पक्ष्यांतला बडा फौजदार भासला, ही कल्पना म्हणाजेच उत्प्रेक्षा. उपमेय हे जणू उपमानच आहे असे जेथे वर्णिलेले असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार असतो. (उत्प्रेक्षा अलंकारात ‘जणू, जणूकाय, गमे, वाटे, भासे, की’ यांसारखे साम्यवाचक शब्द येतात.) (६) अपन्हुती - पुढीलकाव्यपंक्ती वाचाः न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातिल । न हे वदन, चंद्रमा शरदिता गमे केवळ ॥ पहिल्या ओळीत कवीला डोळ्यांचे वर्णन करावयाचे आहे. हे करताना त्यांची तुलना तो कमळाच्या पाकळ्यांशी करतो. या वाक्यांत ‘नयन’ हे उपमेय आहे. ‘कमळातल्या पाकळ्या’ हे उपमान. येथे डोळे हे डोळे नसून त्या कमळाच्या पाकळ्या आहेत असे सांगताना त्याने उपमेयाला दूर सारुन म्हणजे उपमेयाचा निषेध करुन त्याच्या जागी उपमानाची स्थापना केली. दुस-या ओळीत वदन ( = तोंड) याबद्दल सांगायचे असूनही त्याचा निषेध करुन तो शरदॠतूचा चंद्र आहे असे म्हणून उपमानाची स्थापना केली. ‘ अपन्हुती’ याचा अर्थ ‘झाकणे, लपविणे’ असा आहे. या अलंकारात उपमान हे उपमेयाचा निषेध करुन ते उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा ‘अपन्हुती’ हा अलंकार होतो. आणखी काही उदाहरणेः (१) आई म्हणोनि कोणी । आईस हाक मारी ती हाक येई कानी । मज होय शोककारी नोहेच हाक माते । मारी कुणी कुठारी (२) ओठ कशाचे ? देठचि फुलल्या पारिजातकाचे । (३) हे ह्रदय नसे, परी स्थंडिल धगधगलेले । (४) मानेला उचलीतो, बाळ मानेला उचलीतो । नाहि ग बाई, फणा काढुनि नाग हा डिलतो ॥ (७) रुपक - पुढील पद्यपंक्ती किंवा वाक्ये पाहाः (१) बाई काय सांगो । स्वामीची ती दृष्टी । अमृताची वृष्टी । मज होय ॥ (२) ऊठ पुरुषोत्तमा ।वाट पाहे रमा । दावि मुखचंद्रमा । सकळिकांसी ॥ (३) लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. आकार द्यावा तशी मूर्ती घडते. यांतील पहिल्या उदाहरणात स्वामीची दृष्टी व अमृताची वृष्टी ही दोन्ही एकरुपच मानली आहेत. दुस-या वाक्यातील उपमेय (मुख) व उपमान (चंद्र) ही एकरुप मानून ‘मुखचंद्रमा’ असा शब्दप्रयोग केला आहे. तिस-या वाक्यात लहान मूल हे मातीच्या गोळ्यासारखे आहे असे नुसते उपमेय व उपमान यांतील केवळ सादृश्य न दाखविता त्यांच्यातील अभेद वर्णिलेला आहे. अशा प्रकारे उपमेय व उपमान यांत एकरुपता आहे. ती भिन्न नाहीत असे वर्णन जेथे असते तेथे रुपक हा अलंकार असतो. उपमेत एक वस्तू दुस-यासारखी आहे असे (सादृश्य) वर्णन केलेले असते. उपमेच्या थोडे पुढे जाऊन उत्प्रेक्षेत त्या दोन जवळजवळ सारख्या (एकत्व) असल्याची कल्पना केलेली असते. रुपकात आण्खी थोडे पुढे जाऊन त्या दोन वस्तू (उपमेय व उपमान) एकरुप असल्याचे स्पष्टपणाने सांगितले असते. उत्प्रेक्षेप्रमाणे त्यात गुळमुळीतपणा नसतो. (८) व्यतिरेक - त्याहीपुढे जाऊन उपमेय हे एखाद्या गुणाच्या बाबतीत उपमानापेक्षाही सरस असल्याचे वर्णन केले जाते. पुढील वाक्य पाहाः अमृताहुनीही गोड । नाम तुझे देवा ॥ या वाक्यात परमेश्वराचे नाव हे उपमेय. याची तुलना अमृताच्या गोडीशी केली आहे. इतकेच नव्हे तर परमेश्वराचे नाव हे गोडीच्या बाबतीत अमृतापेक्षाही वरचढ असल्याचे वर्णिले आहे. म्हणून उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले असेल तर ‘व्यतिरेक ‘ हा अलंकार होतो. व्यतिरेक = आधिक्य . उपमेयाचे उपमानावर आधिक्य म्हणाजे व्यतिरेक. हे आधिक्य दोन प्रकारांनी दाखविता येतेः (१) उपमेयाच्या उत्कर्षाने व (२) उपमानाच्या अपकर्षाने. या अलंकाराची आणखी काही उदाहरणेः (१) कामधेनुच्या दुग्धाहुनिही ओज हिचे बलवान । (२) तू माउलीहून मयाळ । चंद्राहूनि शीतळ । पाणियाहूनि पातळ ।कल्लोळ प्रेमाचा ।। (३) सावळा ग रामचंद्र । रत्नमंचकी झोपतो । त्याला पाहता लाजून । चंद्र आभाळी लोपतो ॥ (९) अनन्वय - आतापर्यंत एखाद्या वस्तूची दुस-याशी तुलना करुन आपण वर्णन करीत होतो; पण उपमेय हे केव्हा – केव्हा एखाद्या गुणाच्या बाबतीत इतके अद्वितीय असते की त्याला योग्य असे उपमान मिळू शकत नाही. उपमेयाची तुलना त्याच्याशी करावी लागते म्हणजे अशा वाक्यात उपमेय हेच उपमान असते, उदा. अर्जुनाचे वर्णन करताना कवी मोरोपंत म्हणतात. झाले बहु, होतिल बहु, आहेतहि बहु, परंतु यासम हा । अशा रीतीने उपमेयाला दुस-या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणजे जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा ‘अनन्वय’ अलंकार होतो. (अन्वय = संबंध ) ज्या वाक्यात तुलना करण्याचा संबंधच येत नाही तो अनन्वय. आणखी काही उदाहरणेः (१) आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्यापरी । (२) या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान । (१०) भ्रान्तिमान - रुपक अलंकारात उपमेय व उपमान यात भेद नसून ती एकरुप आहेत असे आपण मानतो. पण उपमानाच्या जागीउपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी काही कृती घडली तर तेथे भ्रांतिमान अलंकार असतो. उदा. हंसा विलोकुनि सुधाकर अष्टमीचा । म्यां मानिला निटिलदेश तिचाच साचा । शंख – द्वयी धरुनि कुंकुम कीरवाणी । लावावया तिलक लांबविला स्वपाणी ॥ अष्टमीचा चंद्र हा दमयंतीचा भालप्रदेश असावा अशी समजूत करुन घेऊन तिच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावण्यासाठी नळराजाने आपला हात लांब केला. या अलंकाराचे दुसरे उदाहरण पाहाः भृंगे विराजित नवीं अरविंदपत्रें । पाहूनि मानुनि तिचीच विसाल नेत्रें । घालीन अंजन अशा मतिनें तटाकीं । कांते वृथा उतरलो, भिजलो विलोकी ॥ भुंग्यांनी सुशोभित झालेली कमलपत्रे हे दमयंतीचे नेत्रच असे समजून तिच्या डोळ्यांत अंजन घालावयास नलराजा पुढे सरसावला व पाण्यामुळे भिजला. (११) ससंदेह - भ्रान्तिमान अलंकारात उपमान हे उपमेय आहे असा जो भ्रम होतो तो निश्चित असतो पण उपमेय कोणते व उपमान कोणते असा संदेह किंवा संशय निर्माण होऊन मनाची जी द्विधा अवस्था होते, त्या वेळी ‘ससंदेह’ हा अलंकार असतो. ससंदेह अलंकारात अभेदाची कल्पना नसून ती विकल्पाची (हा का तो? अशी) असते उदा. (१) चंद्र काय असे , किंवा पद्म या संशयान्तरी । वाणी मधुर ऐकोनी कळले मुख ते असे ॥ (२) चांदण्या रात्री गच्चीवर पत्नीच्या मुखाकडे पाहताना प्रियकराला वाटलेः कोणता मानू चंद्रमा ? भूवरीचा की नभीचा? चंद्र कोणता ? वदन कोणते ? शशांक- मुख की मुख – शशांक ते ? निवडतील निवडोत जाणाते मानी परि मन सुखद संभ्रमा – मानू चंद्रमा, कोणता? (१२) अतिशयोक्ती - प्रत्येकी गोष्टीचे चमत्कृतिपूर्ण करायचे म्हणजे त्यात थोडी अतिशयोक्ती आलीच. तिचे मुख चंद्रासारखे आहे किंवा डोळे कमळासारखे आहेत हे म्हणताना खूलवून सांगायचे असते.उपमा, उत्प्रेक्षा, रुपक, व्यतिरेक या अलंकारांत थोडी अतिशयोक्ती असतेच; पण केवळ अतिशयोक्तीच जेथे प्रामुख्याने केलेली असते तेव्हा तो एक स्वतंत्र ‘अतिशयोक्ती’ अलंकार मानला जातो. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करुन सांगितलेली असते. त्या वेळी अतिशयोक्ती हा अलंकार होतो. मुलींच्या भोंडल्यातील एक गीत पाहाः दमडिचं तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं मामंजींची दाढी झाली, भाविजींची शेंडी झाली उरलं तेल झाकून ठेवलं , लांडोरीचा पाय लागला वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. दमडीच्या तेलात कोणकोणत्या गोष्टी उरकल्या हे सांगताना त्या वस्तुस्थितीपेक्षा किती फुगवून सांगितल्या आहेत पाहा. नळराजाच्या घोड्याच्या दौडीचे वर्णन करताना कवी म्हणतोः जो अंबरी उफळता खुर लागलाहे । तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे ॥ चंद्रावरचा डाग म्हणजे नलराजाच्या घोड्याच्या उफाळण्यामुळे त्याच्या खुराचा लागलेला डाग . हे म्हणणे जरी असंभवनीय असले, तरी तसे घडल्याचे वर्णन केल्यामुळे अतिशयोक्ती झाली . कोणत्याही गोष्टीचे कारण घडल्यानंतर कार्य घडत असते; पण याच्या उलट प्रकार घडल्याचेही कवी केव्हा – केव्हा सांगून मोकळा होतो. उदा. काव्य अगोदर आले नंतर जग झाले सुंदर । रामायण आधी मग झाला राम जानकीवर ॥ जगाच्या अगोदर काव्य निर्माण झाले व रामाच्या अगोदर रामायण घडले असे सांगणे यात असंभाव्यतेची परमावधी आहे. हाही अतिशयोक्तीचा एक प्रकार होय. असंभाव्य किंवा अशक्य गोष्टी शक्य झाल्याचे वर्णन जेथे असते तेथे अतिशयोक्ती हा अलंकार होतो. (१३) दृष्टान्त - पुढील पद्यपंक्ती वाचाः लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा । ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार । तुकारामहाराज परमेश्वराजवळ लहानपण मागतात. मोठेपणात यातना सहन कराव्या लागतात, हे पटवून देण्यासाठी क्षुद्र अशा मुंगीला साखरेला रवा खायला मिळतो तर ऐरावताला अंकुशाचा मार खावा लागतो, ही उदाहरणे दिली आहेत. दुसरे उदाहरण पाहाः न कळता पद आग्निवरी पडे । न करि दाह असे न कधी घडे । अजित नाम वदो भलत्या मिसे । सकल पातक भस्म करीतसे ।। कोणत्याही निमित्ताने परमेश्वराचे नाव तोंडातून आले की ते सगळी पापे नाहीशी करुन टाकते, हे कवीला सांगावयाचे आहे. हीच गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच्याशेजारी त्याच अर्थाचे दुसरे एक उदाहरण दिले आहे. न कळत जरी पाय विस्तवावर पडला तरी तो भाजल्याशिवाय राहात नाही. अशा रीतीने एखाद्या विषयाचे वर्णन करुन झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टान्त अलंकार होतो. उपमेमध्ये सादृश्य दाखविताना ‘ जसे, जेवी, सम, सारखा’ यांसारखे शब्द येतात. दृष्टान्तात सादृश्य असते, पण ते दाखविणारे साम्यवाचक शब्द नसतात. हा या दोन अलंकारांतील फरक लक्षात ठेवावा.। (१४) अर्थान्तरन्यास - पुढील ओळी वाचा । बोध खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होय गरल । श्वानपुच्छ नलिकेत घातले होईना सरळ ॥ (खल = दृष्ट, अहि = साप, गरल = विष ) दृष्ट माणसाला कितीही चांगला उपदेश केला तरी तो आवडत नाही. सापाला पाजलेल्या गुधाचे विषातच रुपांतर होते. हे सांगून झाल्यानंतर जीवनात येणारा हा अनुभव ‘कुत्र्याची शेपटी नळीत घातली तरी ती वाकडीच राहणार’ या अर्थाच्या वरील वाक्याने सर्वसामान्य सिध्दान्ताच्या स्वरुपात मांडला आहे.दुसरे उदाहरण पाहाः तदितर खग भेणे वेगळाले पळाले । उपवन – जल – केली जे कराया मिळाले ॥ स्वजन , गवसला जो, त्याजपाशी नसे तो । कठिण समय येता कोण कामास येतो ?। (भेणे – भीतीने, जल केली = जलक्रीडा ) नलाने हंसाला पकडल्यानंतर बागेत जलक्रीडेसाठी जमलेले इतर सर्व पक्षी घाबरुन पळाले. त्याच्याजवळ कोणीच राहिले नाही . एवढी हकिकत सांगून झाल्यावर कवीने यावरुन एक सामान्य सिध्दान्त सांगितला कीः कठिण प्रसंगी कोणीच आपल्या उपयोगी पडत नाही . विशेष गोष्टीच्या समर्थनार्थ येथे एक सामान्य सिध्दान्त सांगितला त्याच्या उलटही प्रकार असतो. ‘मरणात खरोखर जग जगते’ किंवा ‘जन पळभर म्हणतिल हायहाय’ या कविवर्य तांब्याच्या कवितांत प्रथम सामान्य सिध्दान्त सांगून त्याच्या समर्थनार्थ विशेष दाखले दिलेले आढळतात. यावरुन एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे किंवा विशेष उदाहरणांवरुन शेवटी एखाद्या सिध्दान्त काढला तर अर्थान्तरन्यास हा अलंकार होतो. (अर्थान्तर = दुसरा अर्थ. न्यास = शेजारी ठेवणे.) अर्थान्तरन्यास – एका अर्थाचा समर्थक असा दुसरा अर्थ त्याच्या शेजारी ठेवणे, असा या अलंकाराचा अर्थ आहे . काही कवींनी आपल्या कवितांत काढलेले काही सामान्य सिध्दात खाली दिलेले आहेत. (१) एका हाते कधितरि मुली वाजते काय टाळी ? (२) सावळा वर बरा गौर वधुला । (३) जातीच्या सुंदरांना काहीही शोभते । (४) मूळ स्वभाव जाईना । (५) का मरणि अमरता ही न खरी ? (६) अत्युच्ची पदि थिरही बिघडतो हा बोल आहे खरा । (१५) स्वभावोक्ती – अलंकारात कोणत्याही गोष्टीचे वर्णन करताना नेहमीची साधी भाषा न वापरता ती परिणामकारक व सुंदर करण्यासाठी थोडी कृत्रिम किंवा चमत्कृतिपूर्ण अशी भाषा आपण वापरतोच. अलंकार म्हटले की थोडी कृत्रिमता आलीच ; पण साधेपणात व सहजतेतही सौंदर्य असते ही गोष्ट लक्षात घेता एखाद्या व्यक्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे त्याच्या स्वाभाविक स्थितीचे किंवा हालचालीचे यथार्थ (हुबेहुब) पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन हाही एक भाषेचा अलंकार ठरतो, याला स्वभावोक्ती अलंकार असे म्हणतात. कवी मर्ढेकरांनी गणपत वाण्याचे कसे वेधक चित्र पुढील ओळींत काढले आहे पाहाः गणपत वाणी विडी पिताना, चावयाचा नुसतिच काडी; म्हणायला अन् मनाशीच की, ह्या जागेवर बांधिन माडी. मिचकावुनी मग उजवा डोळा, आणि उडूवुनी डावी भिवई; भिरकावुनि ती तशिच द्यायचा, लकेर बेचव जैशी गवई . दुसरे उदाहरण – बागेतील तळ्याच्या काठी शांत झोपलेल्या हंसाचे वर्णन रघुनाथपंडितांनी कसे केले आहे पाहाः पोटींच एक पद लांबविला दुजा तो । पक्षी तनू लपवि, भूप तया पहातो ॥ व त्याला पकडण्यासाठी तयारी करणा-या नळराजाचे पुढील वर्णन पाहाः टाकी उपानह, पदें अतिमंद ठेवी । केली विजार वरि, डौरहि, मौन सेवी ॥ (उपानह, = जोडे, डौर = झगा ) तसेच, ‘केवढे हे क्रौर्य’ या कवितेच्या अखेरी गतप्राण झालेल्या पक्षिणीचे रे. टिळकांनी केलेले वर्णन पाहाः मातीत ते पसरले अतिरम्य पंख । केले वरी उदर पांडूर निष्कलंक ॥ चंचू तशीच उघडी पद लांबवीले । निष्प्राण देह पडला श्रमही निमाले ॥ अशा प्रकारच्या हुबेहुब व वेधक वर्णनाला स्वभावोक्ती अलंकार म्हणतात. (१६) अन्योक्ती - अन्योक्ती म्हणजे अन्याला ( = दुस-याला उद्देशून केलेली उक्ती (= बोलणे). कित्येक वेळा स्पष्टपणे एखाद्या व्यक्तीला बोलता येत नाही . अशा वेळी ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुस-याबद्दल बोलून आपले मनोगत व्यक्त करण्याची जी पध्दत तिलाच ‘अन्योक्ती’ असे म्हणतात . उदाः येथे समस्त बहिरे बसतात लोक । का भाषणे मधुर तू करिशी अनेक ॥ हे मूर्ख यांस किमपीहि नसे विवेक । रंगावरुन तुजला गणतील काक ॥ कवी या कवितेत कोकिळ पक्ष्याला उद्देशून बोलत आहे. कोकिळ पक्ष्याचे निमित्त करुन कवी जरी काही म्हणत असला तरी अरसिक जगापुढे आपल्या कलेचे प्रदर्शन करणा-या रसिकाला उद्देशून त्याला बोलायचे आहे. जग कलेचे चीज न करता बाह्य स्वरुपावरुन त्याची किंमत करत असते. हे येथे मोठ्या खुबीने व्यक्त केले आहे. अशाच पध्दतीने पारतंत्र्यातच आनंद मानणा-याला न बोलता पोपटाला उद्देशून तो बोलतो. चंदन, आम्र, गज, सूर्य, श्वान विंचू वगैरेंना उद्देशून त्यांच्यातील उणेपणावर टीका करुन आपले मनोगत व्यक्त करण्याची पध्दत म्हणजे ‘लेकी बोले सुने लागे’ या प्रकारची आहे. सुनेला काही बोलायचे असल्यास स्पष्टपणे तिला न बोलता आडपडद्याने सासू आपल्या मुलीला बोलते. मात्र तिचा सारा रोख सुनेवरच असतो. दुस-याला उद्देशून बोलून आपले मनोगत व्यक्त करण्याच्या पध्दतीला ‘अन्योक्ती’ असे म्हणतात. या अलंकारात कवी प्रस्तुताबद्दल (= ज्याला बोलायचे त्याच्याबद्दल) न बोलता अप्रस्तुतांना (इतरांना) उद्देशून बोलत असतो. म्हणून ‘अन्योक्ती’ ला ‘अप्रस्तुत प्रशंसा’असेही म्हणतात. (१७) पर्यायोक्त – पुढील वाक्ये पहाः (१) त्याचे वडील सरकारचा पाहुणचार घेत आहेत. (तुरुंगात आहेत). (२) काळाने त्याला आमच्यातून हिरावून नेले.(तो मेला) (३) तू जे सांगतोस ती कल्पित कथा वाटते. (तू खोटे बोलतोस). (४) माझ्या उत्तरपत्रिकेवर खूष होऊन परीक्षकांनी मला वन्समोअर दिला आहे. (मी नापास झालो). वरील अनेक वाक्यासमोर कंसात जे विधान केले आहे. ते बोलणा-याला सांगायचे आहे. पण एखादी गोष्ट सरळ शब्दांत न सांगता वळणे घेत –घेत तो आपले विचार पर्यायाने म्हणजे वेगळ्या रीतीने व्यक्त करतो. विशेषतः एखादी अप्रिय, अशुभ, बीभत्स किंवा अमंगल गोष्ट व्यक्त करायची असल्यास असेच वळणावळणाचे बोलणे योग्य ठरते. म्हणून पर्यायोक्त हा अलंकार मानला जातो. एखादी गोष्ट सरळ शब्दांत न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने (आडवळणाने) सांगणे यास ‘पर्यायोक्त’ असे म्हणतात. (१८) विरोध किंवा विरोधाभास - पुढील उदाहरण पहाः कठोर वज्रापेक्षाही मृदू पुष्पाहुनी अशी । लोकोत्तरांची ह्रदये कळती न कुणासही ॥ येथे लोकोत्तर माणसांची अंतःकरणे वज्रापेक्षाही कठोर व फुलापेक्षाही मृदू असतात, असे सांगून दोन विरुध्द गुण एकत्र असल्याचे दाखवून वरवर विरोध दर्शविला आहे; पण ही कठोरता व मृदुता एकाच विषयाबद्दल नसते. गरिबांबद्दल ही अंतःकरणे मृदु होत असली तरी दुष्टांच्या बाबतीत ती कठोर झाल्याप्रमाणे वाटतात. यात खरोखर विरोध नसून विरोधाचा आभास निर्माण केलेला आहे. ‘मरणात खरोखर जग जगते’ या कवी तांबे यांच्या ओळीत ‘मरण’ व ‘जगते’ या विरुध्द गोष्टी एकत्र आल्याने विरोधाचा आभास निर्माण होतो. अशा रीताने, एखाद्या विधानात वरवर दिसायला विरोध आहे असे वाटते; पण वास्तविक तसा विरोध नसतो. अशा ठिकाणी ‘विरोधाभास’ हा अलंकार असतो. या विरोधाचा परिहार (= निराकरण) करता येतो. आणखी काही उदाहरणेः (१) वियोगार्थ मीलन होते नेम हा जगाचा । (२) जरी आधंळी मी तुला पाहते । (३) स्वतःसाठी जगलास तर मेलास । दुस-यासाठी जगलास तरच जगलास. (४) सर्वच लोक बोलू लागते की कोणीच ऐकत नाही. (१९) असंगती - विरोधाभासात दोन विरुध्द गोष्टी एकत्र असल्याचा भास होतो. पण याउलट ज्या गोष्टी एकत्र असायला हव्यात त्या भिन्न ठिकाणी असल्याचे वर्णन पाहावयास मिळते. जेथे कारण तेथेच कार्य घडावयास हवे; पण कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुस-या ठिकाणी असे जेथे वर्णन असते त्यास ‘असंगती’ अलंकार म्हणतात. कविवर्य तांबे यांची पुढील कविता या अलंकाराचे उत्कृष्ट उदाहरण होयः कुणि कोडे माझे उकलिल का? कुणि शास्त्री रहस्य कळविल का? ह्रदयि तुझ्या सखि, दीप पाजळे । प्रभा मुखावरि माझ्या उजळे ॥ नवरत्ने तू तुज भूषविले । मन्मन खुलले आतिल का? ॥ गुलाब माझ्या ह्रदयी फुलला । रंग तुझ्या गालावर खुलला काटा माझ्या पायी रुतला । शूल तुझ्या उरि कोमल का? माझ्या शिरि ढग निळा डवरला । तुझ्या नयनि पाउस खळखळला शरच्चंद्र या ह्रदयि उगवला । प्रभा तुझ्या उरि शीतल का? (२०) सार – पुढील उदाहरण पाहाः आधीच मर्कट तशातही मद्य प्याला । झाला तशात जरि वृश्चिक दंश त्याला । झाली तयास तदनंतर भूतबाधा । चेष्टा वदू मग किती कपिच्या अगाधा ॥ आधीच माकड, त्याचे दारु पिणे, त्यात त्याला विचू चावणे व मग भूतबाधा होणे या माकडाच्या चेष्टा क्रमाक्रमाने येथे वाढत गेल्याचे दाखविले आहे. अशा रीतीने एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधलेला असतो. तेचा ‘सार’ हा अलंकार असतो. इंग्रजीत याला climax असे म्हणतात. याचा अर्थ शिडी. शिडीप्रमाणे एखादी कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने तेथे मांडलेली असते. पुढील उदाहरण पाहाः (१) काव्यात नाटके रम्य, नाटकांत ‘शकुंतला’ । त्यामध्ये चवथा अंक , त्यातही चार श्लोक ते ॥ (२) वाट तरी सरळ कुठे पांदीतिल सारी । त्यातुन तर आज रात्र अंधारी भारी ॥ आणि बैल कसल्याही बुजती आवाजा । किरकिरती रातकिडे झाल्या तिन्हिसांजा ॥ (२१) व्याजस्तुती - (व्याज = खोटे, कपट, ढोंग) ‘विद्वान आहात झालं !’ किंवा ‘केवढा उदार रे तू !’ असे जेव्हा आपण बोलतो तेव्हा बाह्यातः आपण स्तुती केल्याचा भास होतो पण खरोखर ती निंदा असते. ‘अरे चोरा !’ असे जेव्हा आई कौतुकाने मुलाला म्हणते त्या वेळी वरुन ती निंदा करते पण आतून ती स्तुती अस्ते. अशा प्रकारेबाह्यतः स्तुती पण आतून निंदा किंवा बाह्यतः निंदा पण आतून स्तुती असे जेथे वर्णन असते तेथे ‘व्याजस्तुती’ हा अलंकार असतो. पुढील उदाहरण पाहाः (१) होतीवदनचंद्राच्या दर्शनाचीच आस ती । अर्धचंद्रच तू द्यावा. कृपा याहून कोणती? ॥ (२) सर्वास सर्व देशी मिथ्या ही तव स्तुती महीपाला । न परस्त्रिया दिले त्वा वक्ष, न वा पृष्ठ तव विपक्षाला ॥ (३) म्हणूनिया आलो तेव्हा परतुनी घराला काव्य ऐकविले ते सहधर्मचारिणीला गानलुब्ध तीही होई झोप ये तियेला काव्यरसिक तिजसम कोणी जगामधि असेल ? (२२) व्याजोक्ती - ( व्याज + उक्ती = खोटे बोलणे ) एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण देण्याचा जेथे प्रयत्न होतो तेथे ‘व्याजोक्ती’ हा अलंकार असतो. उदाः (१) येता क्षण वियोगाचा पाणी नेत्रांमध्ये दिसे । डोळ्यांत काय गेले हे?’ म्हणुनी नयना पुसे ॥ (२) ‘काय गे बघशी मागे वळुनी वळुनि अशी?’ । विचारिता म्हणे, ‘माझी राहिली पिशवी कशी?’ ॥ (२३) चेतनगुणोक्ती - निसर्गातील एका दृश्याचे पुढील वर्णन पाहाः ‘ती पाहा, सर्वात मागे आपली मान उंचावून पाहणारी टेकडी, तिच्या पायाजवळून उड्या मारीत गात जाणारा तो अवखळ झरा, त्याच्या दोन्ही हातांला पसरलेली, हसणारी व वा-याअने डुलणारी शेते, सायंकाळच्या अशा प्रशांत वातावरणात तिथे ध्यानस्थ बसलेली एकच एक झोपडी व तिच्यावर आपल्या मायेचे छत्र धरुन उभा असलेला वृक्ष!’ कल्पना किती रम्य वाटते , नाही? निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करुन ती मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जेथे वर्णन असते तेथे ‘चेतनगुणोक्ती’ हा अलंकार असतो. आणखी उदाहरणे पाहाः (१) आला हा दारि उभा वसंत फेरीवाला पोते खांद्यावरि सौद्याचे , देइल ज्याचे त्याला (२) कुटुंबवत्सल इथे फणस हा । कटिखांद्यावर घेउनि बाळे कथिते त्याला कुशल मुलांचे । गंगाजळिचे बेत आगळे
भाषेचे अलंकार
शब्दाच्या शक्ती रस व काव्यगुण
भाषा हे आपले विचार व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम आहे. भाषा ही विविध शब्द, वाक्य यांनी तयार होते. केवळ अनेक शब्द एकापुढे एक ठेवून वाक्य तयार होईल; परंतु आपल्याला द्यावयाचा संदेश, व्यक्त करावयाची भावना, विचार प्रभावी होण्याकरिता योग्य, सूचक आणि पोषक शब्दांची योजना करावयास हवी. अनेक शब्दांतून योग्य शब्दांची निवड आपल्याला करता आली पाहिजे . प्रत्येक शब्दामध्ये प्रकट करण्याची अंगभूत शक्ती असते. ही शब्दशक्ती वापर करणा-यास अचूक माहिती हवी. शब्दांच्या अंगी तीन प्रकारची शक्ती असते. (१) अभिधा (२) लक्षणा (३) व्यंजना एखाद्या शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा एक शब्दशः, शब्दकोशगत सरळ व रुढ अर्थ समजतो. लोकांनी संकेतानी तो ठरविलेला असतो. ‘साप’ हा शब्द उच्चारल्याबरोबर किंवा वाचल्याबरोबर ‘एक सरपटणारा प्राणी’ एवढे आपल्याला कळते. हा अर्थ व्यक्त करण्याची या शब्दातली ही जी शक्ती तिला ‘अभिधा’ असे म्हणतात. या अभिधाशक्तीच्या साहाय्याने प्रगट होणारा जो अर्थ त्यास ‘वाच्यार्थ’ म्हणतात. आता पुढील वाक्ये पाहाः ‘समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत’. या वाक्यात लेखकाला किंवा हे उच्चारणा-या व्यक्तीला ‘साप’ या शब्दाचा वाच्यार्थच केवळ अभिप्रेत नाही. ‘साप’ या शब्दातून ‘दुष्ट’ माणसे असा त्यातून ध्वनित होणारा दुसरा एक अर्थ सुचवायचा आहे. म्हणाजे मूळ अर्थाला बाध न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती आहे तिला ‘व्यंजना’ शक्ती असे म्हणतात. या शक्तीने प्रकट होणा-या अर्थाला ‘व्यंग्यार्थ’ असे म्हणतात. पाच वाजले. या वाक्याचा वाच्यार्थ म्हणजे ‘घड्याळाने पाच वाजल्याचे दर्शविले.’ पण या वाक्यावरुन निरनिराळ्या व्यक्तीनां निरनिराळे इतर अर्थ कळतात. शाळेतल्या मुलांना वाटते ‘शाळा सुटण्याची बेळ झाली’, बाबांना वाटते ‘चहा घेण्याची वेळ झाली’, आजीला वाटते ‘देवाला जावयाची वेळ झाली; , शाळेच्या शिपायाला वाटते ‘शाळा बंद करण्याची वेळ झाली’, वगैरे. मूळ अर्थ आहे तसा राहून त्यातून जो दुसरा अर्थ सूचित होतो त्यास ‘व्यंग्यार्थ’ म्हणतात. काव्यात या व्यंग्यार्थाला विशेष महत्त्व असते. आपल्या नेहमीच्या बोलण्यात असे काही शब्द वा वाक्ये येतात, की त्यांचा शब्दशः अर्थ घेतला तर भलताच अर्थ निर्माण होतो. अशा वेळी शब्दशः अर्थ न घेता त्याच्याशी सुसंगत असलेला असा दुसराच अर्थ घ्यावा लागतो. उदाः जेवणाची पाने वाढून तयार झाली की आपण म्हणातो, ‘चला, पानावर बसा. ‘ याठिकाणी ‘पानावर’ याचा शब्दशः अर्थ घेतला तर अनर्थ होईल म्हणून त्याचा अर्थ ‘पानाशेजारी’ किंवा ‘पाटावर’ असा घेणे इष्ट ठरते. तसेच, ‘आम्ही गहू खातो’ याचा अर्थ ‘गहू’ हे धान्य असा न करता ‘गव्हापासून तयार केलेले पदार्थ’ असाच करायला हवा. म्हणजे शब्दाच्या मूळ अर्थाला बाध येत असेल तर त्याला जुळेलसा दुसरा अर्थ घ्यावा लागतो. या शब्दाच्या शक्तीस ‘लक्षणा’ शक्ती असे म्हणतात व या शक्तीमुळे प्रगट होणा-या अर्थास ‘लक्षार्थ’ असे म्हणतात. अभिधा, लक्षणा व व्यंजना या शब्दांच्या तीन शक्ती असून त्यांच्या साहाय्यान प्रगट होणारे अनुक्रमे वाच्यार्थ, लक्ष्यार्थ व व्यंग्यार्थ असे तीन अर्थ आहेत. विशेषतःव्यंग्यार्थामुळे काव्यात सूचकता येते व काव्य अधिक परिणामकारक होते. रस ‘रस’ याचा शब्दशः अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात रस सहा आहेतः गोड, कडू, आंबट, तिखट, तुरट व खारट . एखाद्या वस्तूत असलेली चव जशी आपण घेतो. तशीच एखाद्या उत्कृष्ट काव्यातून त्यातील चव वा गोडी आपण अनुभवतो; यालाच आपण ‘रसास्वाद’ म्हणतो. वाडःमयातील हा रस म्हणजे काय हे आपण पाहू. प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात काही भावना कायमच्या वास करीत असतात. माणसाच्या अंतःकरणात जशी प्रेम करण्याची भावना आहे, तशी रागवण्याची , हसण्याची, दुःखाची पराक्रमाची अशा विविध प्रकारच्या भावना आहेत. या स्थिर व शाश्वत भावनांना ‘स्थायीभाव’ असे म्हणतात. या स्थायीभावांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. (१) रती (२) उत्साह (३) शोक (४) क्रोध (५) हास (६) भय (७) जुगुप्सा (कंटाळा) (८) विस्मय (९) शम (शांती) प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात हे स्थायीभाव कमी अधिक प्रमाणात सुप्त अवस्तेत असतात. लेखकाने लिहिलेले वाडःमय वाचत असताना वाचकाच्या किंवा नाटक पाहताना प्रेक्षकाच्या अंतःकरणातील या भावना जागृत होतात, तेव्हा रस निर्माण झाला असे म्हटले जाते. आपल्या अंतःकरणातील स्थायीभाव हे वाचनाने वा कलाकृतीच्या दर्शनाने चाळवले जातात. ज्या वेळी जी भावना चाळविली जाते तेव्हा तो रस निर्माण माला असे समजावे. हे रस नऊ असून त्यांची नावे पुढीलप्रमाणेः (१) शृंगार (२) वीर (३) करुण (४) रौद्र (५) हास्य (६) भयानक (७) बीभत्स (८) अद्भुत (९) शांत संस्कृत साहित्यकारांनी रसाची मीमांसा मोठी मार्मिक केली आहे. वर सांगितलेले स्थायीभाव ज्यांच्या आश्रयाने राहतात व ज्यांच्यामुळे ते प्रदीप्त होतात त्यांना विभाव असे म्हणतात. ललित वाडःमयातील नायक , नायिका व इतर व्यक्ती यांना आलंबन विभाव म्हणतात. एकलेपणा, चांदणे, उद्यान, भ्रूलीला यांमुळे हे स्थायी भाव उद्दीपित होतात म्हणून त्यांना उद्दीपन विभाव म्हणतात. या स्थायी भावामुळे अंगावर रोमांचक उभे राहणे, घाम फुटणे, कंठ दाटून येणे, रडू येणे हे जे परिणाम दिसतात त्यांना अनुभाव म्हणतात. आपल्याला हवी असलेली वस्तू नाही मिळाली म्हणजे वाटणारा खेद, असूया, हेवा, राग या तात्कालिक वृत्ती त्यांना संचारी (किंवा व्यभिचारी) भाव म्हणतात. विभाव, अनुभाव संचारीभाव यांच्या साहाय्याने जेव्हा हे स्थायी भाव उत्कट स्थितीला पोहोचतात तेव्हा त्यांना ‘रस’ असे म्हणतात. या नवरसांचा थोडक्यात परिचय करुन घेऊ. (१) शृंगार – ( शृंग = कामवासना ) . स्त्री – पुरुषांना एकमेंकाबद्दल वाटणा-या प्रेमातून, आकर्षणातून या रसाचा उगम होतो. पुढील चरण पाहाः (१) डोळे हे जुलमी गडे रोखुनि मज पाहु नका. (२) सहज सख्या एकदाच येई सांजवेळी. (३) या कातर वेळी पाहिजेस तू जवळी. यांसारखे चरण ऐकताना जी वैषयिक भावना जागृत होते, तेव्हा जो शृंगारस निर्माण होतो, त्याला उत्तान शृंगार म्हणतात. ‘सहज तुझी हालचाल मंत्रे जणु मोहिते’ यासारख्या चरणातून सोज्ज्वळ पत्नीप्रेमाने निर्माण होणारा तो सात्त्विक शृंगार; प्रेमाच्या विफलतेतून निर्माण होणारा तोविप्रलंभ शृंगार. बहुधा लावणी हा प्रकार शृंगार रस परिपोषक असतो. (२) वीर - उत्साह हा या रसाचा स्थायीभाव. पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनांतून हा रस निर्माण होतो. उदाः (१) गर्जा जयजयकार, क्रांतिचा, गर्जा जयजयकार. (२) उठा राष्ट्र वीर हो, सज्ज व्हा उठा चला. (३) जिंकू किंवा मरु, भारतभूच्या शत्रूसंगे युध्द आमुचे सुरु. यासारखी समरगीते व पोवाडे ह्यांत हा वीरस पाहावयास मिळतो. (३) करुण - शोक किंवा दुःख ,वियोग, संकट यांतून हा रस निर्माण होतो. ह्रदयद्रावक अशा गोष्टींच्या वर्णनांत हा रस आढळतो. उदा.- (१) हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला. (२) आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी. (३) पोर खाटेवर मृत्युच्याच दारा ………. वगैरे कविता. (४) हास्य – विसंगती, असंबध्द भाषण, व्यंगदर्शन, विडंबन, चेष्टा यांच्या वर्णनातून हा रस निर्माण होतो. उदा.- (१) परटा, येशिल कधि परतून ? (२) उपास मज लागला, सखेबाई, उपास मज लागला. यांसारख्या कवितांतून किंवा सुदाम्याचे पोहे, चिमणरावाचे च-हाट, साष्टांग नमस्कार, संपूर्ण बाळकराम, गुदगुल्या यांसारख्या विनोदी लेखनातून व नाटकांतून हा रस आढळतो. (५) रौद्र – अतिशय क्रोध वा चीड या भावनेतून हा रस निर्माण होतो. उदा.- पाड सिंहासने दृष्ट ती पालथी ओढ हत्तीवरुनि मत्त नृप खालती मुकुट रंकासि दे, करटि भूपाप्रती झाड खट्खट् तुझे खड्ग रुद्रा. (६) भयानक – भीती या भावनेतून हा रस निर्माण होतो. युध्द, मृत्यू, सूड, राक्षस, स्मशान इत्यादींच्य वर्णनांतून हा रस आढळतो. गोविंदाग्रजांचे ‘स्मशानातले गाणे’ , श्री. खांबेटे यांच्या भीतिकथा, रहस्यकथांतील खून व सूड यांची वर्णने, युध्दकथा यांतून हा रस आढळतो . (७) बीभत्स – किळस, वीट, तिटकारा वर्णन करणा-या कवितांतून वा वर्णनातून हा रस आढळतो. उदा.- ही बोटे चघळीत काय बसले – हे राम रे – लाळ ही । काळी काय गळ्यातुनी जळमटे आहेत पन्नास ही; शी !शी ! तोंड अती अमंगळ असे आधीच हे शेंबडे, आणी काजळ ओघळे वरुनि हे, त्यातूनि ही हे रडे ! (८) अद्भुत - विस्मय हा या रसाचा स्थायीभाव .परींच्या कथा, अरेबियन नाइट्स अलिबाबा व चाळीस चोर जादूची अंगठी यांसारख्या आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनांतून हा रस आढळतो. पुढील ओळी पाहाः आटपाट नगरात दुधाचे तळे तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे नगरातले लोक सारेच वेडे वेड्यांनी बांधलेत बर्फीचे वाडे आंघोळीला पाणी घेतात दुधाचे डोक्याला तेल लावतात मधाचे फणसपोळीचे कपडे घालतात सारे वेडे उलटे चालतात. (९) शांत – परमेश्वराविषयक भक्ती, सत्पुरुषांची संगती, देवालय वा आश्रम यांच्या परिसरातील वातावरण यांच्या वर्णनातून हा रस आढळतो. उदा – (१) घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. (२) उठि गोपालजी , जाइ धेनूकडे , पाहती सौंगडे वाट तूझी. (३) आता विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावे । तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥ यांसारख्या चरणांतून व भूपाळ्यांतून शांतरसाचा प्रत्यय येतो. वाडःमयातील नऊ रसांची ओळख आपण करुन घेतली . एखाद्या कवितेत एकच रस असतो असे नाही. निरनिराळे रसही आढळतात. वाक्यात रस असला तरी ते वाक्य अंतःकरणाला जाऊन भिडते. त्यालाच ‘काव्य’ म्हणतात. ‘वाक्य रसात्मक काव्यम्’ हे संस्कृत वचन प्रसिध्द आहे. काव्याचे गुण – काव्यात रस असावा लागतो व या रसाला पोषक असे जर त्यात योजलेले शब्द असले तर काव्याची शोभा वाढते.ज्या गुणांमुळे काव्याची शोभा वाढते त्यांतील प्रमुख गुण तीन (१) प्रसाद , (२) माधुर्य, (३) ओज (१) प्रसाद – प्रसाद म्हणजे सोपेपणा. काव्य वाचल्यानंतर त्यातील अर्थ सहज समजला पाहिजे. अवघड, पांडित्यपूर्ण , मोठमोठे समास असलेले शब्द वापरुन केलेली रचना रसाला हानिकारक असते. सोपी , सुबोध व अर्थ चटकन समजणारी रचना म्हणजे प्रासादिक रचना. या गुणाला कवितेत फार मोठे स्थान आहे. तांब्यांची ‘माहेरची आठवण’ , बालकवींची ‘फुलराणी’ , ‘औदुंबर’ , ‘यशवंतांची आई’, ग.दि. माडगूळकरांच्या कविता म्हणजे प्रासादिक काव्यांचे नमुने होत. (२) माधुर्य - काव्यात जसे सोपे शब्द हवेत तसेच कोमल व मूदुवर्णांच्या योजनेने ते कानाला मधुर व सुखद आणि नादामुळे ते गुणगुणावेसे वाटावेत. माधुर्य म्हणजे गोडवा. कोमल, अनुनासिक वर्ण व अनुप्रासात्मक रचना यांमुळे काव्याला माधुर्य प्राप्त होते .उदा – (१) राधाधरमधुमिलिंद जयजय, रमारमण गोविंग कालिंदी तट पुलिंद लांछित सुरनुतपादारविंद. (२) हे मंदमंद पद सुंदर कुंददंती चाले जसा मद – धुरंधर इंद्रदंती (३) ओज - ओज म्हणजे आवेश किंवा जोरदारपणा, कठोर वर्ण,दीर्घ समास , संयुक्त व्यंजने यांचा अधिक वापर करुन कवी रचनेत उत्साह व जोरदारपणा निर्माण करतो. अशा प्रकारची रचना वीर व रौद्र रसांना पोषक ठरते. उदा. – कडकडा फोड नभ, उडव उडु मक्षिका, खडबडवि दिग्गजा तुडव रविमालिका, मांड वादळ, उधळ जिरि जशी मृत्तिका, खवळवी चहुकडे या समुद्रा ! शब्दांच्या शक्ती, रस व काव्यगुण समजले म्हणजे काव्याच्या रसग्रहणाला मदत होते. आता काव्याचे रसग्रहण म्हणजे काय ते पुढील पाठात पाहू.
शब्दाच्या शक्ती रस व काव्यगुण
वाक्प्रचार व म्हणी
वाक् प्रचार पुढील वाक्ये वाचाः (१) घर घेण्याचे निश्चित ठरताच आजच मी रामभाऊंना सुपारी दिली. (२) गेली चार वर्षे तो एस . एस. सी . ची वारी करीत आहे. (३) आज घरात साखर औषधाला देखील नाही. (४) अलीकडे आपली गाठ पडणे हा कपिलाषष्ठीचाच योग. वरील वाक्यांतील काही शब्द जाड ठशांत छापलेले आहेत. त्यांच्या अर्थाकडे जरा सूक्ष्म नजरेने पाहाः त्यांचा शब्दाशः जो अर्थ (- वाच्यार्थ) आहे तो आपण या वाक्यांत घेत नाही. आपल्या बोलण्याच्या प्रचारात या शब्दासमूहांना एक वेगळाच अर्थ प्राप्त झालेला आहे. कसा तो पाहाः पहिल्या वाक्यातील रामभाऊंना मी ‘सुपारी दिली’ याचा अर्थ सुपारी ही वस्तू त्यांना खाण्यासाठी दिली असा आपण येथे करत नाही, तर रामभाऊंशी मी ‘करार केला’ असा करतो. एखादी गोष्ट ठरविताना पुष्कळ घासाघीस होते, चर्चा होते व शेवटी काही निश्चित ठरले हे सुचविण्यासाठी सुपारी देण्याची पध्दत आहे.वाजंत्री, गोंधळी, आचारी यांच्याशी काही ठरुन करार झाला याचे प्रतीक (= खूण, चिन्ह) म्हणून सुपारी देण्याची प्रथा आहे. यावरुन सुपारी देणे = सौदा ठरणे, करार करणे असा अर्थ त्याला प्राप्त झाला. दुस-या वाक्यात ‘वारी करत आहे’ असा शब्दप्रयोग आहे. हा शब्दप्रयोग आपण केव्हा करतो? दरवर्षी किंवा प्रत्येक एकादशीला पंढरीस नेमामे जाऊन येणा-या व्यक्तीस आपण ‘वारकरी’ म्हणातो. वारी करणे = नेमाने जाऊन येणे, फेरी मारणे. पण दरवर्षी परीक्षेस बसून नापास होणा-यास ‘वारकरी’ असे उपहासाने म्हणटे जाते. येथे वारी करणे = सतत नापास होणे असा अर्थ घ्यावयास हवा. तिस-या वाक्यातील ‘साखर औषधालादेखील नाही’ याचा अर्थ औषध घेतल्यानंतर त्याचा कडूपणा घालविण्यासाठी खावयाला साखर नाही असा आपण घेत नाही. औषधासाठी एखादी वस्तू फारच थोडी लागते. तितक्या प्रमाणातदेखील एखादा पदार्थ नसला, तर हा शब्दप्रयोग करतात. एखाद्या गोष्टीचा आत्यंतिक अभाव हा याचा अर्थ. चौथ्या वाक्यात ‘कपिलाषष्ठी’ चा योग असा शब्दप्रयोग आहे. ज्योतिषशास्त्राच्या मते कपिलाषष्ठी हा विलक्षण योगायोगाचा दिवस मानला जातो. भाद्रपद महिना, कृष्ण्पक्षातील षष्ठी ही तिथी, मंगळवार रोहिणी दिवसनक्षत्र व महानक्षत्र हस्त इतक्या गोष्टी जमून आल्या म्हणजे तिला ‘कपिलाषष्ठी’ असे म्हणतात. असा योग क्वचित म्हणजे साठ वर्षांनी येतो असे म्हणतात यावरुन ‘फारच दुर्मिळ, पुष्कळ काळाने येणारी संधी किंवा अपूर्व घटना ;असा याला अर्थ प्राप्त झाला आहे. यावरुन असे आढळून येईल, की भाषेत असे काही शब्द वा शब्दसमूह येतात की त्यांचा शब्दशः अर्थ घेऊन चालत नाही. रुढीने किंवा परंपरेने त्यांना मूळ अर्थापेक्षा वेगळाच अर्थ प्राप्त झालेला असतो व तोच भाषेत रुढ होऊन बसतो.अशा रीतीने, शब्दशः होणा-या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रुढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला ‘वाक् प्रचार’ असे म्हणतात. यालाच कोणी ‘वाक् संप्रदाय’ असे म्हणतात. नमुन्यादाखल काही वाक् प्रचार त्यांना प्राप्त झालेल्या अर्थासह पुढे दिले आहेयः अकलेचा खंदक - मूर्ख मनुष्य आकाशाला गवसणी घालणे – अंग धरणे – लठ्ठ होणे शक्तीबाहेरची गोष्ट करुन पाहणे अंग काढून घेणे – संबंध तोडणे/जबाबदारी आकाशपाताळ एक करणे – नाहक टाळणे आरडाओरडा करणे अंगाची लाही होणे – रागाने बेफाम होणे आकाशाची कु-हाड – सर्व बाजूंनी संकटे अर्धचंद्र – गचांडी/हकलपट्टी करणे येणे आभाळ फाटणे – सर्व बाजूंनी संकटे येणे घागरगडाचा सुभेदार – पाणक्या इतिश्री करणे – शेवट करणे चतुर्भुज होणे – कैद होणे, लग्न होणे. इतिश्री – शेवट चहा करणे – स्तुती करणे उजेड पाडणे – मोठे काम करणे चुरमुरे खात बसणे – खजील होणे / उखळ पांढरे होणे – पुष्कळ द्रव्य मिळणे पदरी न पडणे उंटावरचा शहाणा – मूर्खपणाचा सल्ला चेहरा काळवंडणे – मन खिन्न ह्होणे देणारा चोरावर मोर बसणे – मात करणे/ वरचढ उंबराचे फूल – क्वचित भेटणारी व्यक्ती होणे. एरंडाचे गु-हाळ – कंटाळवाणे भाषण करणे छत्तीसचा आकडा – वैर, विरोध ओनामा - प्रारंभ जमदग्नी – अतिशय रागीट मनुष्य कणिक तिंबणे – मार देणे जोडे फाटणे – खेटे घालणे / नाहक ये – जा कळीचा नारद – भांडणे लावणारा करणे काखा वर करणे – जवळ काही नसणे जीव टांगणीला लागणे – चिंताग्रस्त काणाडोळा करणे – लक्ष न देणे होणे कागदी घोडे नाचविणे – फक्त लेखनात जिवाचे रान करणे – खूप कष्ट करणे शूरपणा दाखविणे जखमेवर मिठ चोळणे – उणिवेवर प्रहार काकदृष्टीने पाहणे – बारकाईने न्याहाळाणे करणे कानावर पडणे – सहजपणे ऐकू येणे जिवाची उलघाल घेणे – खूप भीती कानउघडनी करणे – चुकीची कडक वाटणे शब्दांत जाणीव देणे जिवापाड जपणे – मायेने सांभाळणे कोंडामारा होणे – निरुपाय होणे झाकले माणिक – साधा पण गुणी मनुष्य खडे फोडणे – दोष देणे तळहाताचा फोड – अतिशय काळजीने खसखस पिकणे – मोठ्याने हसणे जपणूक खूणजाठ बांधणे – निश्चय करणे ताटाखालचे मांजर होणे – अंकित होऊन गळ्यातला ताईत – अतिशय प्रिय वस्तू राहणे गाशा गुंडाळणे – निघून जाणे तारे तोडणे – वेड्यासारखे बोलणे ग्वाही देणे – साक्ष देणे तोंड टाकणे – अद्वातव्दा बोलणे /बरळणे गुण उधळणे /पाघळणे – दुर्गुण दाखविणे तोंडात बोट घालणे – नवल करणे घर डोक्यावर घेणे – घरात आरडाओरडा तोंडावर येणे – फार जवळ येणे. करणे त्राटिका – कजाग बायको त्रेधा उडणे – फजिती होणे पांढ-यावर काळे करणे – लिहिणे तिलांजली देणे – त्याग करणे पालथ्या घागरीवर पाणी – निष्फळ श्रम थंडा फराळ करणे – उपाशी राहणे पोटास चिमटा घेणे – अर्धपोटी रहणे थुंकी झेलणे – खुशामतीची सीमा गाठणे पोबारा करणे– पळून जाणे दगडावरची रेघ – खोटे न ठरणारे शब्द फडशा पाडणे – संपविणे दात ओठ खाणे – चरफडणे ब्रह्मांड आठवणे – भीती वाटणे दाद देणे – मन व्यक्त करणे/प्रशंसा बोल लावणे – दोष देणे जीव मुठीत धरणे – मन घट्ट करणे बांगडी फुटणे – वैधव्य येणे करणे बिन भाड्याचे घर – तुरुंग दीड शहाणा – मूर्ख बोटे मोडणे – व्यर्थ चरफडणे धूळ चारणे – पूर्ण पराभव करणे भागूबाई – भित्रा माणूस धूळभेट – उभ्याउभ्या झालेली भेट मनात मांडे खाणे – मनोराज्य करणे धाबे दणाणणे – खूप भीती वाटणे माशा मारणे – निरुद्योगी असणे न भूतो न भविष्यति होणे – पूर्वी मुभा असणे – मोकळीक असणे न झालेली व पुढे न होणारी गोष्ट घडणे मुलाहिजा बाळगणे – पर्वा करणे नाकी नऊ येणे – बेजार होणे मेतकूट जमणे – दृढ मैत्री होणे टक लावून पाहणे – बारीक नजरेने पाहणे रसातळाला जाणे – नाश होणे ठणठणपाळ – द्रव्य व विद्या दोन्ही नसलेला राम राम ठोकणे – निरोप देणे डोके खाजविणे – आठवण्याचा प्रयत्न राम नसणे – अर्थ नसणे करणे राम म्हणणे – मरणे डोळे उघडणे – पश्चात्ताप होणे लंकेची पार्वती – अंगावर दागिने नसलेली पड खाणे – माघार घेणे स्त्री पदरात घालणे – स्वाधीन करणे वर्ज्य करणे – टाळणे पाणी पडणे – उत्साहभंग होणे वाकडे पाऊन पडणे – दुर्वर्तन करणे पाणी पाजणे – पराभव करणे वाट लावणे – नाश करणे पाया घालणे – प्रारंभ करणे वाखाणणी करणे – स्तुती करणे पारा चढणे – खूप रागावणे वा-यावर सोडणे – दुर्लक्ष करणे पाणउतारा करणे – अपमान करणे विडा उचलणे – प्रतिज्ञा करणे पायमल्ली करणे – धुडकावणे षट्कर्णी होणे – गुप्त गोष्ट तिस-यास सांगणे पांघरुण घालणे – दोष झाकणे शहानिशा करणे – खात्री करणे शेणसडा होणे – परिस्थिती वाईट होणे/ हात ओला करणे – पैसा किंवा भोजन वाया जाणे मिळणे सद्र्गदित होणे – गहिवरणे हायसे वाटणे – सुटकेचे समाधान होणे सळो की पळो करणे – त्रास देणे हातपाय गाळणे – धीर सोडणे सव्यापसव्य करणे – यातायात करणे हात टेकणे – निरुपाय होणे सारवासारव करणे – नीटनेटके करणे/ हातखंडा असणे – कुशलता असणे संपादणे हाडाची काडे करणे – खूप श्रमणे सूतोवाच करणे – प्रारंभ करणे हातचा मळ – सहज घडणारी गोष्ट सूंबाल्या करणे – पळून जाणे हात धरणे – वरचढ ठरणे हरताळ फासणे – नाश पावणे/विफल हातातोंडाशी गाठ पडणे – जेमतेम खाण्यास करणे मिळणे हतबल होणे – असमर्थ ठरणे हातावर तुरी देणे – फसवून जाणे हळद लावणे – विवाह होणे हंबरडा फोडणे – ओक्सीबोक्क्षी रडणे/ हस्तक्षेप करणे – ढवळाढवळ करणे अनावर शोक समानार्थी शब्द अनल – विस्तव, पावक, अग्नी, वन्ही खल – दृष्ट, नीच, दुर्जन अमृत – सुधा, पीयूष घर – सदन, भवन, गृह, आलय, निकेतन अरण्य – रान , कानन, वन, विपिन, जंगल चंद्र – इंदू, सुधाकर, हिमांशू, रजनीनाथ, अश्व – घोडा, हय, तुरुंग, वारु, वाजी शशी अही – साप, सर्प, भुजंग चांदणे – कौमुदी, ज्योत्स्ना, चंद्रिका आई – माता, जननी, माय, माउली जमीन – भू, भुई, भूमी आकाश – गगन, अंबर, नभ, ख, आभाळ झाड – तरु, वृक्ष, पादक, द्रुम आनंद – हर्ष, मोद, संतोष तलाव – तडाग, सरोवर, कासार आश्चर्य – नवल, अचंबा, विस्मय तोंड – आनन , मुख, वदन कमळ – राजीव, अंबुज, पंकज, सरोज, दिवस – वार, वासर, अहन पद्म दूध – पाय, क्षीर, दुग्ध कावळा – काक, वायस, एकाक्ष देऊळ – मंदिर, देवालय, राऊळ काळजी – चिंता, विवंचना, फिकीर देव – सूर, ईश्वर, अमर, निर्मिक काळोख – अंधार, तिमिर, तम दैत्य – दानव, राक्षस, असुर धनुष्य – धनू, चाप, कोदंड, कार्मुक डोके – शिर, मस्तक, माथा नदी – सरीता, तटिनी, तरंगिणी डोळा – नयन, लोचन, चक्षू, नेत्र नमस्कार – वंदन, अभिवादन, नमन, डौल- ऐट, दिमाख, रुबाब प्रणिपात ढग – जलद, पयोधर, घन मेघ, अभ्र नवरा – पती, कांत, भर्ता, धव, भ्रतार युध्द – रण, समर, संगर, संग्राम, लढाई पत्नी – भार्या, बायको, कांता, दारा, रस्ता – वाट, पथ, पंथ, मार्ग जाया राजा – भूप, नृप, नरेश, भूपाल, पृथ्वीपती पर्वत – नग, अभी, शैल, गिरी रात्र – रजनी, यामिनी, निशा पक्षी – खग, विहग, द्विज, अंडज लक्ष्मी – श्री, रमा, कमला, इंदिरा, वैष्णवी पाणी – जल, अंबू, पय, उदक, जीवन, वस्त्र – पट, अंबर, वसन, कपडा सलिल, वारी वानर – कपी, मर्कट, शाखामृग पान – पर्ण, पत्र, पल्लव वारा – अनिल, पवन, वायू, समीरण पाय – पद, पाद, चरण वीज – चपला, तडित, बिजली, सौदामिनी पृथ्वी – धरणी, अवनी, भूमी, धरती, शत्रू – अरी, रिपू, वैरी, दुष्मन वसुंधरा, क्षमा समुद्र – सागर, सिंधू, अर्णव, रत्नाकर पोपट – राघू, रावा, शुक सिंह – केसरी, पंचानन, मृगेंद्र, वनराज फूल – पुष्प, सुमन, कुमुद, सुम स्त्री – ललना, महिला, वनिता, नारी, अबला बाग – बगीचा , उद्यान, उपवन सूर्य – मित्र, रवी, आदित्य, सविता,भानू, बाप – पिता, वडील, जनक भास्कर भाऊ – भ्राता, बंधू, सहोदर्र सोने – कनक, सुवर्ण, हेम, कांचन भुंगा – भ्रमर, अली, मिलिंद, मधुप हत्ती – गज, कुंजर, सारंग, नाग मित्र – दोस्त, सखा, सोबती हात – कर, हस्त, पाणि, भुज, बाहू मुलगा – पुत्र, सुत, नंदन, तनुज क्षय – क्षीणपणा, नाश, -हास मुलगी – सुता, तनया, आत्मजा, नंदिनी ज्ञानी – शहाणा, डोळस, जाणकार सुज्ञ विरुध्द अर्थाचे शब्द अमृत – विष अनाथ – सनाथ अनुज – अग्रज अपेक्षित – अनपेक्षित अतिवृष्टी – अनावृष्टी अब्रू– बेअब्रू अधोगती - प्रगती अमावस्या – पौर्णिमा अवजड – हलके किमान – कमाल अवघड – सोपे कृतज्ञ – कृतघ्न आघाडी – पिछाडी कृत्रिम – नैसर्गिक आदर – अनादर कृपा – अवकृपा आदी – अंत कृपण – उदार आगंतुक – आमंत्रित कृश - स्थूल आवक – आवक खंडन – मंडन आशा – निराशा गुण – दोष आस्तिक – नास्तिक ग्राह्य – त्याज्य इमानी – बेइमान घाऊक – किरकोळ इलाज – नाइलाज चढाई - माघार इष्ट – अनिष्ट चल – अचल इहलोक – परलोक जमा – खर्च उंच – ठेंगू/सखल जहाल – मवाळ उत्तीर्ण – अनुत्तीर्ण तारक – मारक उन्नती – अवनती तीक्ष्ण – बोथट उपकार – अपकार तेजी – मंदी उष्ण – शीतल /थंड थोरला – धाकटा उचित –अनुचित दीर्घ - -हस्व उच्च – नीच दृष्ट – सुष्ट उत्कर्ष – अपकर्ष देशभक्त – देशद्रोही उघड – गुप्त निःशस्त्र – सशस्त्र उदय – अस्त प्रश्न - उत्तर उद्योगी – आळशी प्रसरण – आकुंचन एकमत – दूमत प्राचीन – आर्वाचीन ऐच्छिक – अपरिहार्य पुढारी – अनुयायी कठोर – मृदू पुण्य – पाप कडू – गोड पुरोगामी – प्रतिगामी कर्णमधुर – कर्णकटू भरती –ओहोटी काळा – गोरा माजी – आजी, विद्यमान माहेर – सासर सुपीक – नापीक राजमार्ग – आडमार्ग सुरस – नीरस लघू – गुरु सुलक्षणी – कुलक्षणी वंद्य – निंद्य सुसंगत – विसंगत विधायक – विध्वंसक सुर – असुर विसंवाद – सुसंवाद सुज्ञ – अज्ञ वैयक्तिक – सामूहिक सूर्योदय – सूर्यास्त शाप – वर, आशीर्वाद सोय – गैरसोय शुध्दपक्ष – वद्यपक्ष स्तुती – निंदा सगुण – निर्गुण स्वतंत्र – परतंत्र सजातीय – विजातीय स्वस्त – ममाग समता – विषमता स्वदेशी – विदेशी साम्य – भेद स्वर्ग – नरक सावध – बेसावध स्वस्ताई – महागाई स्वकीय – परकीय स्वस्थ – अस्वस्थ स्वार्थ – परमार्थ हर्ष – खेद साधार – निराधार हानी – लाभ साक्षर – निरक्षर हार – जीत सुकाळ – दुष्काळ होकार – नकार सुचिन्ह – दुश्चिन्ह ज्ञात – अज्ञात सुंदर – कुरुप ज्ञानी – अज्ञानी जोडशब्द शब्दाचा अर्थ अधिक स्पष्ट व्हावा म्हणून काही शब्दांनी पुनरावृत्ती केली जाते. त्यामुळे बोलणे लिहिणे डौलदार वाटते. एकाच अर्थाने दोन शब्द जोडून हे तयार होणारे जोडशब्द मराठी भाषेत आगळीच गंमत आणतात.नमुना म्हणून पुढील जोडशब्द पाहाः अक्कलहुशारी अचकटविचकट अदलाबदल अवतीभवती अक्राळविक्राळ आरडाओरडा इडापिडा उपासतापास उधारउसनवार ऐषाराम ओबडधोबड कडीकोयंडा कज्जेखटले करारमदार कायदेकानून कामधंदा केरकचरा कोडकौतुक खबरबात खाचखळगे खेळखंडोबा गाठभेट गोडीगुलाबी गोरागोमटा गोळाबेरीज गौडबंगाल चारचौघे चीजवस्तू चेष्टामस्करी जमीनजुमला जाडाभरडा जीर्णशीर्ण जीवजंतू जुनापुराणा झाडेझुडपे टंगळमंगळ ठाकठीक डामडौल तोळामासा थांगपत्ता दयामाया दंगामस्ती दागदागिने दाणागोटा दाणापाणी दिवाबत्ती धनदौलत धागादोरा ध्यानीमनी नवाकोरा नोकरचाकर न्यायनिवाडा पालापाचोळा पाऊसपाणी पूजाअर्चा पैसाअडका पोरेबाळे बागबगीचा भांडणतंटा भांडीकुंडी मनोमनी मानमरातब मेवानिठाई मोडतोड मोलमजुरी राजेमहाराजे रीतिरिवाज लग्नकार्य लुळापांगळा वजनमापे व्रतवैकल्य व्यापारउदीस शेतीभाती शेजारीपाजारी सगेसोयरे सडासारवण संगतसोबत सल्लामसलत साजशृंगार साफसफाई साधासुधा स्थिरस्थावर सोक्षमोक्ष सोनेनाणे हवापाणी हीनदीन होमहवन समूहदर्शक शब्द (शब्दसमूहाबद्दल एक शब्द वापरणे) आधी जन्मलेला – अग्रज मागून जन्मलेला – अनुज पूर्वी कधी न पाहिले/ऐकले असे – अपूर्व ज्यास कोणीही शत्रू नाही असा - अजातशत्रू तिथी वार न ठरवता आलेला – अतिथी /आगंतुक थोडक्यात समाधान मानणारा – अल्पसंतुष्ट अनेक गोष्टींत एकाच वेळी लक्ष देणारा – अष्टावधानी पायापासून डोक्यापर्यंत – आपादमस्तक बालांपासून वृध्दांपर्यंत – आबालवृध्द देव आहेस मानणारा – आस्तिक अगदी पूर्वीपासून राहणारे – आदिवासी उदयाला येत असलेला – उदयोन्मुख श्रम न करता खाणारा – ऐतोबा / ऐतखाऊ लहानग्यांना झोपविण्यासाठीचे गाणे – अंगाईगीत राष्ट्राराष्ट्रांतील – आंतरराष्ट्रीय धान्यादि साठविण्याची बंदिस्त जागा – गोदाम/ कोठार/ वखार केलेले उपकार जाणणारा – कृतज्ञ केलेले उपकार न जाणणारा – कृतघ्न कर्तव्याकडे पाठ फिरविणारा – कर्तव्यपराडःमुख इच्छिलेली वस्तू देणारे झाड – कल्पवृक्ष इच्छिलेली वस्तू देणारी गाय – कामधेनू कवितेची रचना करणारी – कवयित्री आकाशात गमन करणारा – खग मूर्ती जेथे असते तो देवालयातील भाग – गाभारा सैन्याची चक्राकार केलेली रचना – चक्रव्यूह जाणून घेण्याची इच्छा असणारा – जिज्ञासू चार रस्ते एकत्र येतात ती जागा – चव्हाटा/ चौक जिवाला जीव देणारा – जिवलग नाणी पाडण्याची जागा – टाकसाळ शेतक-यांना मिळणारे सरकारी कर्ज – तगाई किल्ल्याच्या भोवतीची भिंत – तट हालअपेष्टा सहन करण्याचा गुण – तितिक्षा तीन रस्ते एकवटतात ती जागा – तिठा खूप दानधर्म करणारा – दानशूर दोनदा जन्मलेला – द्विज दररोज प्रसिध्द होणारे – दैनिक अस्वलाचा खेळ करणारा – दरवेशी तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट – दंतकथा तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश – द्वीपकल्प दोन नद्यामधील जागा – दुआब / दोआब दैवावर भरवसा ठेवून राहणारा – दैववादी उंचावरुन पडणारा पाणलोट – धबधबा एका धर्मातून दुस-या धर्मात जाणे – धर्मान्तर देव नाहीसे मानणारा – नास्तिक कुणाचाही आधार नसलेला – निराधार घरादारास व देशास पारखा झालेला – निर्वासित पायाच्या नखापासून शंडीपर्यंत – नखशिखान्त नाटकात भूमिका करणारा पुरुष – नट एकमेकांवर अवलंबून असणारे – परस्परावलंबी पुरामुळे नुकसान झालेले लोक - पूरग्रस्त पाहण्यासाठी जमलेले लोक – प्रेक्षक पंधरवड्याने प्रसिध्द होणारे – पाक्षिक मोफत पाणी मिळण्याची सोय – पाणपोई गावातील एकत्र पाणी भरण्याची जागा – पाणवठा तिथी, वार, नक्षत्र, योग , करण यांची पुस्तिका - पंचांग शत्रूला सामील झालेला – घरभेदी डोंगर पोखरुन आरपार केलेला रस्ता – बोगदा निरपेक्ष कामाबद्दल दिलेले सन्मानाचे धन – मानधन मोजके असे बोळणारा – मितभाषी लग्न झालेल्या मुलींच्या आईबापाचे घर – मोहर दुस-याच्या मनातले ओळखणारा – मनकवडा अचूक गुणकारी असणारे – रामबाण लिहिण्याची हातोटी – लेखनशैली भाषण करण्याची जागा – व्यासपीठ भाषण करण्याची कला – वक्तृत्व दुपारच्या जेवणानंतरची अल्प झोप – वामकुक्षी पती मरण पावला आहे अशी स्त्री – विधवा ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष – विधुर दगडावर केलेले कोरीव काम – शिल्प दगडावर कोरलेला लेख – शिलालेख शंकराची उपासना करणारा – शैव दोन नद्या एकत्र मिळण्याची जागा – संगम स्वतःशी केलेले भाषण - स्वगत स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा – अप्पलपोटा समाजात समता नांदावी असे म्हणणारा – साम्यवादी नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत – नांदी दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास – सुस्करा देशासाठी प्राणार्पण केलेला – हुतात्मा शत्रूकडील बातमी काढून आणणारा – हेरा/ खब-या ह्रदयाला भिडणारे – ह्रदयस्पर्शी जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा – क्षितिज वाक् प्रचाराचे काही नमुने वर दिले आहेत.वाच्यार्थापेक्षा रुढीने त्यांना वेगळाच अर्थ कसा प्राप्त झाला आहे हे जाणून घेणे मनोरंजक ठरते. वाक्संप्रदाय कोशात यामागील संदर्भ किंवा गोष्टी दिलेल्या असतात. विद्यार्थ्यांनी या वाक्प्रचारामागील भूमिका स्वतःकोशातून शोधून समजावून घ्यावी. वाक्प्रचार कशास म्हणतात ते आपण पाहिले. वाक्प्रचार हा एक शब्दसमूह असतो. ते संपूर्ण वाक्य नसते. वाक्याचा तो एक भाग असतो. आपल्या बोलण्यात व लिहिण्यात वाक्प्रचाराखेरीज केव्हाकेव्हा छोटी , चटकदार, व बोधप्रद अशी वाक्ये वारंवार येतात. वाक्प्रचारापेक्षा त्यांचे स्वरुप वेगळे असते. पाहाः म्हणी पुढील वाक्ये पाहा – (१) उथळ पाण्याला खळखळाट फार. (२) गुळाचा गणपती, गुळाचा नैवेद्य. (३) घर पाहावे बांधून व लग्न पाहावे करुन. (४) नावडतीचे मीठ अळणी वरील वाक्ये छोटी, लयबध्द व आटोपशीर अशी आहेत. त्यांना वरवरचा स्वतःचा अर्थ असला तरी त्यांत कितीतरी खोल अर्थ दडलेला आहे असे आढळून येते, कसे ते पाहाः (१) उथळ पाण्याला खळखळाट फार – नदी किंवा ओढा यात पाणी अगदीच कमी असेल की त्यातील दगडगोट्यांवरुन पाणी वाहताना पाण्याचा खळखळ असा आवाज होतो. याउलट, पाणी विपुल असले की हा खळखळाट थांबतो व तेच पाणी संथपणाने वाहताना आढळते. हीच गोष्ट माणसांच्या बाबतीतही खरी आहे. ज्या माणसाजवळ विद्वत्ता बेताचीच असते तो खूप बढाया मारताना आढळतो; पण ज्याला त्याच्या विषयाबद्दलचे सखोल ज्ञान असते तो शांत असतो. उगाच बडबड करीत नाही. हा नेहमी व्यवहारात येणारा अनुभव पाण्याच्या उदाहरणावरुन या छोट्या वाक्यात कसा चटकदारपणे मांडला आहे पाहाः (२) घर पाहावे बांधून व लग्न पाहावे करुन – घर बांधायला काढण्यापूर्वी आपण खर्चाचा काही अंदाज करतो व त्याप्रमाणे कामाला सुरुवात होते. पुढे अनपेक्षित अशा काही अडचणी निर्माण होतात. अनेक गोष्टी मागाहून सुचत जातात व त्यामुळे खर्च वाढतो. जी गोष्ट घराची तीच लग्नाची. त्यामुळे अंदाजापेक्षा कितीतरी खर्च वाढतो. घर बांधल्याशिवाय किंवा लग्न केल्याशिवाय त्याच्या खर्चाची कल्पना येत नाही. अनुभवाने मनुष्य शहाणा होतो हा विचार येथे मार्मिकपणे मांडला आहे. (३) गुळाचा गणपती, गुळाचा नैवेद्य - गणपती गुळाचा बनविला, त्यातच सारा गूळ संपून गेला. नैवेद्याला गूळ काही शिल्लक राहिला नाही. अशा वेळी त्या तयार केलेल्या गणपतीच्या अंगातलाच थोडा गूळ काढून घेऊन त्याचा नैवेद्य दाखविला व तो गूळ जेथल्या तेथे चिटकवून टाकला. एखाद्याची वस्तू घेऊन त्याचा अर्पण करण्याचा प्रसंग किती गमतीदार पध्दतीने येथे सांगितला आहे पाहा. गंगेचे पाणी घेऊन गंगेलाच अर्घ्य देण्यातला हा प्रकार. (४) नावडतीचे मीठ अळणी – एखादी व्यक्ती आपल्याला आवडेनाशी झाली की तिची कोणतीच गोष्ट, किती चांगली केली असली तरी, ती पसंत पडत नाही. नावडत्या व्यक्तीने वाढलेले प्रत्यक्ष मीठदेखील अळणी वाटू लागते. मीठ हे कोणीही वाढले तरी ते खारटच लागायला हवे.नावडत्या व्यक्तीबद्दल वाटणारा तिटकारा केवळ तीन शब्दांत कसा चटकदारपणे सांगितला आहे पाहा. अशा रीतीने मनुष्याला येणारा अनुभव एखाद्या छोट्या वाक्यात मांडून दाखविलेला असतो. अशा वाक्ये लोकांच्या सतत वापरात असतात. लोकांच्या सतत म्हणण्यात येणारी म्हणून त्यांना ‘म्हण’ असे म्हणतात. सर्वांच्या बोलण्यात सतत येणारे चिमुकले, चटकदार, बोधप्रद, सर्वमान्य वचन म्हणाजे म्हण. अनेकांना येणारा अनुभव एकजण आपल्या शहाणपणाने छोट्या सिध्दान्तस्वरुप सूत्रमय वाक्यात मांडून दाखवितो. सर्वांकडून त्याला मान्यता मिळते व लोकांच्या सतत वापरात त्या राहतात. म्हणून म्हणींना ‘तोंडचे वाड्ःमय’ किंवा अनुभवाच्या खाणी असेही म्हणतात. नमुन्यादाखल काही निवडक म्हणी त्यांतून व्यक्त होणा-या विचारासह खाली दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचा अवश्य अभ्यास करावा. अति तिथे माती – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. अति शहाणा त्याचा बैल रिकामा – वाजवीपेक्षा जास्त शहाणपण नुकसानकारक ठरते. अंथरुण पाहून पाय पसरावे – आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा. इकडे आड तिकडे विहीर – दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग – अतिशय उतावळेपणाने होणारे मूर्खपणाचे वर्तन. उथळ पाण्याला खळखळाट फार – ज्याच्या अंगी गुण थोडा तो फार बढाई मारतो. एका हाताने टाळी वाजत नाही – भांडणाचा दोष एका पक्षाकडेच असत नाही. ऐकावे जनाचे, करावे मनाचे – सर्वांचा विचार घ्यावा व आपणांस योग्य वाटेल ते करावे. कर नाही त्याला डर नाही – ज्याने वाईट कृत्य केले नाही त्याला भीती बाळगण्याचे कारण नाही. करावे तसे भरावे – जसे बरेवाईट कृत्य करावे तसे त्याचे बरेवाईट परिणाम भोगायला तयार व्हावे. कावळ्याच्या शापाने गाई मरत नसतात – क्षुद्र माणसाच्या निंदेने थोर माणसाचे काही नुकसान होत नाही. कोल्हा काकडीला राजी – क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात. कोळसा उगळावा तितका काळाच – वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असते. खाई त्याला खळखवे – वाईट कृत्य करणा-याच्या मनात डाचन असते. खाण तशी माती – आई- बापाप्रमाणेच मुले गर्जेल तो पडेल काय – बडबड करणा-याच्या हातून काही कार्य होत नाही. गर्वाचे घर खाली – गर्विष्ठ माणसाला शेवटी अपमानित होण्याची पाळी येते. घरोघर मातीच्या चुली – सर्वत्र परिस्थिती एकसारखी असते. चढेल तो पडेल – उत्कर्षासाठी धडपडणा-याला अपयश आले तर त्यात कमीपणा नाही. चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे – प्रत्येकाला अधिकार गाजविण्याची आयुष्यात संधी मिळतेच. चोराच्या मनात चांदणे – वाईट कृत्य करणा-याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटते. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी – आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे. उपकार घेतले की लचारी. झाकली मूठ सव्वा लाखाची – आपले गुणावगुण झाकून ठेवावे, तोंडाने त्यांचा उच्चार करु नये. टाकीचे घाव सोसल्यावाचून देवपण येत नाही – अपरंपार कष्ट केल्यावाचून वैभव प्राप्त होत नाही. तळे राखीव तो पाणी चाखील – आपल्याकडे सोपविलेल्या कामाचा प्रत्येक मनुष्य थोडा तरी फायदा करुन घेतोच . थेंबेथेंबे तळे साचे – थोडे थोडे जमवीत राहिले म्हण्जे कलांतराने मोठा संचय होतो. दाम करी काम – पैशाने सर्व कामे साध्य होतात. दिव्याखाली अंधार – मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच. दुरुन डोंगर साजरे – कोणतीही गोष्ट लांबूनच चांगली दिसते, जवळून तिचे खरे स्वरुप कळून येते. नाचता येईना अंगण वाकडे – आपल्यातील उणेपणा झाकण्यासाठी दुस-या वस्तूला नावे ठेवणे. नावडतीचे मीठ अळणी – नावडत्या माणसाने काहीही केले करी ते वाईटच लागते. पळसाला पाने तीनच – कोठेही गेले तरी मनुष्यस्वभाव सारखाच. पाच मुखी परमेश्वर – पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे. पुढच्यास ठेव मागचा शहाणा – दुस-याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो. पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा – द्यावयाचे थोडे आणि त्याबद्दल काम मात्र चोपून घ्यावयाचे . बळी तो कान पिळी – ज्याच्या अंगात सामर्थ तो इतरांवर अंमल गाजवतो बुडत्याचा पाय खोलात – अवनती होऊ लागली म्हणजे अनेल बाजूंनी होऊ लागते. भित्या पाठी ब्रह्मराक्षस – भित्र्या माणसावरच संकटे कोसळतात. मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची?- धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात – मुलगा मोठेपणी कसा निघेल याचा अंदाज लहानपणाच्या कृत्यावरुन करता येतो. वासरात लंगडी गाय शहाणी – अडाणी लोकांत अर्धवट शहाण्यालाही मोठेपण लाभते. शहाण्याला मार शब्दाचा – शहाण्याला शब्दाने सांगितले, की तो उमजतो पण मूर्खाला छडीशिवाय भागत नाही. शितावरुन भाताची परिक्षा – एखाद्या अंशावरुन सगळ्या पदार्थाची परीक्षा करता येते. साखरेचे खाणार त्याला देव देणार – भाग्यवान माणसाला देवही अनुकूल होतो.त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतात. हजीर तो वजीर – जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो. या वाक्प्रचारांना व म्हणींना हा वेगळा अर्थ कसा प्राप्त झाला हे जाणून घेणे मनोरंजक ठरते. वाक्संप्रदायकोशात यांचे काही उगम दिलेले असतात. विद्यार्थ्यांनी या वाक्प्रचारांमागील भूमिका स्वतः कोशातून शोधून समजावून घ्यावी. वाक्प्रचार किंवा म्हणी यांचा अर्थांचा मागोवा घेत त्यांना परंपरेने तसा अर्थ कसा प्राप्त झाला हे जाणून घेण्यातही केवढा आनंद साठलेला असतो ! वाक्प्रचार व म्हणी यांमुळे भाषा संपन्न होते व त्यांचा अभ्यास केल्यामुळे भाषेतील सौंदर्य समजण्याला मदत होते. कोणतीही कल्पना साध्या, सरळ पधतीने न मांडता ती वाक्संप्रदाय किंवा म्हण या स्वरुपात मांडल्यामुळे भाषा किती सुंदर व प्रभावी होते हे लक्षपूर्वक पाहा व आपल्या लेखनात त्यांचा वापर करीत जा.
वाक्प्रचार व म्हणी
विरामचिन्हे
विरामचिन्हांचे महत्त्व – आपण आपले विचार, भावना आपण लिहून व्यक्त करतो. तसेच, आपण अन्य व्यक्तींनी व्यक्त केलेल्या भावना, विचार वाचतो. हे वाचन कधीतरी मनातल्या मनात असते, तर आपण हे वाचन कधी कधी प्रकटपणानेही करतो. कथा, कादंबरी, नाटक उत्यादी साहित्यप्रकारांत अनेकदा संवाद, संभाषणे यांचा समावेश असतो. या व अशा सर्व ठिकाणी आपल्याला विरामचिन्हांचा खूप उपयोग होतो. आपल्या लेखनात वाक्यरचनेचे जसे महत्त्व आहे, तसेच विरामचिन्हांचे महत्त्व आहे. आपल्या प्रकट वाचनात विरामचिन्हांचे महत्त्व लक्षाअत घेऊन वाचन करणे, हे एक महत्त्वपूर्ण कौशल्य आहे. वाचत असताना आपल्याला अर्थ लक्षात घेऊन आपण थांबतो. या थांबण्याला ‘विराम’ घेणे असे म्हणतात. हा विराम आपण कधी ‘अगदी कमी’ वेळ घेतो, तर कधी ‘थोडा वेळ’ तर कधी ‘अधिक वेळ’ घेतो, हे सुचविणारी चिन्हे लिहिताना आपण करतो. केव्हा तरी प्रश्न विचारणे, आश्चर्य, आनंद व्यक्त करणे यासाठी आपण विरामचिन्हांचा उपयोग करतो. त्या त्या वेळी भिन्न भिन्न चिन्हे आपण वापरतो. अशा विरामचिन्हांचे महत्त्व आपल्या प्रत्यक्ष लेखनाचे वेळी व वाचनाचे वेळी लक्षात घेणे महत्त्वाचे असते. पुढील उतारा वाचाः आवडले का तुला हे पुस्तक हो जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे जयंत म्हणाला वडील म्हणाले रामयण कुणी लिहिले आहे का तुला ठाऊक रामायणाचा लेखक हा एक अडाणी कोळी होता पुढे तो मोठा ॠषी झाला कोळी होता जयंताने मध्येच विचारले हो वडील पुढे सांगू लागले फार वर्षांपूर्वीची गोष्ट वाचलात हा उतारा? यात जयंत व त्याचे वडील यांचा संवाद दिला आहे. हा उतारा वाचताना वडिलांचे भाषण कोणते? जयंताचे कोणते? ते कोठून सुरु होते? ते कोठे संपते ?... हे काहीच समजत नाही. मनुष्य बोलत असला म्हणजे त्याच्या आवाजाच्या चढउतारावरुन त्याला काय म्हणायचे ते समजते. पण हेच लिहून दाखविले, की कोणता उद् गार कोणाचा? त्याचे वाक्य कोठे संपले? दुस-याचे कोठून सुरु झाले? हे समजत नाही. शिवाय बोलणारा प्रश्न विचारतो का उद् गार काढतो? का साधे विधान करतो? हेही समजत नाही. बोलणा-याच्या मनातला आशय केवळ लिहून दाखविल्याने कळत नाही. हा आशय पूर्णपणे कळावा व कोठे किती थांबावे हे समजण्यासाठी काही खुणा किंवा चिन्हे ठरविण्यात आली आहेत. ती चिन्हे वापरली म्हणजे तोच उतारा कसा स्पष्ट होतो. पाहाः “आवडले का तुला हे पुस्तक?” “हो ! जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे,” जयंत म्हणाला. वडील म्हणाले, “रामायण कुणी लिहिले, आहे का तुला ठाऊक? रामायणाचा लेखक हा एक अडाणी कोळी होता. पुढे तो मोठा ॠषी झाला.” “कोळी होता?” जयंताने मध्येच विचारले. “हो !” वडील सांगू लागले, “फार वर्षांपूर्वीची गोष्ट….” वरील उता-यात दिलेल्या काही चिन्हांमुळे आपण वाचताना कोठे व किती थांबावे हे समजते व बोलणा-या व्यक्तीच्या मनातले भावही समजतात. त्यामुळे उतारा सहज समजण्यात मदत होते. विरामचिन्हे आपल्या लेखनात नसली, तर वाक्य कोठे संपले कोठे सुरु झाले, ते कसे उच्चारावयाचे हेच मुळी समजणार नाही. म्हणून योग्य विरामचिन्हांचा वापर कोठे व केव्हा करावा याची कल्पना आपणांस अवश्य हवी. विरामचिन्हे दोन प्रकारची आहेतः (१) विराम दर्शविणारी व (२) अर्थबोध करणारी. विरामचिन्हे म्हणजे केवळ तांत्रिक बाब नाही. मजकुरातील आशय, अर्थ , भावना, बोलणा-याचा आविर्भाव हे लक्षात घेऊन लिहिताना व वाचताना त्याचा उपयोग करावा लागतो. प्रसिध्द साहित्यिक कै. पु. ल देशपांडे यांनी केलेली ‘अभिवाचने’ या संदर्भात विद्यार्थ्यांनी अभ्यासावीत. ‘म्हैस’, ‘नारायण’, ‘चितळे मास्तर’ ही अभिवाचने उदाहरणादाखल घेता येतील, असा अभ्यास करताना मूळ साहित्यकृती वाचावी, अभ्यासावी, त्यातील विरामचिन्हांच्या जागा लक्षात घ्याव्यात आणि नंतर त्यांच्या ध्वनिचित्रफिती काळजीपूर्वक ऐकाव्यात. मराठी भाषेतील अशा ध्वनिचित्रफिती फार मोठा ठेवा आहे. मान्यावर साहित्यिकांची अशी अभिवाचने अभ्यासून, विरामचिन्हांचा अभ्यास करण्यासाठी ती अवश्य ऐकावीत. त्यामुळे ‘विराम दर्शविणारी’ व ‘अर्थबोध करणारी’ विरामचिन्हे आपणही आपल्या लेखनात परिणाम कारकरीतीने वापरु शकू. आपण लेखनात वारंवार येणारी प्रमुख विरामचिन्हे कोणती व ती केव्हा वापरतात ती तक्त्याच्या स्वरुपात पुढे दिली आहेत. त्याचा नीट अभ्यास करा. विरामचिन्हांचा उपयोग दाखविणारा तक्ता
क्र.
चिन्हाचे नाव
चिन्ह
केव्हा वापरतात?
उदाहरण
१
पूर्ण विराम
.
(१) विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी. (२) शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी आद्याक्षरामुळे (१) तो घरी गेला. (२) ता.क. (ताजा कलम) य.गो. = (यशवंत गोपाळ)
(२)
अर्धविराम
;
दोन छोटी वाक्ये, उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असता.
ढग खूप गर्जत होते; पण पाऊस नाही.
(३)
स्वल्पविराम
,
(१) एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास. (२) संबोधन दर्शविताना (१) हुशार, अभ्यासू खेळकर व आनंदी मुले सर्वांना आवडतात. (२) मधू , इकडे ये.
(४)
अपूर्ण विराम (उपपूर्णविराम)
:
वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेः १, ८, १४, २७, ४०
(५)
प्रश्नचिन्ह
?
प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी.
तू केव्हा आलास?
(६)
उद् गारचिन्ह
!
उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणा-या शब्दाच्या शेवटी (१) अरेरे ! तो नापास झाला. (२) शाबास ! छान खेळलास.
(७)
अवतरण चिन्हे
“ ” ‘ ’ (दुहेरी) बोलणा-याच्या तोंडचे शब्द दाखविण्याकरता. (एकेरी) एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असता. दुस-याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना तो म्हणाला, “मी येईन.” मूलध्वनींना ‘वर्ग’ असे म्हणतात.
(८)
संयोगचिन्हे
-
(१) दोन शब्द जोडताना. (२) ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास विद्यार्थि – भांडार, प्रेम – विवाह. आजचा कार्यक्रम शाळे – पुढील पटांगणावर होईल.
(९)
अपसारण चिन्ह (डॅश) (स्पष्टीकरण चिन्ह)
-
(१) बोलता बोलता विचारमालिका तुटल्यास. (२) स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास. (१) मी तेथे गेलो, पण – (२) तो मुलगा – ज्याने बक्षीस मिळविले – आपल्या शाळेत आहे.
विरामचिन्हे
लेखनविषयक नियमावली
आपले मराठीतील लेखन काही नियमांनी निश्चित केलेले आहे. वाचणारे, लिहिणारे, ऐकणारे, बोलणारे असे आपण सर्व भाषेचा उपयोग करीत असतो. आपण आपल्या मनातील आशय, विचार, कल्पना, भावना लिहून व्यक्त करतो. त्यात वस्तुनिष्ठ रीतीने समानता असावी. असे सर्वांनाच वाटते. त्यासाठी आपल्या लेखनासाठी काही नियम तयार करण्यात आले. त्यांना ‘लेखनविषयक नियमावली’ असे म्हणतात. लेखनविषयक नियमावली यासाठी ‘शुध्दलेखन’ असेही म्हणतात. शुध्दलेखन किंवा लेखनविषयक नियमावलीचे पालन अत्यंत आवश्यक आहे. व्याकरणाच्या अभ्यासाचा तो एक भाग आहे. अशा प्रकारचे नियम ‘महाराष्ट्र साहित्य महामंडळाने’ तयार केलेले आहेत. अशा लेखनविषयक नियंमाची चर्चा नित्य चालू असते. आपले लेखन बिनचूक व्हावे, यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. शुध्द शब्द , शब्दांचे सामान्यरुप, याबाबतीत आद्य काळजी घेतली पाहिजे. जेव्हा शंका येईल तेव्हा योग्य संदर्भसाहित्याचा आधार घेतला पाहिजे. लेखनात बिनचूकपणा असायला हवा, हा आपल्या मराठी भाषेच्या अभिमानाचाही विषय असावा .आपली भाषा बोलताना, लिहिताना बिनचूकपणा यावा यासाठी ‘शुध्दलेखन’ या विषयाचा अभ्यास आवश्यक आहे. ‘शुध्दलेखन’ हा वेगळा असा विषय नाहीच. व्याकरणाचा तो एक भाग आहे. आपण लिहितो त्या शब्दाचे शुध्द स्वरुप कोणते व अशुध्द स्वरुप कोणते यांबाबत भाषेत काही नियम ठरविण्यात आले आहेत. ते नियम हाच व्याकरणाचा विषय ; व व्याकरणातील नियमांना अनुसरुन केलेले निर्दोष लेखन म्हणजेच शुध्दलेखन.शुध्दलेखनविषयक नियमांत भाषेच्या लिहिण्याबाबतचा सर्वांगीण विचार न करता आपण –हस्व, दीर्घ व अनुस्वार यांचाच प्रामुख्याने विचार करतो. भाषेत शुध्दलेखनविषयक ठरविलेले नियम कायमचे राहू शकत नाहीत. कालपरत्वे भाषेत बदल होत जातो. भाषा ही प्रवाही आहे. कालान्तराने भाषेत बदल होत जाणार म्हणजे तिच्या लेखनपध्दतीतही बदल होणे साहजिक आहे. यास अनुसरुन पूर्वीच्या लेखनपध्दतीत व आजच्या लेखनपध्दतीत खूपच फरक झालेला आढळेल. पूर्वीच्या पुस्तकांतून छापलेल्या मजकुरात खूपच ठिकाणी अनुस्वार देण्याची पध्दत होती. आता त्यात बदल झाला आहे. आज लेखनविषयक जे सरकारमान्य नियम आहेत ते मराठी साहित्य महामंडळाने पुरस्कृत केलेले नियम आहेत.त्यांनाच ‘म. सा. महामंडळाचे नियम’ असे म्हणटले जाते. तेच नियम थोड्या विस्ताराने सुगम करुन व अधिक उदाहरणे देऊन खाली दिले आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचा नीट अभ्यास करावा व आपले लेखन जास्तीत जास्त निर्दोष करण्याचा प्रयत्न करावा .या लेखनविषयक नियमांचे चार भाग केले आहेतः (१) अनुस्वार कोठे द्यावेत? (२) शब्दाच्या शेवटी येणारे इकार व उकार केव्हा –हस्व वा दीर्घ लिहावेत? (३) उपान्त्य अक्षरातील इकार व उकार कसा लिहावा? व (४) इतर नियम. हे नियम क्रमाने पुढे दिली आहेतः १. अनुस्वार (१) ज्या अक्षराचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो; त्या अक्षरावर अनुस्वार द्यावाः ( = स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा.) आंबा, तंतू, घंटा, हिंग, सुंठ, गंमत, करंजी, गुलकंद, गंगा, कुंकू, तंटा, चिंच, उंट, कंकण, निबंध, अलंकार. (२) संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या ( = तत्सम ) शब्दांतील अनुस्वार पर – सवर्णाने ( म्हणजे पुढे येणा-या व्यंजनाच्या वर्गातील पंचमवर्णाने) लिहिण्यास हरकत नाही. गंगा, - गड्ःगा, कुंज – कुत्र्ज, घंटा – घण्टा, अंत – अन्त, चंपक – चम्पक, शंख – शड्ःख, पंचम – पत्र्च, चंड – चण्ड, छंद – छ्न्द, अंबुज – अम्बुज. (३) य् , र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह, यांच्यापूर्वी येणा-या अनुस्वारांबद्दल संस्कृतातल्याप्रमाणे केवल शीर्षबिंदू द्यावाः संयम, संरक्षण, संलग्न, संवाद, संशय, संसार, सिंह, अंश, संस्कार, मांस, संस्था, संहार, संयुक्त, कंस. (४) नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरुपांवर विभक्तिप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावाः (एकवचन) – मुलास, घरात, त्याचा, त्यासाठी, देशासाठी. (अनेकवचन) – मुलांस, घरांत, त्यांचा, त्यांसाठी, देशांसाठी. (५) वरील नियमांव्यतिरिक्त शुध्दलेखनाच्या पूर्वीच्या नियमांनुसार जे अनुस्वार आपण देत होतो ते आता देऊ नयेत. उदा. - (रुढी म्हणून) – पहांट, केंस, झोंप, एकदां, लांकूड, धांव, टोंक , नाहीं, कांही. (व्युत्पत्तीमुळे) – नांव, पांच, घांट, गांव, कांटा, कीं, सांवळा, कोंवळा, गहूं, (व्याकरणिक) – केळें – केळीं, वासरुं, तिनें, घरांत, जेथें, तेव्हां, यामुळें, यासाठीं, तीं मुलें घरीं गेलीं, मीं कामें केलीं, मी आहे – जातों – गेलों – जाऊ – जातां – जातांना. वरील कारणांसाठी दिले जाणारे अनुस्वार आता देण्याची आवश्यकता नाही. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे – स्पष्ट उच्चारल्या जाणा-या अनुनासिकांवर व नामे आणि सर्वनामे यांच्या अनेकवचनी सामान्यरुपांवर येणा-या अनुस्वारांखेरीज आता कोठेही अनुस्वार देण्याची गरज नाही. २. -हस्व – दीर्घ (अन्य अक्षरे) (१) एकाक्षरी शब्दातील इ – कार किंवा उ - कार दीर्घ उच्चारला जातो म्हणून तो दीर्घ लिहावा. मी, ही, तू, धू, जू, ऊ, ती, जी, पी, बी, पू, रु. (२) मराठी शब्दाच्या शेवटी येणारा इ – कार किंवा उ – कार उच्चारानुसार दीर्घ लिहावाः आई, वाटी, टोपी, चेंडू, बाळू, खेळू, पिशवी, चुलती, वही, काठी, पेटी, दांडू, वाळू, बोरु, गिरणी, सुपारी. (३) कवि, हरि, गुरु, वायु, प्रीति, यासांरखे तत्सम (-हस्व) इ – कारान्त व उ – कातान्त शब्द मराठीच्या स्वभावानुरुप दीर्घान्त उच्चारले जातात म्हणून तेही दीर्घान्त लिहावेतः गडकरी हे कवी होते. हरी व मधू घरी गेले. ग्रंथ हेच खरे गुरु होत. प्राण्यांवर प्रीती करावी. (४) व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके, व सुटे शब्द (संस्कृतातून मराठीत जसेच्या तसे आलेले) जरी मुळात –हस्वान्त असले तरी ते मराठीत दीर्घान्त लिहावेत. उदा. – हरी, अन्योक्ती, अतिथी, विभक्ती, संधी, कुलगुरु, इत्यादी. (५) मात्र सामाजिक व साधित शब्दातील पहिले पद (-हस्व) इ –कारान्त किंवा उ – कारान्त तत्सम शब्द असेल तर ते –हस्वान्तच लिहावेतः कविराज, लघुकथा, वायुपुत्र, मृत्युलेख , गुरुदक्षिणा, भक्तिपर, हरिकृपा, शत्रुपक्ष, पशुपक्षी, रविवार, भानुविलास, गतिमान. (६) सामाजिक व साधित शब्दातील पहिले पद (दीर्घ) इ – कारान्त किंवा ऊ – कारान्त तत्सम शब्द असेल तर ते दीर्घान्तच लिहावेः लक्ष्मीपुत्र, महीपाल, पृथ्वीतल, भूगोल, वधूपरिक्षा, वाणीवैभव, गौरीहर, दासीजन, वधूवर, श्रीधर, नदीतीर, भगिनीमंडळ. (७) विद्यार्थिन्, प्राणिन्, पक्षिन्, यांसारखे इन् – अन्त शब्द मराठीत येताना त्याच्या शेवटच्या ‘न्’ चा लोप होतो व उपान्त –हस्व अक्षर दीर्घ होते. उदा. – विद्यार्थी, प्राणी, पक्षी, मंत्री, गुणी, धनी, योगी, स्वामी. परंतु हे शब्द समासातील पहिल्या पदाच्या जागी आले तर ते –हस्वान्तच ठेवावे. उदा. – विद्यार्थिगृह, प्राणिसंग्रह, पक्षिगण, मंत्रिमंडळ, स्वामिभक्त, योगिराज. (८) पुढील तत्सम अव्यये व ‘नि’, ‘आणि’ ही दोन मराठी अव्यये –हस्वान्तच लिहावीः परंतु, अद्यापि, तथापि, अति, इति, प्रभृति, यद्यपि, यथामति, नि, आणि, (‘इत्यादी’ हा शब्द अव्यय नसल्यामुळे तो दीर्घोन्त लिहावा.) ३. –हस्व – दीर्घ (उपान्त्य अक्षरे) (१) मराठी शब्दांतील अकारान्तापूर्वीचे इ – कार व उ – कार दीर्घ असतातः खीर, पीठ, फूल, सून, गरीब, कठीण, नाईक, हुरुप, विहीर, दीर, नीट, मूल, ऊस, बहीण, जमीन, ठाऊक, घेऊन, वसूल. (२) पण, तत्सम शब्दांतील अकारान्तापूर्वीचे इ – कार व उ – कार मूळ संस्कृतातल्याप्रमाणे –हस्वच राहतातः गुण, युग, विष, प्रिय, मधुर, बहुत, मंदिर, अनिल, परिचित, स्थानिक, बधु, सुख, हिम, शिव, कुसुम, तरुण, रसिक, चतुर, नागरिक, सामाजिक. (३) मराठी शब्दांतील अन्त्य अक्षर दीर्घ स्वरान्त असेल तर उपान्त्य इ –कार वा उ – कार –हस्व असतो. किडा, गुणी, पिसू, मेहुणा, सरिता, वकिली, पाहिजे, मिळवितो, दिवा, सुरी, सुरु, तालुका, गरिबी, महिना, ठेविले, फसविले. (४) पण, तत्सम शब्दांतील उपान्त्य अक्षरे दीर्घ असतील तर ती मूळ संस्कृतातल्याप्रमाणे दीर्घ ठेवावी. वरील नियमाप्रमाणे ती –हस्व ठेवू नयेतः पूजा, भीती, प्रीती, पूर्व, दीप, पीडा, नवीन, संगीत, लीला, नीती, कीर्ती, चूर्ण, नीच, क्रीडा, शरीर, परीक्षा. ४. सामान्यरुप (१) इ – कारान्त व उ – कारान्त तत्सम शब्दाचे सामान्यरुप करताना अन्त्य स्वर दीर्घ होतोः कवि – कवीला – कवीसाठी; गुरु – गुरुचा – गुरुपेक्षा (२) मराठी शब्दाचे उपान्त अक्षर (दीर्घ) ई किंवा ऊ – युक्त असेल तर त्याचे सामान्यरुप करताना ते उपान्त्य अक्षर –हस्व उच्चारले जाते म्हणून ते –हस्वच लिहावेः सू – सुनेला, चूल – चुलीपुढे, बहीण – बहिणीचा, नागपूर – नागपुरास. (३) पण तत्सम शब्दाचे उपान्त अक्षर (दीर्घ) ई किंवा ऊ – युक्त असेल तर त्याचे सामान्यरुप करताना ते दीर्घच लिहावेः गीता – गीतेचा – गीतेप्रमाणे, पूर्व – पूर्वेला – पूर्वेकडे, परीक्षा – परीक्षेत – परीक्षेसाठी. ५. इतर (१) ए – कारान्त नामाचे सामान्यरुप या – कारान्त कारावेः करणे – करण्यासाठी, पाहणे – पाहण्यास, भावे – भाव्यांचा, फडके – फडक्यांना (करणेसाठी, पाहणेस, भावेंचा, पडकेंना, अशी रुपे लिहू नतेय.) (२) पुढील विशिष्ट शब्द खालीलप्रमाणे लिहावेः नागपूर, एखादा, कोणता, हळूहळू, तसूतसू, मुळूमुळू, (हे शब्द नागपुर, एकादा, कोणचा, हळूहळू, तसुतसू, मुळुमुळू असे लिहू नयेत.) (३) लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते. त्या वेळी तिचे स्वरुप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे असावे. उदा. – तो म्हणाला, “मला असं वाटतं, की त्याचं म्हणणं खरं असावं.” अशी भाषा एरवी लिहू नये. नाटक – कथा – कादंबरी आदि वाड्ःमयप्रकारांत संवादाच्या वेळी अशा अनुस्वारयुक्त अकारान्त रुपे लिहिण्यास हरकत नाही. लेखनात बोली भाषा वापरण्याची गरज पडल्यास त्या वेळी बोली भाषेची रुपे वापरावीत. (४) पुढील तत्सम शब्द मुळातल्याप्रमाणे व्यंजनात (म्हणजे शेवटच्या अक्षराचा पाय मोडून) लिहिण्याची प्रथा होती. असे शब्द आता पुढीलप्रमाणे अकारान्त लिहावेतः अर्थात, क्वचित, तस्मात, साक्षात, विद्वान, कदाचित, परिषद, पश्चात, किंचित, विद्युत, सम्राट, श्रीमान, भगवान, संसद. (५) परकीय भाषेतील शब्द मराठीत लिहिताना ते त्या भाषेतील उच्चाराप्रमाणे लिहावेत. (६) कवितेमध्ये –हस्व – दीर्घांचे बंधन पाळता येत नसल्यामुळे वृत्तानुसार –हस्व – दीर्घ लिहावेत. (७) राहणे, पाहणे, वाहणे अशी रुपे लिहावी. रहाणे – राहाणे , पहाणे – पाहाणे, वहाणे, वाहाणे, अशी रुपे लिहू नयेत. मात्र आज्ञार्थी रुपे लिहिताना ‘राहा, पाहा, वाहा’ यांबरोबरच ‘रहा, पहा, वहा’ ही रुपे लिहिण्यास हरकत नाही. (८) ‘ही’ हे शब्दयोगी अव्यव दीर्घान्त लिहावे. ‘अन्’ हा शब्द व्यंजनान्त लिहावा. लेखनातील शब्दांच्या सामान्य चुका शुध्दलेखनाच्या नियंमाचे पालन न केल्यामुळे चुका होतात ही गोष्ट खरी. शिवाय जे शब्द आपण त्या शब्दांच्या लेखनातही अशुध्दता बरीच असते. त्याला विविध कारणे आहेतः (१) संस्कृत भाषेचे अज्ञान (२) हिंदी भाषेचा परिचय (३) विसर्गाचा घोटाळा (४) वर्णाचा उच्चार करताना होणा-या चुका (५) वर्णाच्या अनुक्रमातील बदल. अशा अनेक कारणांमुळे आपल्या लेखनात चुका होतात. त्या शक्यतो टाळता याव्या म्हणून नेहमीच्या प्रचारातील काही शुध्द शब्द नमुन्यादाखल खाली दिले आहेत. प्रत्येक वाचकाने त्यांचा नीट अभ्यास करावाः वर्णाचा चुकीचा क्रम वर्णांचा चुकीचा उच्चार अशुध्द शुध्द अशुध्द शुध्द कप्लना कल्पना अश्या अशा चमत्त्कार चमत्कार उधारण उदाहरण तप्तर तत्पर ज्यास्त जास्त दत्पर दप्तर भुगोल भूगोल शब्द शब्द सिंव्ह सिंह शुध्द शुध्द सौंसार संसार संस्कृत भाषेच्या अज्ञानामुळे होणा-या चुका असुध्द शुध्द असुध्द शुध्द अध्यात्मिक आध्यत्मिक परिक्षा परीक्षा अथिती अतिथि पाश्चात्य पाश्चात्त्य अनुसया अनसूया प्रतिक्षा प्रतीक्षा आशिर्वाद आशीर्वाद प्राविण्य प्रावीण्य उज्वल उज्ज्वल मतितार्थ मथितार्थ उर्मी ऊर्मी मंदीर मंदिर उहापोह ऊहापोह महत्व महत्त्व ऊष्ण उष्ण महात्म्य माहात्म्य कोट्याधीश कोट्यधीश रविंद्र रवींद्र ग्रहपाठ गृहपाठ विद्यर्थ विध्यर्थ तत्व तत्त्व सहाय्य साहाय्य, साह्य नाविन्य नावीन्य सहाय्यक सहायक निर्भत्सना निर्भर्त्सना सुशिला सुशीला नैॠत्य नैॠत्य सूज्ञ सुज्ञ हिंदीच्या परिचयामुळे विसर्गाच्या घोटाळ्यामुळे होणा-या चुका होणा-या चुका असुध्द शुध्द असुध्द शुध्द ज्यादा जादा अधप्पात अधःपात तीसरा तिसरा अंधःकार अंधकार दूकान दुकान घनःशाम घनश्याम दूसरा दुसरा धिःकार धिक्कार पहला पहिला निस्पृह निःस्पृह पानी पाणी पृथःकरण पृथक्करण पुलीस पोलिस मातोषी मातुःश्री मदद मदत मनस्थिती मनःस्थिती सफेद सफेत हाहाःकार हाहाकार इष्ट – इष्टाचा घोटाळा असुध्द शुध्द असुध्द शुध्द अंगुष्ट अंगुष्ठ ज्येष्ट ज्येष्ठ उत्कृष्ठ उत्कृष्ट बलिष्ट बलिष्ठ कनिष्ट कनिष्ठ वरिष्ट वरिष्ठ विशिष्ठ विशिष्ट श – ष – स – चा गोंधळ असुध्द शुध्द असुध्द शुध्द इषारा इशारा विषद विशद दुष्य दृश्य विशाद विषाद लेष लेश विषेश विशेष सुश्रुषा शुश्रुषा इतर शब्द असुध्द शुध्द असुध्द शुध्द अलिकडे अलीकडे औद्योगीकरण उद्योगीकरण अवश्यक आवश्यक खावून खाऊन आधीन अधीन जेऊन जेवून आंग अंग ससा सशाचा इस्त्री इस्त्री दक्षणा दक्षिणा ईयत्ता इयत्ता दुर्वा दूर्वा उच्च उच्च वांग्मय वाड्ःमय ऊग्र उग्र विनंति विनंती
लेखनविषयक नियमावली
वाचान्विचार
नाम,सर्वनाम,विशेषण,क्रियापद यांच्या रुपांमध्ये बदल होण्यास कारणीभूत असणारा एक घटक आपण पाहिला.तो म्हणजे लिंग.’्वचना’मुळेही त्यांच्या रुपात बदल होतो.आपण आता ‘ वचन ‘ या घटकाबद्द्ल विचार करणार आहोत. नामावरुन जसे त्याचे लिंग समजते ; तसे त्या नामाने निर्देशित केलेली वस्तू एक आहे की त्या वस्तू एकापेक्षा अधिक आहेत हेही कळते.नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो एक धर्म आहे त्याला वचन असे म्हणतात. ‘वचन’ या शब्दाचा अर्थ बोलणे.आपण एका वस्तूबद्द्ल बोलू लागलो की ते एकवचन व अनेकांबद्द्ल बोलू लागलो की अनेक वचन.मराठीत वचने दोन मानतातः १)एकवचन २)अनेकवचन नामाच्या रुपावरुन जेव्हा एक वस्तूचा बोध होतो तेव्हा त्याचे एकवचन असते.जसे मुलगा,गाय,पाटी,पुस्तक,इमारत.नामाच्या रुपावरुन जेव्हा एकापेक्षा अधिक संख्येचा बोध होतो तेव्हा त्याचे अनेकवचन असते.अनेकवचनाला ‘बहुवचन’ असेही काही लोक म्हणतात.संस्कृतात तीन वचने मानतात.१)एकवचन, २)द्विवचन,३)अनेकवचन.मराठीत द्विवचन नसल्यामुळे बहुवचनाऐवजी अनेकवचन हाच शब्द अधिक वापरला जातो.लिंगामुळे नामाच्या रुपात बदल होतो.तसाच वचनामुळेही नामाच्या रुपात बदल कोणकोणत्या प्रकारे होतो ते आपण पाहूः वचनभेदामुळे नामांच्या रुपात होणारा फरक नामाचे जे मूळ रुप असते तेच त्याचे एकवचन असते.नामांची अनेकवचनाची रुपे बनविताना काही नामांना प्रत्यय लागतात,तर काहींची रुपे एकवचनासारखीच राहतात. पुल्लिंगी नामांची अनेकवचने १)पुढील नामांची रुपे पाहाः एकवचन अनेकवचन ए.व. अ.व. ए.व. अ.व. कुत्रा कुत्रे आंबा आंबे घोडा घोडे ससा ससे रस्ता रस्ते लांडगा लांडगे मुलगा मुलगे फळा फळे राजा राजे यावरुन असे म्हणता येईल,की अकारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन एकारान्त होते. २)पुढील नामांची रुपे पाहाः देव देव शत्रू शत्रू तेली तेली उंदीर उंदीर लाडू लाडू गहू गहू कवी कवी फोनो फोनो फोटो फोटो नियम – आकारान्ताशिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामांची रुपे दोन्ही वचनांत सारखीच असतात. पुल्लिंगी नामांमध्ये आकारान्त नामांचे अनेकवचन वेगळे असते. मराठी ए,ऐ व औ अन्तांची पुल्लिंगी नामे नाहीत. स्त्रीलिंगी नामांची अनेकवचने १)पुढील नामांची अनेकवचने पाहाः एकवचन अनेकवचन ए.व. अ.व. ए.व. अ.व. वेळ वेळा केळ केळी विहीर विहिरी वीट विटा भिंत भिंती म्हैस म्हशी चूक चुका तारीख तारखा सून सुना नियम – आकारान्त स्त्रीलिंगी नामाचे एकवचन केव्हा आ- कारान्त होते तर केव्हा ई – कारान्त होते. ‘ य ‘ नंतर ई आल्यास उच्चारात य चा लोप होतो.उदा.गाय – गायी – गाई,सोय – सोयी – सोई २)पुढील नामांची अनेकवचनांची रुपे पाहाः भाषा भाषा पूजा पूजा सभा सभा दिशा दिशा आज्ञा आज्ञा विद्या विद्या नियम – आ – कारान्त स्त्रीलिंगी तत्सम नामाचे अनेकवचन एकवचनासारखेच राहते. ३)पुढील शब्दांची रुपे पाहाः नदी नद्या बी बिया स्त्री स्त्रिया काठी काठ्या भाकरी भाक-या लेखणी लेखण्या नियम – ई – कारान्त नामाचे अनेकवचन या – कारान्त होते.(अपवाद – दासी,दृष्टी ) ४)पुढील शब्दांची रुपे पाहाः सासू सासवा जाऊ जावा जाऊ जावा पिसू पिसवा जळू जळवा ऊ ऊवा नियम – उ – ऊ – कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन वा - कारान्त होते. (अपवाद – वाळू ,वस्तू,बाजू ) ५)पुढील शब्दांची रुपे पाहाः आते आता पै पया ए – ऐ – कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन वा- कारान्त होतात.( पै – हे पूर्वी एक जुने नाणे होते.) ६)ओ – कारान्त स्त्रीलिंगी शब्द – प्रचारात असलेला बायको असून त्याचे अनेकवचन बायका असे होते. नपुंसकलिंगी नामांची अनेकवचने १)पुढील शब्दांची रुपे पाहाः घर घरे फूल फुले माणूस माणसे दार दारे शेत शेते घड्याळ घड्याळे नियम – अ – कारान्त नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन ए - कारान्त होते. २)पुढील शब्दांची रुपे पाहाः मोती मोत्ये मिरी मि-ये नियम – ई – कारान्त नपुसलिंगी नामाचे अनेकवचन ए – कारान्त होते व विकल्पाने ‘ य ‘ हा आदेश होतो.(अपवाद – पाणी, लोणी ,दही, अस्थी) ३)पुढील शब्दांची रुपे पाहाः पाखरु पाखरे लिंबू लिंबे गळू गळवे वासरु वासरे पिलू पिले आसू आसवे नियम – उ – ऊ – कारान्त नपुसलिंगी नामाचे अनेकवचन ए – कारान्त होते. क्वचित प्रसंगी ते वे – कारान्त होते. ४)पुढील शब्दांची रुपे पाहाः केळे केळी गाणे गाणी मडाके मडकी कुत्रे कुत्री खेडे खेडी रताळे रताळी नियम – ए – कारान्त नपुसलिंगी नामाचे अनेकवचन ई – कारान्त होते.(अपवाद – सोने,रुपे , तांबे,शिसे यांची अनेकवचन एकवचनाप्रमाणे राहतात.) वचनासंबंधी विशेष गोष्टी १)नामांच्या तीन प्रकारांपैकी सामान्यनामांची अनेकवचने होतात.विशेषनामांची व भाववाचक नामांची अनेकवचने होत नाहीत. विशेषनामांचा व भाववाचकनामांचा अनेकवचनी प्रयोग जेथे होतो तेथे सामान्यनामेच असतात. विशेषनाम हे एकाच व्यक्तीचे नाम असते.त्यामुळे त्याचे असल्यामुळे गुणधर्म हे सर्वत्र एकच असतात,म्हणून भाववाचकनामे एकवचनी असतात. २)केव्हा केव्हा व्यक्ती एक असूनही त्या व्यक्तीबद्द्ल आदर दाखविण्यासाठी आपण त्या व्यक्तीबद्दल अनेकवचनी प्रयोग करतो जसे – १)गुरुजी शाळेत आत्ताच किंवा आदरार्थी बहुवचन असे म्हणतात.असा आदर दाखविण्यासाठी राव, जी , पंत,साहेब इ. महाराज यांसारखे शब्द जोडतात.उदा.गोविंदराव विष्णुपंत,गोखलेसाहेब इ.स्त्रियांच्या नावांसमोर बाई,ताई माई ,आई काकू इ. शब्द येतात.उदा.राधाबाई,शांताबाई,जानकीकाकू इ. ३)काही नामे नेहमी अनेकवचनी आढळतात.उदा.डोहाळे,कांजिण्या,शहरे,क्लेश,हाल,रोमांच इ. ४)विपुलता दाखविण्यासाठी काही शब्दांचे एकवचन वापरतात. १)यंदा खूप आंबा पिकला. २)शेटजींच्याजवळ खूप पैसा आहे. ३)पंढरपुरात यंदा लाख माणूस जमले होते. ५)जोडपे,त्रिकूट,आठवडा,पंचक,डझन शत,सहस्त्र,लक्ष, कोटी हे शब्द असे आहेत की, त्यातून अनेकत्वाचा बोध होतो. तरीही तेवढ्या संख्येचा एक गट मानून ढीग,रास,समिती, मंडळ,सैन्य वगैरे शब्दांतील समूह हाएकच मानला जात असल्यामुळे ती एकवचनी ठरातात.मात्र समूह अनेक तर ते अनेकवचनी ठरतात. ६)अधिक सलगी किंवा जवळीक दाखवायची असेल तेव्हा मोठ्या व्यक्तींबाबतही एकवचन वापरण्यात येते. उदा.१)दादा शाळेतून आला. २)वहिनी उद्या येणार आहे. ३)आई गावाला गेली.
वाचान्विचार
शब्दयोगी अव्यय
पुढील उतारा वाचा. “जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरणे पसरली. साळुंकीने घरट्याबाहेर झेप घेतली. तिच्या मागोमाग तिचा जोडीदारही बाहेर पडला. याच संधीची तो मुलगा मघापासून वाट पाहात होता . त्याची आई जाईच्या मांडवाखाली फुले वेचीत होती.साळुंकी दूर हिरवळीवर पिलांसाठी चारा टिपत होती.” वरील उता-यातील ‘वर, बाहेर, ही, पासून, खाली, साठी’ हे जाड टाइपात छापलेले शब्द त्यांच्या मागे असलेल्या शब्दांना जोडून आलेले दिसतील. ते ज्या शब्दांना जोडून आलेले आहेत त्यांचा त्याच वाक्यातील दुस-या एखाद्या शब्दाशी ते संबंध जोडण्याचे काम करतात. उदाहरणार्थ, पहिल्या वाक्यातील ‘वर’ हा शब्द ‘मांडव’ या शब्दाला जोडून आला आहे. आणि तो ‘मांडव’ व पसरली ‘ या शब्दांचा संबंध जोडण्याचे काम करतो. हे शब्दाला जोडून येतात्त म्हणून त्यांना ‘शब्दयोगी’ असे म्हणतात. लिहिताना देखील हे शब्द मागील शब्दांना जोडूनच लिहावयास हवेत. शब्दयोगी अव्यये व क्रियाविशेषण अव्यये तसे पाहिले तर शब्दयोगी अव्यये स्वतंत्र असे श्ब्द नाहीत. ‘वर, खाली मागे, पुढे, बाहेर, पूर्वी, समोर’ यांसारखे शब्द मूळची क्रियाविशेषण अव्यये आहेत. पण वर उता-यातील ‘वर, खाली, बाहेर’ हे शब्द स्वतंत्रपणे येऊन क्रियापदाबद्दल विशेष अशी माहिती सांगत नाहीत. म्हणून ती क्रियाविशेषणे नाहीत.वरील वाक्यांत त्यांचे कार्य त्याहून वेगळे आहे. ते शब्दांना ( सामान्यतः नामांना किंवा नामाचे कार्य करणा-या इतर शब्दांना) जोडून येऊन त्यांचा त्याच वाक्यातील दुस-या एखाद्या शब्दाशी संबंध जोडतात. ही शब्दयोगी अव्यये नसती तर त्या वाक्याचा अर्थ नीट लागला नसता. शब्दयोगी अव्ययांच्या रूपामध्ये लिंग, वचन विभक्ती, पुरूष विभक्ती यांमुळे बदल किंवा विकार होत नाही म्हणून त्यांना अविकारी किंवा अव्यये असे म्हणतात. शब्दयोगी अव्यये व क्रियाविशेषण अव्यये यांतील फरक पुढील दोन गटांतील वाक्ये पाहा. गट १ गट २ १. पतंग झाडावर अडकला. १. पतंग वर जात होता. २. टेबलाखाली पुस्तक पडले. २. मला खाली बसणे आवडते. ३. सूर्य ढगामागे लपला. ३. मागे या ठिकाणी विहीर होती. वरील दोन्ही गटांत ‘वर, खाली, मागे’ हे शब्द दिसतात. पहिल्या गटातील शब्द शब्दयोगी अव्ययांचे काम करतात. कारण ते शब्द अगोदरच्या शब्दाला जोडून आले. आहेत. कारण ते क्रियापदाबद्दल अधिक माहिती देऊन ‘अव्यये’ राहतात. महत्त्वाचे – शब्दयोगी अव्यये सामान्यतः नामांना जोडून येतात. तसे असले तरी शब्दयोगी अव्यये क्रियापदे आणि क्रियाविशेषणे यांनाही केव्हा केव्हा जोडून येतात. जसे – येईपर्यत, बसल्यावर, जाण्यापेक्षा, बोलण्यामुळे, परवापासून, यंदापेक्षा, केव्हाच, थोडासुध्दा. शब्दयोगी अव्ययांचे प्रकार शब्दयोगी अव्ययांचे त्यांच्या अर्थावरून पुढील प्रकार पडतात. शब्दयोगी अव्ययांचे प्रकार क्रम प्रकार काही शब्दयोगी अव्यये (१) कालवाचक (अ) आता, पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत, पावतो. (आ) गतिवाचक – आतून, खालून, मधून, पर्यंत, पासून. (२) स्थलवाचक आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठायी, पाशी, नजीक, समीप, समक्ष. (३) करणवाचक मुळे,योगे,करून, कडून, द्वारा, करवी, हाती. (४) हेतुवाचक साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रीत्यर्थ, निमित्त, स्तव. (५) व्यतिरेकवाचक शिवाय, खेरीज, विना, वाचून, व्यतिरिक्त, परता. (६) तुलनावाचक पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस. (७) योग्यतावाचक योग्य, सारखा, जोगा, सम, समान, प्रमाणे, बरहुकूम. (८) कैवल्यवाचक च, मात्र, ना, पण, फक्त, केवळ. (९) संग्रहवाचक सुध्दा, देखील, ही, पण, बरीक, केवळ,फक्त. (१०) संबंधवाचक विशी, विषयी, संबंधी. (११) साहचर्यवाचक बरोबर, सह, संगे, सकट, सहित, सवे, निशी, समवेत. (१२) भागवाचक पैकी, पोटी, आतून. (१३) विनिमयवाचक बदल, ऐवजी, जागी, बदली. (१४) दिकवाचक प्रत, प्रति, कडे, लागी. (१५) विरोधक विरूध्द, वीण, उलटे. (१६) परिमाणवाचक भर. वरील तक्त्यावरून असे दिसून येईल की, बहुतेक शब्दयोगी अव्यये साधित म्हणजे दुस-या शब्दप्रकांरापासून तयार झालेली आहेत. जसे – १. नामसाधित शब्दयोगी अव्यये – (कड) कडे, (मध्य)मध्ये, (प्रमाण) प्रमाणे, पूर्वी, अंती, मुळे, विषयी. २. विशेषणसाधित शब्दयोगी अव्यये- सम, सारखा, सहित, समान, योग्य,विरूध्द. ३. धातुसाधित शब्दयोगी अव्यये- (कर) करिता, (देख) देखील, (पाव) पावतो, (लाग) लागी, लागून ४. क्रियाविशेषणसाधित शब्दयोगी अव्यये- खालून, मागून, वरून, आतून, जवळून. ५. संस्कॄत शब्दसाधित – पर्यंत, विना, सक्ष, समोप, परोक्ष. सामान्यरूपांचा विचार विभक्तिप्रत्यय लागताना ज्याप्रमाणे नामांचे किंवा सर्वनामांचे सामान्यरूप होते, त्याचप्रमाणे शब्दयोगी अव्यय जोडताना मागील शब्दांचे सामान्यरूप होते. जसे, मांडव – मांडवाखाली, घरटे – घरट्याबाहेर, घर – घरापुढे मात्र काही स्थलवाचक, कालवाचक व परभाषेतील विशेषनामे यांचे सामान्यरूप विकल्पाने होते. जसे, कोल्हापूर – कोल्हापूरपासून, कोल्हापूरापासून. इंग्लंड – इंग्लंडमध्ये, इंगग्लंडामध्ये. शुध्दशब्दयोगी अव्यये ‘च’ देखील, ना, पण, मात्र, सुध्दा, ही’ ही अशी शब्दयोगी अव्यये आहेत की, ती शब्दाला जोडून येताना मागील शब्दांची सामान्यरूपे होत नाहीत. उदारणार्थ,- तूच, आईमात्र, आम्हीदेखील, चंदूही, कुत्रासुध्दा, तुम्हीपण, तोना? अशा शब्दयोगी अव्ययांना शुध्दशब्दयोगी अव्यये असे म्हणतात. या शुध्दशब्दयोगी अव्ययांमुळे मागील शब्दांच्या अर्थास विशेष जजोर येतो. विभक्ति प्रतिरूप शब्दयोगी अव्यये पुढील वाक्ये पाहा. १. त्याच्याकडून हे काम होणार नाही. (तृतीया) २. सरला माधुरीपेक्षा उंच आहे. ( पंचमी) ३. देशासाठी महात्माजींनी प्रानार्पण केले. (चतुर्थी) ४. आम्ही क्रीडांगणावर खेळतो. (सप्तमी) वरील वाक्यातील कडून, पेक्षा, साठी, वर’ ही शब्दयोगी अव्यये अनुक्रमे तृतीया, पंचमी, चतुर्थी, सप्तमी या विभक्तिप्रत्ययांची कार्ये करतात. विभक्ति प्रत्ययांची कार्ये करणा-या शब्दयोगी अव्ययांना ‘विभक्तिप्रतिरूपक’ अव्यये असे म्हणतात. ही अव्यये विभक्तिचा अर्थही दर्शवितात इतकेच नव्हे तर जे अर्थ विभक्तिप्रत्ययांनी प्रकट करता येत नाहीत असे अनेक बारीकसारीक अर्थ या शब्दयोगी अव्ययांनी व्यक्त करता येतात. या दृष्टीने ही अव्यये भाषेत फारच उपयुक्त ठरतात. ही विभक्तिरूपक शब्दयोगी अव्यये कोणती ती क्रमाने त्या – त्या विभक्तींचा पुढे दिली आहेत. विभक्तिप्रतिरूपक अव्यये
विभक्ती
विभक्तिप्रतिरूपक अव्यये
द्वितीया
प्रत, लागी
तृतीया
कडून, करवी, द्वारा, मुळे, योगे, प्रमाणे, सह, बरोबर, वतीने
चतुर्थी
करिता, साठी, कडे, प्रत, पीत्यर्थ, बद्दल, प्रति, ऐवजी, स्तव
पंचमी
पासून, पेक्षा, शिवाय, खेरीज, कडून, वाचून
षष्टी
संबंधी, विषयी
सप्तमी
आत, मध्ये, खाली, ठायी, विषयी, समोर, भोवती, ऐवजी
शब्दयोगी अव्यय
उभयान्वयी अव्यये
उभयान्वयी अव्यय’ हा अव्ययांचा तिसरा प्रकार होय. अव्ययांचा अभ्यास करताना आपण यापूर्वी क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय यांचा अभ्यास केला. आता आपण उभयान्वयी अव्ययांचा अभ्यास करू या.
पुढील वाक्ये पाहा.
१. आईने मंडईतून कांदे व बटाटे आणले.
२. मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि पावसाला सुरूवात झाली.
३. शिक्षणात त्याचे विशेष लक्ष नसे पण व्यायामाची त्याला चांगली आवड होती.
४. शिरीष दंगा करतो, म्हणून शेवटी मार खातो.
वरील वाक्यांपैकी पहिल्या वाक्यात ‘व’ हा शब्द ‘बटाटे’ नि ‘कांदे’ या शब्दांना जोडण्याचे काम करतो. पुढील वाक्यांतील ‘आणि, पण, म्हणून’ हे शब्द दोन वाक्यांना जोडण्याचे काम करतात. अशा त-हेने दोन किंवा अधिक शब्द, अथवा दोन किंवा वाक्ये यांना जोडणा-या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. (‘उभय’ म्हणजे दोन तर ‘अन्वय’ म्हणजे संबंध असा या शब्दाचा अर्थ आहे.)
(उभयान्वयी अव्ययांचे प्रमुख कार्य म्हणजे दोन शब्द किंवा वाक्ये यांना जोडणे हे आहे. ती अव्यये असतात. वाक्यात इतर कोणतेही कार्य ती करत नाहीत. काही शब्द दोन वाक्ये जोडण्याचेकाम करतात. उदाहरणार्थ – जो –जी – जे - ज्या ही सर्वनामे जसा – तसा जितका – तितका ही संबंधी विशेषणे दोन वाक्यांना जोडतात पण ती विकारी आहेत; ती अव्यये नाहीत. जेथे - येथे, जेव्हा – तेव्हा यांसारखी संबंधी क्रियाविशेषणे दोन वाक्ये जोडण्याचे कार्य करतात; पण त्यांचे प्रमुख कार्य क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगण्याचे असते. म्हणून त्यांना उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.)
उभयान्वयी अव्ययांचे प्रकार
उभयान्वयी अव्ययांचे दोन मुख्या प्रकार आहेत.
१. प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय
२. गौणत्वसुचक उभयान्वयी अव्यय
उभयान्वयी अव्ययांनी जोडणारी वाक्ये स्वतंत्र किंवा एकमेकांवर अवलंबून नसणारी म्हणजे ती सारख्या दर्जाची असतील तर अशा प्रकारच्या उभयान्वयी अव्ययांना प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात; पण हीच अव्यये जेव्हा एक प्रधान वाक्य व दुसरे गौण वाक्य (म्हणजे अर्थाच्या दृष्टीने प्रधान वाक्यावर अवलंबून असलेले वाक्य) असेल तर अशी असमान दर्जाची वाक्ये जोडतात. तेव्हा त्यांना गौणत्वसुचक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.
प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांचे पोट प्रकार
(१) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यये
पुढील वाक्ये पाहा
१. विजा चमूक लागल्या आणि पावसाला सुरूवात झाली.
२. आता संध्याकाळ होत आली होती आणि आईला घरची ओढ लागली होती.
३. पिलाने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला.
४. भिका-याला मी एक सदरा दिला; शिवाय त्याला जेवू घातले.
वरील वाक्यांतील ‘आणि, व, शिवाय’ यांसारखी उभयान्वयी अव्यये दोन प्रधान वाक्यांना जोडताना त्यांच्या मिलाफ किंवा समुच्चय करतात. (समुच्चय म्हणजे बेरीज.) ही अव्यये पहिल्या विधानात अधिक भर घालतात; म्हणून अशा उभयान्वयी अव्ययांना समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
‘अन, आणखी, आणि, आणिक, न, नि, व’ ही या प्रकारांतील अव्यये आहेत.
(२) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यये
पुढील वाक्ये पाहा
१. देह जावो अथवा राहो । पाडूरंगी दॄढ भावो ।।
२. पाऊस पडो वा न पडो, तुला आज गावी गेलेच पहिजे.
३. तुला ज्ञान हवे की धन हवे ?
४. तू ये किंवा न ये, मी जाणारच.
वरील वाक्यांतील ‘अथवा, वा, की, किंवा ही उभयान्वयी अव्यये दोन किंवा अनेक गोष्टीपैकी एका गोष्टीची अपेक्षा दाखवितात. म्हणजे ती ‘हे कीवा ते’ ‘कोणते तरी एक’ असा अर्थ सुचवितात. अशा उभयान्वयी अव्ययांना विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. (विकल्प म्हणजे दोहांतील एकाची निवड)
अगर , अथवा, किंवा, की, वा’ ही अव्यये विकल्पबोधक उभयान्वयी अव्यये आहेत.
(३) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यये
पुढील वाक्ये पाहा
१. शेतक-यांची शेते नांगरली; पण पाऊस पडलाच नाही.
२. पुष्कळ मुले उत्तीर्ण झाली; परंतू पहिल्या वर्गात कोणीच आले नाही.
३. मरावे परी कीर्तिरूपे उरावे ।
४. आईला थोडे बरे नाही बाकी सर्व ठीक .
वरील वाक्यांतील ‘पण, परंतू, परी, बाकी’ ही अव्यये पहिल्या वाक्यातील काही उणीव, कमीपणा, दोष असल्याचे दाखवितात. अशा अव्ययांनान्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात. (न्यूनत्व म्हणजे कमीपणा) ही अव्यये दोन वाक्यांतील विरोध दखवितात. म्हणून त्यांना विरोधदर्शक असेही म्हणतात. ‘किंवा, पण, परंतू, बाकी, तरी’ ही अव्यये न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यये आहेत.
(४) परिणामबोधक उभयान्वयी अव्यये
१. मधूने उत्तम भाषण केले; म्हणून त्याला बक्षीस मिळाले.
२. सायकल वाटेत नादुरूस्त झाली; सबब मला उशीर झाला.
३. तुम्ही त्याचा अपमान केला; याकरिता तो तुमच्याकडे येत नाही.
वरील वाक्यांतील ‘म्हणून, सबब, याकरिता’ ही अव्यये पहिल्या वाक्यात जे घडले त्याचा परिणाम पुढील वाक्यात सुचवितात. म्हणून अशांनापरिणामबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.
‘अतएव, तस्मात, तेव्हा, म्हणून, यास्तव, सबब ही याप्रकारची अव्यये आहेत. आता, आपणगौणत्वदर्शक उभयान्वयी अव्ययांचे प्रकार पाहू या.
अ) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यये
पुढील वाक्ये पाहा
१. एक रूपया म्हणजे शंभर पैसे.
२. तो म्हणाला, की मी हरलो.
३. दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला.
४. विनंती अर्ज ऐसा जे –
वरील वाक्यांतील ‘म्हणजे, की, म्हणून, जे’ या उभयान्वयी अव्ययांनी दोन शब्दांचा किंवा वाक्यांचा संबंध जोडलेला आहे. तसेच, या अव्ययांनी मागील शब्दाचे किंवा वाक्याचे स्वरूप उलगडून सांगितेलेले असते. ज्या उभयान्वयी
अव्ययांमुळे प्रधान वाक्याचे स्वरूप किंवा खुलासा गौण वाक्याने कळतो त्यांस स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.
आ) कारणबोधक उभयान्वयी अव्यये
पुढील वाक्ये पाहा
१. त्याला बढती मिळाली, कारण त्याने चोख कामगिरी बजावली.
२. आम्हाला हेच कापड आवडते, का की ते आपल्या देशात तयार झाले आहे.
वरील वाक्यांतील ‘कारण, का, की’ ही उभयान्वयी अव्यये एक प्रधानवाक्य व एक प्रधानवाक्यव एक गौणवाक्य यांना जोडतात. यांतील दुसरे गौणवाक्य हे पहिल्या प्रधान वाक्याचे कारण आहे. ‘कारण क, की, कारण की, की’ अशा प्रकारच्या कारण दाखविणा-या अव्ययांनाकारणबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.
क) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यये
पुढील वाक्ये पाहा
१. चांगला औषधोपचार लाभावा म्हणून तो मुंबईस गेला.
२. विजेतेपद मिळावे यास्तव त्यांनी खूप प्रयत्न केले.
‘म्हणून, सबब, यास्तव, कारण, की’ यांसारख्या अव्ययांनी जेव्हा गौण वाक्य हे प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू आहे असे दर्शविले जाते तेव्हा त्यांस उद्देशबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.
ड) संकेतबोधक उभयान्वयी अव्यये
पुढील वाक्ये पाहा
१. जर शाळेस सुट्टी मिळाली तर मी तुमच्याकडे येईन.
२. जरी त्याला समजावून सांगितले, तरी त्याने ऐकले नाही.
३. तू लवकर घरी आलास, म्हणजे आपण बागेत जाऊ.
४. तू माझ्याकडे आलास , की मी येईन.
५. प्रयत्न केला तर फायदाच होईल.
‘जर- तर, जरी – तरी, म्हणजे, की, तर’ या उभयान्वयी अव्ययांमुळे पहिल्या वाक्यातील अटीवर दुस-या वाक्यातील गोष्ट अवलंबून असते. ‘जर’ ने अट दाखवली जाते आणि ‘तर’ ने त्याचा परिणाम दर्शविला जातो. ‘जरी’ ने अट दाखवली जाते आणि ‘तरी’ ने अनपेक्षित किंवा विरूध्द असे दर्शविले जाते. अशा वेळी सामान्यतः पहिले वाक्य गौएण व दुसरे प्रधान असते. ही अव्यये संकेत किंवा अट दाखवितात. अशा अव्ययांना संकेतबोधक उभयान्वयी अव्यये असे म्हणतात.
एकच अव्यय प्रकार मात्र वेगळे
उभयान्वयी अव्ययांच्या एकंदर आठ प्रकारांत एकच पुनःपुन्हा आलेले दिसेल. याचा अर्थ त्या – त्या वाक्यात त्याचे कर्य वेगळे आहे. उदा.-
१. यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार. (विकल्पबोधक)
२. लो. टिळक म्हणत, की ‘स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे.’ (स्वरूपदर्शक)
३. तो इतका खेळला, की त्याचे अंग दुखू लागले. ( परिणामबोधक)
४. माझा पहिला नंबर आला, की मी पेढे वाटीन. (संकेतबोधक)
वरील वाक्यांवरून ‘की’ हे अव्यय वरील वेगवेगळ्या चार प्रकारांत संभवते. वाक्यातेल त्याचे कार्य लक्षात घेऊन त्याचा प्रकार ठरवायचा असतो.
उभयान्वयी अव्यये
iv> केवलप्रयोगी अव्यये
अक्षरशः: अतिशय उत्तम व सुंदर.
ReplyDeleteउत्तम उपयोगी माहिती
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete